मिर्ज़ा ग़ालिब

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
मिर्जा गालिब, mirza galib
खनपटीला बसलेल्या मित्रांच्या आग्रहाखातर त्यातलेच जे मोजके १०००-२००० शेर त्याने उर्दू भाषेत लिहिले, तेच सात्त्विक रक्तचंदनाच्या सुवासाप्रमाणे जगभर पसरले.


आज शेर-शायरीत वस्ताद मानलेल्या एका शायराचा स्मृतिदिन. त्याच्या नावाशी परिचित नाही असा कोणत्याही वयाचा सामान्य अथवा रसिक माणूस सापडणे जवळपास अशक्य. आपल्या मृत्यूनंतर जवळपास दीडशे वर्षांनंतरही अनभिषिक्त सम्राट राहिलेला हा शायर म्हणजे मिर्ज़ा बेग असदउल्लाह खान – टोपणनावाने सांगायचे झाले तर – मिर्ज़ा गालिब . . .

रूमालावरच्या धुंद अत्तरासारखी संध्याकाळ. मैफलीत हळूहळू सावल्यांनी रंग भरत चाललेले. गार वाऱ्याची एखादी चुकार झुळूकही आर्त सुरांत हरवलेली. 
     साल १८६७.
     आग्र्याहून दिल्लीला नशीब काढण्यासाठी आलेला एक धीरगंभीर चेहऱ्याचा तरुणही लाल किल्ल्यावरच्या त्या मैफलीत खालमानेनं बसला होता. मैफलीचा दिवा त्याच्या समोर ठेवताच रिवाजानुसार त्याने शरीराला गुंडाळलेल्या धवल शालीला किंचित आवळलं, मनाचं नवखेपण-अवघडलेपण बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि खणखणीत आवाजात पहिला शेर सादर केला, 

पिला दे आंखसे साकी जो हमसे नफरत है,
प्याला गर नही देना, न दे, शराब तो दे!

(माझा इतकाच तिरस्कार असेल तर किमान नयनांतून तरी जराशी नशा पाज, हाती पेला दे न दे, तुझ्या पापण्यांआडची मदिरा तर रिचवू दे!)

सगळीकडे कसं गप्पगार! कोणीच तोंड उघडलं नाही. त्याला ऐकू आली ती फक्त आपल्या काळजाची धडधड. त्यानं शेर पुरा केला,

दिखाके जुंबिश-ए-लब ही तमाम कर हमको,
न दे जो बोसा तो, मूंहसे कहीं जवाब तो दे!

(हे रसभरले ओठ दाखवूनच गारद कर मला सखे,
चुंबन मिळो न मिळो, लटक्या रागानं काहीतरी उत्तर तरी दे!)

श्रोत्यांमध्ये एक चमत्कारिक शुकशुकाट. पुढचा शेर वाचतानाही तेच . . .

उनके देखनेसे जो आ जाती है मूंहपे रौनक,
वह समजते है कि बीमार का हाल अच्छा है!

(तिच्या एका नजरेनंच चर्येवर जी टवटवी-जो दिलासा चढतो,
तो पाहून तिला वाटतं काय तर या सदा(प्रेम)रोग्याचा हालहवाल आज किंचितसा बरा दिसतोय म्हणायचा!)

गर्दी ढिम्म. अपमान! कुचंबणा! धडधडीत विटंबना! तो मनातलं वादळ लपवत मैफलीला उद्देशून अदबीनं म्हणाला, ‘मिसरा उठाए, हजरात . . .!’
     गजलेची पहिली ओळ शायरने सादर केली, की श्रोत्यांनी ती पुन्हा म्हणायची या पद्धतीला ‘मिसरा उठाना’ म्हणत. पण इतकं विनवूनही कोणीही काव्यपंक्ती उचलली नाही! उलट आता तर बघे हलक्या आवाजात कुजबुजू लागले.
     ‘नाही उचलली जात! खूप जड आहे!’
     हास्याची कारंजी फुटली.
     मन घट्ट करत त्यानं शब्द उच्चारले, ‘मुक्तीसाहब, मिसरा उचलायला कुणी ‘हमाल’च मिळाला नाही, तेव्हा फक्त अखेरचा शेर ऐकवतो.’

हमको मालूम है जन्नतकी हकीकत लेकिन, 
दिलके खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा है . . .

(ज्यानं ही विफल, उद्विग्न करणारी दुनिया घडवली, त्यानं साकारलेला स्वर्गही असून असून असा काय अचाट काय असणार आहे? पण मनाची समजूत काढायलाही हा भंपक विचार बराच आहे म्हणायचा!)

पाणावलेल्या संतप्त डोळ्यांनी तडक बाहेर पडलेल्या त्याचा मैफलीतल्यांचा अडाणी हास्यस्फोट पाठलाग करतच राहिला. मात्र मळलेली पायवाट न चालणाऱ्या याच पावलांनी पुढे प्रतिभेचा अत्युच्च आयाम घडवला. त्या भणंग तरूणाचं नाव – मिर्झा असदउल्ला बेग खान!

काबां किस नूर से जाओगे गालिब . . .
शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या है . . .
आखि़र इस दर्द की दवा क्या है,
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये न थी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे . . .
कहते हैं गालिब का अंदाज-ए-बयाँ और

अशा त्याच्या ओळी पुढे रसिक जनतेनं अक्षरशः डोक्यावर घेतल्या. दीवान-इ-गालिब, कुल्लियत-इ-गालिब, कातिअ-ह-बुर्हान, मिहर-ह-नीमरोज, कल्लियत-ह-नस्र , उद-द-हिंदी, उर्दू-द-मुंआल्ला असे अनेकविध ग्रंथ आजतागायत त्याच्या हातून लिहिल्या गेलेल्या ओळींचा अभ्यास मांडतात.
     १८व्या शतकात जन्मलेला हा एक फारसी आणि उर्दूप्रेमी युवक. मस्तानीच्या कुळाचा झुंजार वारसा लाभलेला. सुधारक वृत्तीचा, सर्व धर्मांना समान मानणारा, कर्मठतेवर उपरोधाचं अस्त्र चालवणारा, त्याचबरोबर साधेपणानं नमाज पढणारा-रोजा ठेवणारा, कलासक्त, रसिक विव्दान.  केवळ चार वर्षांचा असतांना वडिलांचं छत्र हरपल्यानं दुनियादारीचे निर्दय चटके अंमळ लवकरच ताटात वाढले गेले. आणि मग माणसांनी गच्च भरलेल्या घरात सहजी नजरेस न पडणारं एकाकीपण कागदावर उतरवत वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहू लागला. जीवनाच्या झळा सोसून त्याने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. एकूण १८,००० च्यावर शेर फारसी भाषेत रचले. पुढे खनपटीला बसलेल्या मित्रांच्या आग्रहाखातर त्यातलेच जे मोजके १०००-२००० शेर त्याने उर्दू भाषेत लिहिले, तेच सात्त्विक रक्तचंदनाच्या सुवासाप्रमाणे जगभर पसरले.
     गालिबला स्वतःकरता प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तरमुघल काळातल्या राजा-उमरावांच्या दरबारी जाणेही त्याला आवडत नसे. कोणी डिवचलं-हटकलं तरी तो प्रखर आत्मविश्वासानं समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात रोखून म्हणायचा,
‘माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझं नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.’
     कोणत्याही सृजनाची निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्या संकल्पनेत-त्या इराद्यात तितकीच ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवलं. आपल्या शब्दांत बंडखोरीचं बीज रोवलं.
     एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळातही भारतातल्या ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स’ चळवळीच्या मुळाशी गालिबचा हाच विचार केंद्रस्थानी राहिलेला आहे. गालिब जगानं नाकारला गेला तरीही चुकीचा नव्हता. आपल्याला समजून घेऊन दाद देणारं जगच अस्तित्वात नाही हे जाणूनही त्यानं झुंडीची मानसिकता नाकारली. निवडलेल्या रस्त्यावर एकटाच ठेचकाळत का होईना, पण तो निग्रहानं चालत राहिला. 

तेव्हा चाकोरीत फिरणाऱ्या काफिल्याचा हिस्सा होण्याचा अट्टाहास धरण्यात अर्थ नाही. स्वतःची पायवाट आणि स्वतःचा काफिला स्वतः घडवा! असं जेव्हा घडेल तेव्हा जे काम कराल त्याला समरसून न्याय मिळवून द्याल आणि मग ते सुंदरच भासेल!


• संदर्भ :

• वाचत रहा :


 

2 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. सकाळी सकाळी तूझा गालिबवरचा लेख वाचला. अप्रतीम शब्द छोटा वाटावा एव्हढा सुंदर लेख. गालिब वाचायला वय नाही तर वृत्ती लागते ती असली की त्याची नशा जून्या दारुसारखी तितक्याच जोमाने चढते आणि हँग ओव्हर तर आयुष्यभर उतरतच नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आधी भीती वाटायची गालिबची, त्याची भाषा म्हणजे जंजाळ वाटायची! पण एकेक पडदा उलगडून आत गेल्यावर तीच भाषा अंधारात चमकून उठणारा किती सुंदर विचार मांडते, हे उमजत गेलं तसा हा हट्टी गालिब आवडत गेला. त्याच्या मनस्वी स्वभावावर जे प्रेम जडतं, त्याला 'गालिबियत' हेच नाव देता येईल. ही 'गालिबियत' आपलीशी वाटणारे आपणही, हे समजून मनापासून आनंद होतोय. कलमकार उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विचक्षण समीक्षांनी समृद्ध होत असतो...☺️ तेव्हा मला अजून काय हवं?

      हटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال