आज ४ फेब्रुवारी, म्हणजे जागतिक कर्करोग दिन. वाचून आश्चर्य वाटेल, पण २०२० पासून करोनामुळे जेवढे लोक दगावले आहेत त्याच्या तिप्पट लोक कर्करोगामुळे दगावले आहेत. तर करोनाच्या सहापट अधिक कर्करुग्णांचे निदान झाले आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी हे कर्करोगाच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. आणि काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती वाचनातूनच मिळते . . .
खरंतर कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यात झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे; परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटना जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात. आज ४ फेब्रुवारी, म्हणजे जागतिक कर्करोग दिन.
कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. जागतिक कर्करोग दिन मोहीम जागरूकता वाढविण्याचा आणि कर्करोगाभोवती असलेला भ्रम काढून टाकण्याचा प्रयत्न करते.
वाचून आश्चर्य वाटेल; पण २०२० पासून करोनामुळे जेवढे लोक दगावले आहेत त्याच्या तिप्पट लोक कर्करोगामुळे दगावले आहेत. तर करोनाच्या सहापट अधिक कर्करुग्णांचे निदान झाले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की हा रोग इतर रोगांच्या तुलनेत किती भयंकर असून हळूहळू शरीर आतून पोखरणारा व शेवटी संपवणारा असा रोग आहे.
कर्करोगावर सध्या शंभराहून अधिक प्रकारची ‘किमोथेरपी’ औषधे उपलब्ध आहेत. किमोथेरपीच्या जोडीला ‘रेडिओथेरपी’ हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. हे दोन्ही पर्याय नाही चालले तर शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर जगभरात नवनवीन उपचारपद्धती विकसित केल्या जात आहेत. जगातील सर्वात जास्त संशोधनाचा निधी हा कर्करोग या एका आजारावर वापरला जातो आहे. तरीसुद्धा कर्करोग पूर्णपणे बरा होईल, अशी एकही उपचारपद्धती विकसित झालेली नाही.
कर्करोग हा एकच आजार नसून तो अनेक आजरांचा समूह असतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, म्हणजे जेव्हा कर्करोगाचा ट्युमर शरीरामध्ये वाढत असतो तेव्हा किंवा अगदी लहान असतो तेव्हा त्याचे निदान करता येत नाही किंवा आपल्याला कर्करोग झाला आहे, हेही समजत नाही. कर्करोगाची लक्षणेही एकसारखी नसतात. त्यामुळे नक्की कर्करोग आहे की दुसरा कोणता आजार आहे हेही समजत नाही. कर्करोग नक्की कशामुळे होतो याचे ठोस कारण (९५%) अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे त्या आजाराचा अंदाजदेखील लावता येत नाही. मात्र लवकरात लवकर निदान होऊ शकले व अगदी सुरुवातीचा टप्पा (Stage) अचूक ओळखता आला तर लगोलग उपचार सुरू करून कर्करोग बरा करता येतो हेही तितकेच खरे आहे.
त्यामुळे साहाजिकच या रोगाविषयी ज्ञान व सजगता असणे आवश्यक आहे.
• कसा होतो कर्करोग?
पेशी (Cell) हा शरीराचा प्राथमिक घटक आहे. शरीरभर पसरलेल्या या पेशींपासूनच शरीराच्या क्रिया घडत असतात. या पेशींचे सतत विभाजन (Cell Division) होऊन त्यांची दुरुस्ती सुरू असते. शरीरात सुरू असलेल्या उलथापालथीमुळेच पेशींची संख्या वाढते. त्यामुळे अवयवांची वाढ होते. मात्र, या सर्व पेशींची वाढ ठरलेल्या ठिकाणापुरती मर्यादित असते.
कर्करोगात नेमके यावर नियंत्रण सुटते. पेशींची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढत राहते आणि कर्कपेशी (Cancerous Cells) शरीरात कोठेही रूजून वाढू शकतात.
सर्व सजीवांच्या पेशींमधील गुणसूत्रांत (Chromosomes) जनुके (Genes) असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या बाबी जनुकांमार्फत होत असतात. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कर्करोग उद्भवतो.
पेशीच्या वाढीत बदल झाले की गुणधर्मातही बदल होतात. पेशींची संख्या, आकारमान, स्थान, इत्यादी बंधने सैल करणारे बदल घडले की, कर्करोगाची शक्यता तयार होते. त्यातून तयार होणाऱ्या सर्व पेशी स्वैर (Free) होतात. हळूहळू त्याठिकाणी एखादी गाठ (Tumour) तयार होते.
एकदा का ट्युमर तयार होऊ लागले की कर्करोग वेगाने वाढतो. किमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो. किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्लक असेल तर पुन्हा तो शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला, असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो. शरीरामध्ये जसा मेंदू सर्व अवयवांचे नियंत्रण करतो तसेच कर्करोगसुद्धा स्वतःचे नियंत्रण करतो. या सर्व कारणामुळे कर्करोग नियंत्रणात येत नाही.
साधारणपणे तीस एक वर्षांपूर्वी गावामध्ये वर्षात एखादा कर्करुग्ण दगावत असे. आज मात्र रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर, इतकेच नव्हे तर आपल्या ओळखी-पाळखीतही कर्करुग्ण सापडत आहेत. जगभरातील विविध आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्व्हेनुसार सन २०५० मध्ये भारतात दर १० लोकांमागे तीन जणांना कर्करोग झालेला असेल. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल, अयोग्य आहारपद्धती, शहरांतील लोकांमधील व्यायामाचा अभाव, इतकेच काय शरीरावर भरमसाठ औषधांचा मारा यामुळे सुद्धा कर्करोग वेग धरतो आहे. आत्तापासूनच या आजाराबद्दल जनजागृती केली तर आपण वेळीच कर्करोगाला रोखू शकतो.
महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय यांचा कर्करोग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे साधरणपणे वयाच्या चाळिशीनंतर महिलांनी वर्षातून एकदा स्तन आणि गर्भाशय यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. महिलांनी यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे (या दोन्ही कर्करोगांविषयी विस्तृत माहिती 'स्त्रीस्वास्थ्य' ह्या लेखमालेत लिहीली जाणार आहे).
त्याचप्रमाणे सरकारी आणि खासगी यंत्रणेच्या मदतीने महिलांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले पाहिजेत.
पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस (Lungs) , मुत्राशय (Kidney) आणि आतड्यांचा (Intestines) कर्करोग वेगाने वाढतो आहे. हे टाळायचे असल्यास पुरूषांमधील तंबाखू, सिगारेट आणि दारूचे व्यसन घटले पाहिजे.
• • •
मनुष्याला होणार्या कर्करोगाचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते :
१) कर्करोग जिथे उद्भवतो त्या शरीराच्या भगावरून उदाहरणार्थ, स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग.
२) कर्करोगाची लागण ज्यास होते त्यख ऊतीवरून (Tissues), उदाहरणार्थ, लसीका कर्करोग (Lymphoma).
बहुधा,
१) त्वचा२) स्त्रियांची स्तने(Breasts )३) पचनसंस्था४) श्वसनसंस्था५) प्रजननसंस्था६) रुधिरनिर्माणसंस्था (Blood formation)७) लसीकासंस्था (Lymphatic system)८) मूत्रसंस्था (Excretory system)
अशा संस्थांच्या इंद्रियांत कर्करोग प्रथम दिसून येतो.
‘त्वचेचा कर्करोग’ हा जगभरात सर्वात सामान्य समजला जातो.
‘पचनसंस्थेत’;
१) बृहदांत्र (Colon)२) जठर (Stomach)३) यकृत (Liver)४) स्वादुपिंड (Pancreas)
या इंद्रियात तर श्वसनसंस्थेत – घसा आणि फुफ्फुसात कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
‘प्रजननसंस्थेत’ पुरूषांमधे –पुरस्थ ग्रंथी (Prostrate Gland)
व स्त्रियांमधे,
१) गर्भाशय (Uterus)२) बीजाशय (Ovary)३) ग्रीवा (Cervix)
या भागांत कर्करोग आढळतो.
अस्थिमज्जा (Bone marrow) आणि रक्त निर्माण करणार्या इंद्रियांच्या कर्करोगाला ‘श्वेतपेशी कर्करोग’ (ल्युकेमिया) म्हणतात. यामुळे रक्तातील अपक्व पांढर्या पेशींची संख्या वाढते आणि त्या इतर रक्तद्रव्यांच्या निर्मितीत दोष निर्माण करतात.
लसीकासंस्थेच्या ऊतींनाही (Lymphatic Tissues) कर्करोग होऊ शकतो. लसीकासंस्था ही एक वाहिन्यांचे जाळे असून त्याद्वारे शरीरातील द्रव पदार्थ पुन्हा रक्तप्रवाहात मिसळले जातात. रोगांचा प्रतिकारही या संस्थेद्वारे केला जातो. लसीकासंस्थेच्या कर्करोगाला लसीका मांसार्बुद (Lymphoma) म्हणतात. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्ये हा रोग होऊ शकतो.
उत्सर्जन संस्थेच्या इंद्रियांपैकी मूत्राशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असून स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
• • •
ज्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना कर्करोग झालेला आहे, अशा व्यक्तीला कर्करोग जडण्याची शक्यता आढळते. कर्करोगाला कारणीभूत ठरणारे बिघाड झालेल्या जनुकांचे काही प्रकार माता-पित्याकडून मुलांकडे उतरतात, परंतु बहुतेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये डीएनएत अनेक ठिकाणी दोष निर्माण झालेले असतात. एखाद्या विशिष्ट जनुकामध्ये बिघाड झाल्यास कर्करोग होऊ शकतो. मात्र, कर्करोग निश्चित होतो असे नाही. स्तने, बृहदांत्र आणि इतर स्वरूपाचे कर्करोग – बिघडलेली जनुके एका पिढीतून पुढील पिढीत उतरल्यामुळे होतात.
तसेच पर्यावरणातील कर्कजन्य पदार्थांमुळे जनुकांमध्ये बिघाड झाल्यानेही कर्करोग होतो. रसायने, विशिष्ट प्रारणे (Radiations) आणि विषाणू (Viruses) यांमुळे मानवाला कर्करोग होऊ शकतो. अनेक रसायनांमुळे प्राण्यांना देखील कर्करोग होऊ शकतो.
सिगरेटच्या धुरात ४,००० रासायनिक पदार्थ असतात. यांतील डझनभर पदार्थ कर्कजन्य आहेत.
अॅनिलीनपासून तयार केलेले रंग, आर्सेनिक, अॅस्बेसस्टॉस, बेंझीन, क्रोमियम, निकेल, व्हिनील क्लोराइड, पेट्रोलियम उत्पादने आणि कोळशापासून मिळणारी काही उत्पादिते कर्कजन्य आहेत. अन्नपदार्थांमध्ये मिसळली जाणारी किंवा अन्नपदार्थांवर फवारली जाणारी रसायनेही कर्करोगाला कारणीभूत ठरतात.
मनुष्याला होणार्या विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान करण्यासाठी कोणतीही एक विशिष्ट चाचणी नाही. वेगवेगळ्या चाचण्यांद्वारा हा रोग प्राथमिक अवस्थेत ओळखता येऊ शकतो.
बर्याचदा रोग जुना झाल्यावरच रुग्ण वैद्यकीय सल्ला घेतात. गाठ लहान असताना आणि ठराविक जागी असताना कर्करोगाचे निदान झाले, तर उपचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो, परंतु कर्करोगाविषयी लोकांमध्ये भीती आणि माहितीचा अभाव असल्याने व त्यामुळे उपचार करण्यात दिरंगाई झाल्यामुळे अनेकजण कर्करोगाने मरण पावतात. कर्करोग भयप्रद असला तरी असाध्य नाही.
वैद्यकीय उपचारांबरोबरच कर्करोगासंबंधी प्रबोधन करणे, रुग्णांशी आपुलकीने वागणे, त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे इ. बाबींची खरी गरज आहे.
करोना विषाणूमुळे झालेला कोविडसारखा आजार एकदा झाल्यानंतर पुन्हा-पुन्हा होत नाही. याउलट कर्करोग मात्र ९० टक्के पुन्हा उद्भवतो, आणि अशा वेळी तो उपचारांच्या नियंत्रणाबाहेर जातो.
अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीमध्ये अत्याधुनिक अशी इम्युनोथेरपी (किंवा लक्ष्यानुरोधी कर्करोग उपचारपद्धती) विकसित झाली आहे, मात्र ती आत्यंतिक खर्चीक असल्याने सर्वांना परवडण्यासारखी नाही. मात्र खरी शोकांतिका अशी आहे की कर्करोग हा काही गरीब श्रीमंत पाहून होत नसतो! त्यामुळे या रोगाची भयानकता लक्षात घेता आपण सजग राहणे अतिशय आवश्यक आहे.
सजग रहा, स्वस्थ रहा.
• संदर्भ :
१) कर्करोग : माहिती व अनुभव – सुलोचना गावंडे
२) Cancer Explained – Fred Stephens, Richard Fox३) मराठी विश्वकोश
• वाचत रहा :