ऐतिहासिक गांधी : एक चिकित्सा

[वाचनकाल : ८ मिनिटे] 
महात्मा गांधी, mahatma gandhi

खरंतर आज गांधी या देशाला पुन्हा सांगावे लागतात हेच दुर्दैव आहे. या आधीही मी गांधींजींबद्दल लिहीलंय. पुन्हा तेच सांगायचं नव्हतं. कोणी मला इतिहासात नोंद दाखवा की नथुरामाने कोणा ब्रिटीश अधिकाऱ्याला कानाखाली तरी पेटवली असेल? आहे का नोंद? एवढी देशभक्ती होती तर का ब्रिटीशांविरोधात बंदूक का नाही चालवली त्याने? म्हणजे ब्रिटीशांनी अगणित भारतीयांना फासावर लटकवलं हे योग्य आणि गांधींनी देश हितासाठी आयुष्य घालवलं ते देशाचं नुकसान केलं. ही वृत्ती, हा विचार समर्थनीय आहे का? काहीतरी अर्थ आहे का या वृत्तीला? काही गांधी विरोधी वृत्ती इथे, तिथे हरेक ठिकाणी फोफावल्यात. मुद्दाम एक राजकीय हेतू ठेवून केलेला हा प्रकार आहे.

३० जानेवारी १९४८ – गांधीजींची नथुराम गोडसे नामक माथेफिरूने छातीत तीन गोळ्या झोडून हत्या केली. कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून आपली आठवण करून देतोय!
     आज तुम्हाला सांगायचं होतं की पाश्चिमात्य देशांनी जगाला काय दिलं आणि भारताने जगाला काय दिलं. आणि भारताने जगाला जे दिलं त्यात गांधी हे नाव महत्त्वाचं का आहे . . . साम्राज्यवाद व भांडवलशाही, राष्ट्रवाद, मार्क्सवाद आणि गांधीवाद यावर बोलायचं होतं; पण हे समजायला जरा वेळ लागेल. आधी गांधींनी देशासाठी काय केलं याची पुन्हा आठवण करून द्यावी.
     आता गांधींजींचा जन्म कुठे झाला. पुर्ण नाव काय? वगैरे-वगैरे तुम्हाला माहित असेलच. मी फक्त महत्त्वाच्या घटना आणि त्यांचं भारताच्या इतिहातलं स्थान, त्यांच योगदान काय? जे तुम्ही-आम्ही विसरलोय ते बघू आणि नथुरामचं देशातलं योगदान काय ते तुम्ही बघा!

थोडक्यात – जन्म १८६९. १८८३ ला वकिलीसाठी परदेशात गेले. पहिला लढा दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘फिनिक्स सेटलमेंट’ स्थापन केली. जवळपास २१ वर्षे ते तिथे राहिले. तिथेच त्यांनी सत्याग्रह, सत्य व अहिंसा, हक्कांसाठी आंदोलन या विषयावर अभ्यास केला. १९१५ ला ते भारतात परतले. १ वर्ष विद्यार्थी म्हणून भारतीय समस्यांचा अभ्यास केला. देश फिरले. १९१६ साली साबरमती आश्रमाची स्थापना केली. भारतातील पहिला लढा – १९१७ चंपारण्य, बिहार – निळीच्या जमीन मालकाविरोधात उभारला. १९१८ – खेडा सत्याग्रह गुजरात. १९१८लाच अहमदाबाद मिल मजदूर आंदोलन. यावेळी पहिल्यांदा त्यांची उपोषणाचा प्रयोग केला (भुख हरताल). १९१९ला गांधींनी ब्रिटीशांविरोधात मोठं आंदोलन केल – ते होतं रौलेट ॲक्ट विरोधात.
     या कायद्यानुसार भारतीय क्रांतीकारकांना पुरावा नसताना संशयावरुन किंवा ब्रिटीशविरोधी कारवाई करतोय अशी कोणतीच कारणे न देता धरपकड करून तुरुंगात डांबलं गेलं होतं, निरपराधांनाही छळलं गेलं होतं. म्हणून हे आंदोलन केलं. गांधी म्हणाले ‘हा काळा कायदा आहे’ (काळा कायदा आठवतंय का हल्लीच कुठेतरी ऐकलेलं तुम्ही? जरा जोर द्या आठवेल फार अलीकडेच झालाय उल्लेख)!
     याच दरम्यान देशात अजून एक घटना घडली. १३ एप्रिल १९१९ – जालियनवाला बाग हत्याकांड. याची चौकशी करायला हंटर आयोग नेमला. या घटनेविरोधात गांधींनी ‘केसरी हिंद’ ही उपाधी सोडून दिली. पुरस्कार वापसी गँग म्हणणारे हिणवणारे यांनी जरा लक्ष द्यावं की अन्यायाविरोधात केलेला विरोध म्हणून सरकारी पद किंवा पुरस्कार वापस केला जातो, असो.
     जालियनवाला बाग घटनेनंतर गांधीजींना ब्रिटीशांचा एवढा राग आला की त्यांनी असहकार आंदोलन १९२० ला सुरु केलं. भारतीयांनी ब्रिटीशांना कोणत्याच प्रकारे मदत करु नये. लोकांना आव्हान केलं. एक जन आंदोलन उभ राहीलं. बायकाॅट ब्रिटीश माल (जसं हल्ली बायकाॅट चायना चालू होतं. आणि जसं चायना बायकाॅट जास्त दिवस चालल नाही तसंच) हे असहयोग आंदोलनही चाललं नाही. ब्रिटीशांवर याचा परिणाम हवा तसा झाला नाही. कारण हे होतं की गांधीजी अहिंसावादी होते. त्यांना वाटलं की हा विचार लोकांना बळ देईल की हिंसा न करताही हक्क खेचून घेता येतात; पण १९२२ साली चौरीचौरा येथे आंदोलनकर्त्यांनी पोलीस चौकी पेटवली. ब्रिटीशांचे २२ लोक त्यात होरपळून मेले.
     ‘आपण सुरु केलेलं आंदोलन हिंसक झालं. त्यात कुणाचा जीव गेला’ हे गांधीजींच्या विचाराला पटत नव्हतं. आंदोलन जेव्हा-जेव्हा हिंसक होतं तेव्हा-तेव्हा ते आंदोलन कधीच सफल होत नाही हे गांधींना माहित होतं.
     आता बघा सध्या काय चाललंय. पहिला हल्ला विद्यापीठांवर झाला. विद्यार्थी आंदोलन मोडून काढायला त्यांना हिंसक ठरवलं गेलं. त्यानंतर शाहीनबाग तिथेही अफवा पसरल्या, दंगल झाली. शेतकऱ्यांचं आंदोलन दिड वर्ष चालू होतं तेव्हा त्यांना आतंकवादी, देशद्रोही, पाकिस्तानी, खालिस्तानी नक्षलवादी ठरवलं. त्यानंतर डाॅक्टरांनी आंदोलन केलं – काठ्यांचा वर्षाव करून तोडतोड तोडलं. गेल्या २६ जानेवारीला देशात एका रेल्वेला आग लावली गेली – आंदोलन होतं विद्यार्थी लोकांच. ज्यांनी रेल्वेत रोजगार मिळावा आणि तिथे ज्याप्रकारे धांदलबाजी करून त्यांच्या मेहनतीला पाण्यात बुडवलं गेलं त्याविरोधात ते उभे राहिले. त्यानंतर हे भारत जोडो यात्रा प्रकरण. जिथे द्वेषासाठी सगळे दिवसरात्र एक करत आहेत तिथे एक माणूस प्रेमासाठी साडेतीन हजार किलोमीटर पायी चालत जातो ही सोपी बाब नाही! एवढी आंदोलनं सध्या डोळ्यांसमोर आहेत, असो. आपल्याला काय फरक पडतो? आपण ‘आंदोलनजीवी’ नाही. हक्क मागणं हा आम्ही उगाच देशाला दिलेला त्रास समजतो – हम खुश तो सब खुश.
     हा तर असहयोग आंदोलन असं बारगळलं. ते हवं तसं यशस्वी नाही झालं ब्रिटीशांना दंगलीचं एक कारण मिळालं. तरीही ब्रिटीशांनी गांधीना अटक केली नाही. कारण, माहित होतं जर या माणसाला आत टाकलं तर अजून लोक चौक्या जाळतील! आणि गांधींना याचा त्रास ब्रिटीशांपेक्षा जास्त झाला असता! गांधीनी आंदोलन मागे घेतलं आणि लोक जे ब्रिटीशांच्या विरोधात होते ते गांधींना विचारू लागले आंदोलन माघारी का घेतलं म्हणून? पण ती वेळेची गरज होती. काही लोक म्हणतात की तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं असत. पण हिंसेने भारताचा स्वातंत्र्य इतिहास लिहिला जावा हे गांधींना मान्य नव्हतं. हळवा माणूस तो! दुश्मनालाही दया-धर्म दाखवायला विशाल हृदय लागतं. त्या एका हृदयाची महानता किती होती मोजायला अख्खी जिंदगी जाईल, तर पुन्हा असो.
‌     पुढे १० मार्चला गांधींना ब्रिटीश सरकारने अटक केली. ६ वर्षाची शिक्षा सुनावली. घटना चौरीचौरा मध्ये घडली आणि अटक गांधींना गुजरातमध्ये झाली. गांधीजी म्हणू शकले असते की ‘मी थोडी ती आग लावली?’ पण वैचारिक-नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी हिंसेला समर्थन दिलं नाही. त्याच दरम्यान तुरुंगात ते आजारी पडले. ब्रिटीशांना भीती – हा माणूस जर इथे मेला तर भारतात पुन्हा उठाव होतील – सोडून दिलं. त्यानंतर त्यांनी १९२४ ला पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. नेहरू, पटेल, मौलाना आजाद तत्कालीन काँग्रेस नेत्यांशी बैठकी केल्या. पुढच्या काही काळात गांधींनी देशाच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं.
     करोनापेक्षा जास्त बेकार असा प्लेग त्याकाळी होता. काळा मृत्यू म्हणून त्याला बोललं जात होतं. हे का सांगतोय तर समजावं की तो माणूस काय होता, लोक विसरायला नकोत. प्लेगच्या काळात त्यांनी स्वतः त्या आजारी लोकांच्या जखमांना साफ केलंय! पर्वा न करता की माझं काय होईल! आहे का आता कोणी नेता जो सेवाभाव दाखवेल आणि स्वतः आजारी लोकांच्या जखमांवर औषध लावेल? जो व्यक्ती लंडनला शिक्षण घेतो, वकिली करतो, तो ऐषो-आरामात जगला असता की. कशाला अर्धं उघडं धोतर घालून देश फिरला असता?
     काहीतरी घडत होतं जे त्याला मान्य नव्हतं. अन्यायाला पाठीशी घालणं त्याला जमत नव्हतं. तलवारीच्या धारेवर मान कापण्यापेक्षा त्यांना गळाभेट घेवून मानवतेवर प्रेम करायचं होतं.
     तर दरम्यान, इर्विन नावाचा व्हाईसराॅय होता. त्याला गांधींनी सांगितलं, आमच्या बारा मागण्या आहेत त्या पूर्ण करा. त्याने नाकारल्या. गांधींजीनी मग त्याला दाखवून दिलं की आंदोलन काय असत. १९३० ला गांधींनी दांडी यात्रा काढली – मिठाचा सत्याग्रह. साबरमती, गुजरात ते दांडी प्रवास – पायी चालत निघाले. सुरुवातीला ७८ लोकं होती. दांडीला पोहचता-पोहचता ती वीस हजार झाली! ही ताकद होती त्या माणसाची. १२ मार्च ते ६ एप्रिलचा हा प्रवास होता. २६ दिवस कशासाठी तर मीठावर कर लादला होता यासाठी. मुठीत मीठ उचलून ब्रिटीश सरकारला दाखवून दिली आंदोलनाची ताकद!
     दांडीच्या त्या सत्याग्रहात १९३०ला एक नवीन चळवळ उभी राहिली. १९३० सविनय कायदेभंग चळवळ. ब्रिटीश सरकारच्या कायद्यांना आणि आज्ञेला मानणार नाही म्हणून केलेला उठाव होता तो. या माणसाने अहिंसा हे शस्त्र वापरुन किती सळो की पळो केलं होतं ते बघा. ब्रिटीश हैराण-परेशान होते की हा माणूस शांत का बसत नाही!
     हा इतिहास विसरण्यासारखा आहे का? हे योगदान एका माथेफिरूच्या बंदूकीच्या गोळीतून निघेल का? आता खरी गंमत अशी की जो व्हाईसराॅय होता ज्याने मागण्या मान्य केल्या नाहीत. त्याला ब्रिटीश सरकारने प्रधानमंत्री रॅमजे मॅकडोनल सांगितल की ‘१९३० ला गोलमेज परिषदेत गांधींना बोलवा’. तयारी झाली तिकडे की काँग्रेसचा नेता गांधी येणार आहे, चर्चा करायला. आणि गांधीजींनी गोलमेज परिषदेत जायला नकार दिला. इर्विनचा जो अहंकार होता – सगळा उतरला. आता तुम्ही गाजावाजा करत सांगितलं की पाहूणे येणार आणि पाहुण्यांनी दिली टांग तर हसू होणारच.
      गांधींनी ब्रिटीश सरकार विरुद्ध हा आंतरराष्ट्रीय विरोध नोंदवला, मुका मार दिला. ते पण हात न उचलता. ब्रिटीश सरकारची बदनामी झाली. हसू झालं ते वेगळंच; पण आंतरराष्ट्रीय बैठक तर व्हायला हवी. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत, १९३१ ला, गांधी आपली बाजू मांडायला गेले. आणि हाच तो काळ होता जेव्हा भगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांना फाशी होणार होती. लोकांना माहिती नाही कोणता माहिती स्त्रोत सापडतो. म्हणतात ‘गांधी वकिल होते तर त्यांनी का वाचवलं नाही? तेव्हा खूप सारे वकिल होते. गांधींनी वाचवण्याचा प्रयत्नही केला – लिखित पत्रं आहेत तशी . . .
     आता जरा जहाल मतवाद आणि गांधीजीचा मवाळ मतवाद सांगतो. ब्रिटीशांनी भगतसिंग यांना राजकिय कैदी म्हटलं नव्हतं. गांधींनी पत्र लिहिलं की जेवढे कैदी आहेत त्यांना ब्रिटीश सरकारने सोडून द्यावं; पण भगतसिंगांवर आरोप होता की त्यांनी असेम्बलीत बाॅम्ब टाकून हत्या करण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहिऱ्या सरकारला ऐकायला धमाक्याची गरज होती हे भगतसिंग यांचं म्हणणं होतं. ब्रिटीश मात्र जाणुनबुजून त्यांना आरोपी घोषित करत होते. तो थोडासा वेगळा विषय आहे, फाशीच्या एक दिवस आधी फाशी दिली गेली वगैरे खुप मुद्दे आहेत. मीही गांधींच्या यावेळच्या प्रयत्नांवर आक्षेप घेतो. थोडे अजून प्रयत्न केले असते तर? पण स्वतः भगतसिंग यांनी वकील नाकारला होता. त्यांचा उद्देश सरळ होता ‘मी फाशी जाणार; पण त्याला कारण आहेत’. त्यांनी ते बाॅम्ब टाकण्याआधीच जाहिर केलेलं.
     ‘माझा मृत्यू एक नवी क्रांती आणेल.’ असं तो २३ वर्षांचा पोरगा म्हणाला! लक्षात घ्या जहाल मतवादी भगतसिंग म्हणतो की ‘बंदूकीने किंवा बाॅम्बने क्रांती होणार नाही. क्रांती विचाराने होते!’ आणि मवाळवादी गांधी म्हणतात – १९४२ ला चले जाव आंदोलनात – ‘करो या मरो!’
     महान लोकांच्या काही ठरावीक वक्तव्यांचा वापर करून अशी दिशाभूल करतात लोक. भगतसिंग बंदुकीने क्रांती येणार नाही म्हणतात मग ते मवाळ झाले का? आणि गांधी म्हणतात करो या मरो म्हणजे ते जहाल झाले का? हा खेळ आहे शब्दांचा. एका महान व्यक्तीसमोर दुसरा उभा करा आणि बाॅक्सिंग मॅच करा! विचार वेगळे असले तरी उद्देश बघा काय होता – स्वातंत्र्य! बास! भले सुरुवातीला गांधींनी पूर्ण स्वातंत्र्य मागितले नाही; पण भगतसिंगांनी जी ठिणगी पेटवली, जो विचार मांडला तो तत्कालिन काँग्रेसला पटला. नेहरु, पटेल यांनी गांधींना पटवून दिलं की आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. गांधींनी ते मान्य केलं. म्हणून मी म्हणतो जो स्वतःच्या विचारांना तपासून त्यावर विचार करून बदल करून अनुसरण करतो त्या माणसाचं नाव गांधी! ज्यांना ते ‘बालहट्ट’ वाटतात त्यांनी काय केलं हे इतिहासात नोंद आहेच, असो.
     तर पुढे तिसरी गोलमेज परिषद १९३२ ही दुसऱ्या गोलमेज परिषदेसारखीच गाजली. त्यात ‘मुस्लिम समुदायाला जसं स्वतंत्र मतदार क्षेत्र दिलं तसं दलितांनाही दिलं जावं ही मागणी होती डाॅ. आंबेडकरांची’. मात्र यामुळे देशाचं ध्रुवीकरण होईल म्हणून गांधींना ते मान्य नव्हतं. आता हाही मुद्दा खूप खोलवरचा आहे. आपण थोडक्यात वरवर बघू. या विरोधात गांधींनी उपोषणाला सुरुवात केली. त्यावेळी पुण्यात म्हणजे ‘पुना’मध्ये २४ सप्टेंबर, १९३२ ला गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला. त्याला ‘पुणे करार’ म्हणतात.
‌    त्यानंतर गांधींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. त्यानंतर व्यक्तीगत सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन ब्रिटीश सरकार विरोधात सत्याग्रह केला १९४० ला. त्याला ‘चलो दिल्ली आंदोलन’ही म्हटलं जातं. याचं नेतृत्व कोण करत होतं? तर पहिले सत्याग्रही नेहरू आणि दुसरे होते विनोबा भावे. आणि त्यानंतर गांधींनी १९४२ ला ’भारत छोडो’ आंदोलन केलं. या आंदोलनाने ब्रिटीशांच्या कंबरड्यात लाथ बसली. कारण १९४२ ला पहिलं महायुद्ध सुरु झालं होतं. हिटलरने इंग्लंडला बरबाद केलं होतं. आणि इकडून भारत छोडो अंदोलनामुळे भारतात त्यांना त्रास होऊ लागला . . . इथेच येणाऱ्या स्वातंत्र्याची नांदी रचली गेली . . .
     हा गांधींचा इतिहास आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आज जो ताजा-ताजा वाद देशात होतोय ‘सुभाषचंद्र बोस विरुद्ध गांधी’. गांधींनी बोसांच वर्चस्व कमी करायला बघितलं वैगेरे वगैरे. तर १९४४ ला रंगून मधून रेडीओवर देशाला संबोधन करताना सुभाषबाबू गांधींजीचा उल्लेख करतात ‘राष्ट्रपिता’! दोन महान व्यक्तींना समोर उभं करून देशात त्यांच्या विचारांना संपवण्याचा खेळ सुरु आहे. पटेल-गांधी, सुभाषबाबू-गांधी, भगतसिंग-गांधी, आंबेडकर-गांधी, नेहरू-गांधी असा किती संपवणार तुम्ही गांधीला? किती केविलवाणा प्रयत्न आहे. एक व्यक्ती तुमच्या डोळ्यात एवढा खुपावा? एक दोन नाही तर सहा हल्ले केले त्यांना मारायला तुम्ही! गांधीजींच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणता इतिहासात नोंद दाखवा त्याने काय काय केलं देशासाठी? लिहिण्यासाठी एक ओळ सापडत नाही त्याच्यावर! काही आहे का योगदान नथुरामचं? निदान जनाची नाही मनाची तरी बाळगा!

महात्मा गांधी यांचे पणतू आणि गांधी हत्याकांडावर एक प्रामाणिक पुस्तक (Let's Kill Gandhi) लिहिणारे तुषार गांधी म्हणतात,

हा गोडसेचा कोर्टरूम ड्रामा होता. बापूची हत्या करून आपण हिरो बनू आणि त्याच्या कृत्याशी हिंदू सहमत होतील, असं त्याला वाटलं होतं. जेव्हा त्याला दिसलं की असं होत नाहीय तेव्हा त्याने कोर्टात नाट्य उभं करण्याचा प्रयत्न केला.

हा यांचा इतिहास आहे! आणि फक्त हाच यांचा इतिहास आहे!


• संदर्भ :

• वाचत रहा :



आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال