मध्यरात्र

[वाचनकाल : १ मिनिट] 
खिडकीतून रात्र न्याहाळणारा तरुण, Young boy staring at nothing at knight

आपल्या कथांच्या व्यथा विकून सुखाचे क्षण खरेदी करणाऱ्यांच्या या युगात काही जणांना तर व्यथांच्या कथासुद्धा शब्दांत सांधता येत नाहीत. आपल्या मनीच्या व्यथा इतरांना सांगता येत नसण्याच्या दोन शक्यता असू शकतात – एकतर ही त्या व्यक्तीची आत्ममग्नता आहे किंवा मग मनातली ही वादळे सांगताच आपण ज्यावर निर्मळ प्रेम करतो त्याला गमावण्याची भीती आहे . . .

एकदा मध्यरात्री नकळत केलास मेसेज आणि विचारलंस तू मला,
‘इतक्या रात्री जागा राहून काय करतोस?’

खरं तर तेव्हाच मनात आलं होतं सांगून टाकावं सगळं . . .
     आणि मोकळं व्हावं – ह्या रोज होणाऱ्या वेदनेतून . . . पण नाही जमलं.
     म्हटलं, ‘झोप नव्हती म्हणून आलो ऑनलाईन’ इतकंच बोलू शकलो मी.

त्यानंतर तू लगेचच ऑफलाईन गेलीस.

आणि मग त्याच रात्रीं लिहून काढलं,
     मी आठवतोय आपली पहिली भेट, ओझरता स्पर्श, तू दिलेले शब्द, घेतलेली वचने, पहिली मिठी,पहिले चुंबन, पहिलं रुसणं, पहिलं रागावणं, पहिल्या पावसात एकत्र भिजणं . . .
     आणि मग गोळा करत बसतोय कोऱ्या कागदावर शब्द, रेखाटत बसतोय आठवणी – मोबाईलच्या कीबोर्डवर. आणि पाहत असतो अधून-मधून तुझा, मोबाईलच्या गॅलरीमधला, साडीतला फोटो . . . आणखी असं बरंच काही.

आता, आता असाचं नकळत भेटेन आडवळणावर, तेव्हा विचारेन तुला मीही,
     ‘त्या मध्यान रात्री इतका वेळ तू का जागी होतीस?’

निदान तेव्हा तरी अगदी तू असंच काहीसं सांग . . .


– सुकि

 
• संदर्भ:

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال