रोम्बाट

[वाचनकाल : २ मिनिटे] 
रोम्बाटात ढोल बडवणारा माणूस, man playing dhol in rombat ritual

अजूनही कित्येक अघोरी प्रथा राजरोसपणे घडवून आणल्या जात आहेत. ‘रोम्बाट’ ही अशीच एक अघोरी प्रथा आहे. केवळ सामाजिक दबावाखाली टिकवल्या जाणाऱ्या जातीव्यवस्थेचे ठळक वास्तव म्हणजे ‘रोम्बाट’. ऊन-पाऊस-वारा न जुमानता केवळ एका जातीत जन्म घेतला म्हणून होळीच्या प्रत्येक कार्याचा निरोप द्यायला घरोघरी ढोल बडवत न्यायचा, दिलं ते खायचं आणि प्रतिकार करायचा नाही म्हणजे ‘रोम्बाट’! दारू पिऊन रंगेल झालेल्यांना नाचण्यासाठी पंधरा किलोचा ढोल रात्र-रात्र गळ्यात अडकवायचा म्हणजे ‘रोम्बाट’! देवकार्याची सुरुवात तर करायची; पण शेवटाला येईपर्यंत देवळातला नियोजीत अस्पर्शित कोपरा पकडून बसायचं म्हणजे ‘रोम्बाट’! या रोम्बाटाविरूद्ध बंड करणाऱ्या तरुणाची चित्तरकथा . . .
 
जगभरात पसरलंय इंटरनेटचं जाळं
एका क्लिक द्वारे 
काही सेकंदात जगाशी होता येतं कनेक्ट 
त्या युगात . . .

प्रस्थापितांचं
नागडं-उघडं
शेंबडं पोरं
वार्धक्याने हाडं ठिसूळ
झालेल्या माझ्या बापाला
आदेश देत म्हणालं
ए म्हाताऱ्या,
रोम्बाट काढायचंय

पिढ्यानपिढ्या धर्माच्या ठेकेदारांनी
जातीय उतरंडीची विषमता निर्माण करून
देव धर्माच्या नावानं
पोसला आहे वर्णवर्चस्ववाद

धु म्हटलं की धुवायचं
लोंबत काय म्हणून
विचारायचं नाही पालटून
नाहीतर सत्तर पिढ्यांचा उद्धार
अख्खा जातसमूह झालाय
धर्मवाद्यांचं पायपुसणं

माझा बाप
जन्माची होळी नि
आयुष्याचा शिमगा करून
स्वातंत्र्याच्या नावानं बोंब मारत
स्वाभिमान तुडवत
ढोल बडवत
दवंडी पिटत 
खेड्या-पाड्यात
वाड्या-वाड्यात
गाव-गाड्यात
कोणाच्या सुख-दुःखात 
कोणत्या लग्नाच्या विड्यात
कोणाच्या मैत-मड्यात
कधी काट्याकुट्यातून
कधी मसनवाट्यातून
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात ढोल बडवत आहे

पिढ्यानपिढ्या
तो मान खाली घालून चालतो
खरकटलेली लुगडी नेसलेल्या
प्रस्थापितांच्या बायकापोरांच्या पुढ्यात
धनधान्याची रास घरात असूनही
तो उकिरड्यावरच बसून खातो
लावारीस कुत्र्यावाणी
त्यांनी फेकलेला शिळापाका तुकडा
आणि घोट-घोट पितो
वरून वाढलेलं जातव्यवस्थेचं गढूळ पाणी
कडाशेवरच्या कानतूटक्या कपातून
तडा गेलेल्या बशीतून
तो फुरक्या मारत पितो 
कळकट मळकट चहा

माणूस बाटतो माणसाच्या स्पर्शाने
माणसाला माणसाच्या सावलीचा 
अजूनही होतो विटाळ
देवाच्या कार्यात मात्र
माझ्या बापाला मिळतं
सर्वात वरचं मानाचं स्थान

गावकऱ्यांचं वयात आलेलं पोर 
मला टायकोटात सुटाबुटात पाहून
बा ला म्हणलं
आता तुझ्या पोरात
धर्म रुजवायला हवा
त्याला सुद्धा आता देवापुढे
ढोल वाजवायला हवा

पोरं शिकलं सवरलं होतं
तरी थोडं बावरलं होतं
हिम्मत करून म्हणलं
मी ढोल वाजवणार न्हाय

मग तो वस्तीत
बाबासाहेब पेरत गेला
फुले शाहू आंबेडकर
मनामनात कोरत गेला

तो म्हणाला
त्यांच्या पिढ्यान्पिढ्याचा माज हाय
तो मी पेचून काढीन
आज कायद्याचं राज हाय
अनिष्ट रूढी परंपरा ठेचून काढीन

गावाशी नडला होता
सारा समाज चिडला होता
व्यवस्थेच्या विरुद्ध त्यानं
एक आसूड ओढला होता

त्यानं हाती घेतलं
देवघरात खितपत पडलेलं भारतीय संविधान
धूळ झटकली
जयभीमचा नारा दिला
सारा समाज जागा झाला

कधीपर्यंत जगणार हे लाचार जिणं . . . म्हणून
गुलामीच्या बेड्या झुगारून देत
त्यानं बंड केलं
कायद्याने व्यवस्थेला थंड केलं

अज्ञान दूर सारत
गावगाडा गुलामीचा वेढा तोडून
देव्हाऱ्यातला नि
मनातला देव फेकून दिला
उकिरड्यावर
पोथीपुराणासकट

आता माझा बा,
बा भीमाच्या पायवाटेने चालतो आहे
अत्त दीप भव
बुद्धाची वाणी बोलतो आहे[ ही कविता भुदरगड तालुक्यातील एका गावात घडलेली सत्यकथा आहे या कवितेचा नायक ‘डॉ.अनिल कदम’ आणि सहकारी यांच्या या अघोरी प्रथेविरुद्ध केलेल्या बंडाला संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्याचे काम या कवितेच्या माध्यमातून करण्यास  मी कवी भिमराव तांबे कटीबद्ध आहे. ही प्रथा महाराष्ट्रातील ज्या-ज्या ठिकाणी चालू आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधा. ]


कवी भिमराव तांबे, poet Bhimrao Tambe


– भिमराव तांबे (८२०८१८३९२४)
(‘कुऱ्हाडीचे घाव’ आणि ‘परिघावरच्या कविता’ विद्रोही कवितासंग्रह प्रकाशित)
• संदर्भ

• वाचत रहा


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال