छत्रपती संभाजी महाराज : गैरसमजात लोपलेला वीर

 [वाचनकाल : ५ मिनिटे] 

छत्रपती संभाजी महाराज, chatrapati sambhaji maharaj
शहाजीराजांच्या शूद्र कुळामुळे, त्यांचा पुत्र शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला. या अशा प्रसंगांमुळे संभाजीराजांचे मन अतिशय क्षुब्ध होऊन जात असे.


जितकं वादळी व्यक्तिमत्व तितकीच हीन बदनामी, नामुष्की आणि विश्वासघात हे समीकरण घेऊन आयुष्यभर लढत राहिलेला अजेय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महारारांजा पुत्र राजा संभाजी‌ किंवा आपले शंभुराजे. शंभुराजांच्या आयुष्यातील अशा कोणत्या गोष्टी होत्या त्यामुळे त्यांना अगदी धर्मांतराच्या अफवांमध्ये मढवलं गेलं? किंवा कशामुळे त्यांना इतका कठोर मृत्यूदंड दिला गेला? सर्वांनी वाचनातून हे सत्य जाणलं पाहिजे तेव्हाच खरे शंभुराजे समजतील . . .


श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते ।
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ।।


याचा अर्थ असा होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आणि आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा सर्वात श्रेष्ठ कोणीही नाही.


'स्वराज्याचा छावा'

'सिंहालासुद्धा हाताने लोळवणारा रांगडा मराठा'

'एकही युद्ध न हरलेला राजा'

'मृत्यूसुद्धा ज्याच्यासमोर नतमस्तक झाला असा वीर'


संभाजीराजांची ही ख्याती अवघ्या मराठी जनांच्या मनामनांत ठसली आहे. जर आव्हानांचा सामना करता-करता मन क्षुब्ध झाले, तर संभाजीराजांचे स्मरण करावे. संभ्रमावस्था जाऊन तिची जागा जिद्द घेईल. अतिशय छोटी कारकीर्द मिळूनसुद्धा ते गाजली, यातून संभाजीराजांचे शौर्य व कूटनीती दिसून येते. स्वकीयांच्या गद्दारीने मात्र या शूरवीराचा अल्पकाळातच अंत झाला.


संभाजीमहाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजीराजे दोन वर्षांचे असताना त्यांची आई, म्हणजेच राणी 'सईबाई' यांचे निधन झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावातील धाराऊ पाटील गाडे ही स्त्री संभाजीराजांची दूध आई झाली. संभाजीराजांचा सांभाळ त्यांच्या आजी 'राजमाता जिजाऊ' यांनी अगदी मायेने केला. त्यांच्या सावत्र आई म्हणजेच, राणी 'पुतळाबाई' यांनी त्यांना आईसारखेच प्रेम दिले. परंतु, त्यांची दुसरी सावत्र आई – राणी 'सोयराबाई' यांचा त्यांना सतत त्रास सहन करावा लागला.

शिवाजीमहाराजांनी सात विवाह केले होती. राजकारणामुळे, स्वराज्याचा भक्कम पाया रचण्यासाठी केलेले ते सौदे होते. त्यांनी अनेक घराण्यांशी रक्ताचे संबंध जोडले. आपल्यासाठी शिवाजीमहाराज कायम दैवतासमान राहतील. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे, त्यांचा पुत्र संभाजी याचे फक्त बालपणच हिरावून घेतले गेले असे नाही; तर संपूर्ण आयुष्य त्याला विविध त्रास सहन करावे लागले. जिथे प्रश्न सत्तेचा असतो, तिथे अहंकार, मत्सर, दुजाभाव या गोष्टी येतातच. मग त्याला शिवाजीमहाराजांचे घरसुद्धा अपवाद नव्हते.

लहानपणी, मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना कमी वयातच कळावे, या विचाराने छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी सोबत नेले. त्यावेळी छत्रपती संभाजीमहाराज फक्त नऊ वर्षांचे होते. आग्र्याची सुटका अभूतपूर्व घटना होती. परंतु, लहान वयातच, आपल्यावर नेमकी जबाबदारी काय आहे; हे कळल्यामुळे संभाजी राजांना अल्पवयातच प्रौढ व्हावे लागले. राजपूत राजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदरचा तह झाला, तेव्हा काही दिवसांसाठी का होईना, राजे जयसिंग यांनी संभाजीराजांना ओलीस ठेवले होते. एकीकडे जबाबदाऱ्यांचा ससेमिरा तर दुसरीकडे प्रेमास मुकलेले बालपण, अशा परिस्थितीत एक अस्थिर मन तयार झाले.

आपल्या मनातील कोलाहल शांत करण्यासाठी त्यांनी ज्ञानाचे माध्यम निवडले. अगदी अल्पवयातच संभाजी राजांनी 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. प्रखर विद्वत्ता धोपट मार्ग नाकारण्यास कारणीभूत ठरली व बुद्धीला पटेल ते निर्णय घेणारे व्यक्तिमत्व संभाजीराजांमध्ये तयार झाले.

छत्रपती संभाजीमहाराजांचे लग्न जिवुबाईशी झाले. लग्नानंतर त्यांचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाई यांना दोन मुले झाली. एका मुलीचे नाव 'भवानी बाई' आणि दुसऱ्या मुलाचे नाव 'शाहू' असे ठेवण्यात आले.

आज शिवाजीमहाराज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. त्या काळात मात्र शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारताना बाहेरील शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंचा जास्त सामना करावा लागला. सामाजिक ठेवण अशी होती, की शिवाजीमहाराजांना स्वराज्य चालवणे अवघड होऊन बसले. परंपरेने देशमुखांसारख्या काही घराण्यांना कर गोळा करण्याचे अधिकार होते. ही घराणी, स्वतःच्या स्वार्थामुळे शिवाजीमहाराजांना एक राजा म्हणून मान्यता देत नव्हती. अशा सर्वांना वठणीवर आणण्यासाठी शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. शहाजीराजांच्या शूद्र कुळामुळे, त्यांचा पुत्र शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला. या अशा प्रसंगांमुळे संभाजीराजांचे मन अतिशय क्षुब्ध होऊन जात असे. या अशा लोकांविरुद्ध संभाजीराजांच्या मनात एक राग तयार झाला होता व वेळोवेळी तो प्रकटसुद्धा व्हायचा. तरीही, शिवाजीमहाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी आपली सौम्य प्रकृती जपली होती.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या अनेक प्रतिनिधींना छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक मान्य नव्हता. परंतु, छत्रपती संभाजीमहाराजांच्या विनम्र स्वभावाने आणि त्यांच्या ज्ञानाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत राजमाता जिजाऊंचे निधन झाले. शिवाजी महाराजांवरील मायेचे छत्र तर हरपलेच, परंतु याचा मोठा तोटा संभाजीराजांना झाला. त्यांची मानसिक घुसमट वाढत गेली.

संभाजी महाराजांचे दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीमहाराजांचा अमात्य 'अण्णाजी दत्तो' याच्या कारभाराला सक्त विरोध होता. कारण अण्णाजी दत्तो हे राणी सोयराबाईंसोबत मिळून अनेक कामांत अडथळा टाकायचे. राणी सोयराबाई यांना त्यांचा पुत्र राजाराम महाराजांना छत्रपती करायचे होते.

छत्रपती शिवाजीमहाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. परंतु छत्रपती संभाजीमहाराज यांचे अनेकदा अण्णाजी दत्तोसोबत मतभेद व्हायचे. त्यामुळे, अण्णाजी दत्तोसोबत अनेक अनुभवी मानकरी छत्रपती संभाजीमहाराजांच्या विरोधात गेले.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अनुपस्थितीमध्ये अष्टप्रधानमंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञा मानण्यास नकार दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून छत्रपती संभाजीमहाराजांना पाठविले. घरातील या मतभेदांनी शिवाजीमहाराजांनासुद्धा हतबल केले होते. त्यांना पुत्राचा त्रास कळत होता; मात्र स्वराज्य हे पुत्रापेक्षा महत्त्वाचे होते आणि त्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक होते.

३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा छत्रपती संभाजीमहाराज पन्हाळा किल्ल्यावर बंदिवान होते.‌ असे म्हटले जाते की, छत्रपती संभाजीमहाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या वेळी भेटू दिले गेले नाही. त्यावेळी राणी सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांसारख्या प्रभावशाली दरबारी आणि इतर मंत्र्यांनी छत्रपती संभाजीमहाराजांना गादीवर बसण्यापासून रोखण्यासाठी षड्यंत्र रचले. राजाराममहाराजांना वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर बसविण्यात आले.

ही बातमी कळताच छत्रपती संभाजीमहाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि किल्लेदाराचा वध करून पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. काही स्त्रोतांनुसार, अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावरच ठार करण्याचासुद्धा बेत आखला होता. परंतु, हंबीरराव मोहिते यांनी हा कट उधळून लावला व संभाजीराजांना वाचवले. छत्रपती पद स्वीकारण्याआधीच स्वराज्याच्या या शिलेदाराला स्वतःच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सामोरे जावे लागले. तरीही, अण्णाजी दत्तो यांना माफ करण्यात आले.

२० जुलै १६८० रोजी छत्रपती संभाजीमहाराज सिंहासनावर बसले.

राजाराम महाराज, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई राणी सोयराबाई यांना कैद करण्यात आले. या कटात सहभागी असलेल्या अण्णाजी आणि इतर मंत्र्यांना अटक करण्यात आली आणि काही लोकांना फाशी देण्यात आली किंवा बंदिस्त करण्यात आले. अण्णाजींची मात्र काही काळानंतर सुटका झाली. स्वकीयांवर वार करावे तरी कसे, या पेचात पडलेला अर्जुन व संभाजीराजे यांमध्ये फार फरक नव्हता. ही एकच गोष्ट संभाजीराजांना कायम जाचत राहिली.

औरंगजेबपुत्र शहजादा अकबर द्वितीय, जेव्हा स्वराज्यात औरंगजेबाविरुद्ध आश्रय घेण्यासाठी येऊन पोहोचला; तेव्हा छत्रपती संभाजीमहाराजांनी आपले काही लोक पाठवून त्यांची व्यवस्था पाहिली. तेव्हा सुद्धा अण्णाजी दत्तो आणि शिर्के कुळातील अनेक सदस्यांनी राजाराममहाराजांसाठी एक छोटेसे राज्य‌ सोडण्याच्या बदल्यात अकबराला दख्खन देण्याचे वचन दिले. या व्यक्तींना संभाजीराजांनी स्वतःच्या हत्येचा कट केल्याबद्दलसुद्धा माफ केले होते.परंतु, ते सुधारले नाहीतच. या कटात सहभागी होण्यास अकबराने नकार दिला आणि या कटाबद्दल छत्रपती संभाजीमहाराजांना संपूर्ण माहिती दिली. अण्णाजी दत्तो, त्यांचे भाऊ सोमाजी दत्तो, मोठ्या संख्येने अष्टप्रधान सदस्य आणि शिर्के कुटुंबातील सदस्यांना ऑगस्ट १६८१ मध्ये त्वरित फाशी देण्यात आली

इतिहास लिहिणाऱ्या याच हातांनी, या कारणांमुळे संभाजीराजांना 'एक वाहवत गेलेले व्यक्तिमत्व' म्हणून रंगवले. इतिहासाने या राजाची योग्य ती दखल कधीच घेतली नाही. शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व त्यास एक मजबूत पाया रचून दिला. या पायावर एकतेची, समानतेची व वैभवाची उत्तुंग इमारत बांधण्यास संभाजीराजांनी कंबर कसली होती. या गोष्टी समाजातील काही ठेकेदारांना मात्र खुपत होत्या. त्यातून गद्दारी घडली आणि संभाजीराजांचा अतिशय निर्घृण खून केला गेला.

एक वाद असाही मांडला जातो की, हा खून नेमका औरंगजेबाने केला की अजून कोणी? कारण जर औरंगजेबाने केला असता, तर या प्रकारची शारीरिक हालअपेष्टांची इत्यंभूत माहिती त्याने बाहेर पडू दिली नसती. त्यामुळे, एका विचारधारणेनुसार हा खून संभाजीराजांना विरोध करणाऱ्या एका विशिष्ट गटाने केला. तसे‌ जरी नसले, तरी हा खून गद्दारीमुळे झाला हे निश्चितच. तारीख होती ११ मार्च. हा आजचा दिवस.

संभाजीराजांचे निधन, हा मराठी शौर्याचा एक उत्तम नमुना मानला जातो. या सर्व गोष्टी सांगण्यामागचे कारण असे, की संभाजीराजांचा खून ही अचानक घडलेली एखादी घटना नव्हती. आपण औरंगजेबाचा खूप तिरस्कार करतो. तो तिरस्कार करणे योग्य आहेसुद्धा. परंतु, अण्णाजी दत्तोसारख्या कपटी लोकांना आपला इतिहास माफ करतो. एवढ्या कपटी चाली रचूनसुद्धा त्याच्या नावापुढे इतिहासामध्ये 'जी' लावले जाते. कारण की, तो एका विशिष्ट समुदायाचा होता. ही गोष्ट बदलली पाहिजे.

आजसुद्धा महाराष्ट्रात गद्दारांची कमतरता नाही. संभाजीमहाराजांचा खून हा फक्त मराठी शौर्याचा एक नमुना न राहता, जर त्यातून मराठ्यांनी एकतेचे महत्त्व शिकले व गद्दारांना हाणून पाडण्यास सुरुवात केली; तरच दिल्लीचे तख्त मराठी जनमानसास मान देईल. शत्रूचा द्वेष तो काय करावा, कपट करणे हे त्याचे कर्मच आहे. जर वाईटच वाटून घ्यायचे आहे, तर अशा गद्दारांचे वाटावे ज्यांनी आपल्याच लोकांना तोंडघशी पाडले.

संभाजीमहाराजांचे निधन हा खूप मोठा संदेश आपल्यास देते; आपण तो समजून घेणे अत्यावश्यक आहे.


 लेखन – अमित

• संदर्भ :
१) छावा : शिवाजी सावंत
२) गुगलवरील काही लेख 

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال