स्पर्श मनाचा

[वाचनकाल : ३ मिनिटे] 

स्पर्श मनाचा

शब्दांच्या भाषेविनाही बोलता येते हे कोडे न उलगडता एकूण मनुष्य संख्येचा बराच भाग हा आला दिवस ढकलत जातो, आयुष्य निसटत जाते. भाषा ही मधुर हास्यातून, डोळ्यांतून किंवा मग स्पर्शातून बोलता येतेच! हातात हात घेणे, सरळ कुशीत शिरणे हे लहानपण संपल्यावर मराठी माणसांतून का संपते? हा शरीर स्पर्श करायला आपण का लाजतो? किंवा तिकडे दुर्लक्ष करतो? हा एक स्पर्श असतो, ज्यातून सर्व काही बोलता येतं. त्यातून साधतो – स्पर्श मनाचा . . .

पिंपळाची गार सावली. खोडाला टेकून झोपलेला तो. जाग आली तसा पोटावर ओणवा झाला. वर फक्त पिंपळाची पाने. उन्हं दिसत नव्हती. आकाशही. किती महिने झाले असा निवांतपणा नव्हता. गाव सोडून वर्षे उलटली होती. कॉलेज झालं मग जॉब सुरू झाला. रहाटगाडग्यात अडकला. लाखातला पगार. श्रीशी अमेरिकेतच जुळलं. श्रीचाही असाच पोतंभर पगार. दोघांनी प्रशस्त फ्लॅट घेतला. अकरावा मजला. तीन वर्षांनी लग्न केलं. आयुष्य पळत होतं. किती वर्षे झाली . .‌ .
     अण्णा-आई गावच्या घरी बोलवायचे. या रे म्हणायचे. यायचं मग कधीतरी – पाहुण्यासारखं. सकाळी येऊन रात्री परत माघारी, तेवढ्यावर अण्णा खुश. आई बडबडायची. अण्णा हसत सगळं करायचे. ह्या दोघांना कुठे ठेवू कुठे नको करायचे.  ह्याचे तर कौतुक होतेच अण्णांना. श्रीचे कौतुक त्याहून जास्त. श्रीवर जास्त जीव अण्णांचा. 
     खोडावरच्या त्याच्या हाताला वळवळलं. मुंगळे होते. पिंपळाच्या खोडावर इकडे तिकडे. खोड कुठे गुळगुळीत. कुठे खडबडीत. अण्णांचे हात असेच आहेत. सकाळी आल्यावर पाहिलं. अण्णा किती म्हातारे झालेत आता; पण माया तीच. 
     पिंपळाच्या खोडावर हालचाल सुरू होती. एक वाळले पान वर चढत होते. दोन मुंगळे मिळून पान वर चढवत होते. झाडाचे वाळले पान. वरून गळाले असणार. खाली पडले. त्या दोन मुंगळ्यांनी तेच घेतले. खोडावरून आता तेच नेतायत. वर वाहून नेतायत – निगुतीने. बाजूने काही लाल मुंग्या. पण हे दोन मुंगळे चाललेत. पान घेऊन. वरच्या दिशेने. मध्येच घसरत होते. थोडं थांबत होते. जरा इकडे-तिकडे सरकायचे की परत वर. 
     हे दोघे घरी येताच अण्णांनी चप्पल सरकवली. रानातून टोपल्यांत सीताफळं आणली. ह्याला लहानपणापासून आवडतात. श्रीलाही अण्णांनी शिकवलं. सीताफळाची गोडी लावली. आईने वाटी दिली – बिया ठेवायला. श्रीने आईला साडी आणलेली. अण्णांसाठी उंची कापड. ‘सुट शिवा’ म्हणत होती. तिच्या मोडक्या-तोडक्या हिंदीत. अण्णा हसत होते. सीताफळाच्या पाकळ्या सोलून देत होते – श्रीसाठी. अण्णांच्या हाताला किंचित थरथर? हा  दचकला. अण्णा इतके म्हातारे झाले? कधी? लक्षात कसं आलं नाही? 
     मुंगळे चिवट होते. जागा बदलत होते; पण तोंडातलं पान सोडत नव्हते. वाळकं पान वरच्या दिशेने चाललं होतं. मुंगळे इकडे-तिकडे होत होते. थोडंफार खाली घसरत होते. पण वरची दिशा कायम होती. पान सुरकुतलेलं. थोडे डाग. कशासाठी नेत असतील वर – इतकी मर मर करून?
     श्रीने आजही अण्णांना विनवले. दोघांना मुंबईत येण्यासाठी.
     आता आमच्या सोबत रहा. घर मोठं आहे. चला तुम्ही. आजच चला आमच्यासोबत.
     आई अण्णांकडे पहात होती. अण्णांनी हसून नको म्हटले. सीताफळाच्या पाकळ्या सोलत होते. श्रीच्या हातात ठेवत होते. 
     आता ह्या वयात कसले येतोय. इथे जीव रमतो आमचा. तुम्ही राजा-राणीचा संसार करा. आमचे सगळे इथेच होऊ द्यात.
     श्रीने अण्णांचे हात हातात घेतले. तिचे डोळे डबडबलेले. अण्णांचे खडबडीत हात तिच्या हातात – किंचित थरथरत होते.  श्रीनिधी, बाळा . . . इतकेच पुटपुटत अण्णा उठले. ओलसर डोळे लपवत अंगणात गेले. पाठोपाठ आई. ह्याला श्रीचे कौतुक वाटले.
     हिला कसे जमते असे . . . आपले बोलणे चार फुटांवरून .‌ . . कधी हात हातात घेणे नाही. ही सरळ आईला कवेत घेते. तिच्या मांडीवर डोके ठेवते. आई माझी, जवळीक हिची. गळ्यातही पडते. अण्णांशीही अशीच. ही सरळ पाण्यात उतरते. आपण कडेकडेनेच थबकतो. आपल्यालाही उद्या मुले होतील. ती पण अशीच असतील आपल्याशी – कडेकडेने थबकणारी? 
     श्रीचे हे असे स्पर्श करून बोलणे‌ . . . आपल्याला का जमत नाही? कुठला अडाणीपणा मध्ये येतो? माया दाखवायला का लाजतो आपण? तिच्या स्पर्शानेच आई-अण्णा फुलतात. ही स्पर्शाची भाषा आपण कधी शिकणार? श्री किती सहजतेने करते. तिची जडणघडणच अशी आहे? संस्कृतीतला फरक? ती श्रीनिधी शेट्टी आहे म्हणून?

मुंगळ्यांचं पान वीतभर वर गेलं होतं. मुंगळे थकले असावेत. पानाची वरची बाजू ओढणारा मुंगळा. मध्येच खालच्या मुंगळ्याजवळ येई. त्याच्या तोंडाला तोंड लावे – काही क्षण. पुन्हा वर जागेवर. नव्या जोमाने पान वर खेचे. ह्याच्या डोक्यात उजेड पडला. मुंगळ्यांचं कोडं उलगडलं होतं.


• संदर्भ :

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال