मिश्टर गांधी

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
महात्मा गांधी, mahatma gandhi


घासून गुळगुळीत केलेले मुद्दे पुढे ठेवले जातात आणि गांधी हत्येचे समर्थन रेटले जाते. स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्या तत्कालीन नेत्यांहून वेगळ्या विचारधारेच्या जोरावर लढलेल्या गांधीजीचे योगदान इथेच संपत नाही. स्वातंत्र्यानंतर भारताला संविधानाच्या पायावर उभी असणारी लोकशाही देण्यातही गांधी होतेच – एकंदरीत इंग्रज गेल्यावर येऊ घातलेल्या धार्मिक राष्ट्राला सुरुंग! वैचारिक मतभेदांचा आत्मबिंदू झालेल्या माणसाचे – जो की मेल्याचे दावे १९४८ पासून सुरु आहेत – प्रतिकात्मक पुतळे आजही मारण्याची गरज का पडत असावी?

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात
आम्हाला गवसला
मंगल पांडे आणि
त्याचा अठराशे सत्तावन्न
नंतर गाजत राहिले
बंगालची फाळणी
काॅंग्रेसची फाळणी
पहिलं महायुद्ध
गदर चळवळ
लखनौ करार
होमरूल
पूर्ण स्वराज्य
टू नेशन थिअरी
हिंदू धर्मसभेची स्थापना
फारसं असं बरंच काही
अँड देन देअर वॉज मिश्टर गांधी

इतर सर्व आले पर्व घेऊन
कोणी परिवर्तनाचा काळ होऊन
तू मात्र गांधीबाबा
युग बनून आलास
तुझ्या नावाने सुरू होणारं
आणि तुझ्याच नावाने संपणारं

स्वातंत्र्याचा स आणि गुलामीचा ग
लोकांनी एक मानण्याचा तो काळ
कारण ब्रिटीशांच्या जाण्याने येणार
मागाहून आपल्यांचीच सल्तनत
हे ठाऊक होतं सगळ्यांना
पण आफ्रिकन सत्याग्रहासह
तू पडद्यावर आलास
आणि घातलास अटकाव
पेशवाईच्या दुसऱ्या पर्वाला
दांडी यात्रेत मुठभर मिठासाठी चालून
जोडून टाकला संबंध स्वातंत्र्याचा तू
सगळ्यांच्या ताटातल्या भाकरीशी स्पष्ट
मग पेटून उठलं हरेक मन मुक्तीसाठी
त्यांना प्रज्वलित करणारी तू ज्योत झालास

स्वदेशीची हाक
आली तुझ्याआधी
डोक्याच्या टोपीपासून
अंगाच्या पायजम्यापर्यंत
काढून फेकलं आगीत सर्व
आणि लोकांनी हसतचं
साजरी केली होळी
ही देशाच्या प्रेमापोटी
संग्रामात उतरलास तेव्हापासून
दर स्वदेशीच्या नावाआधी
लोकांच्या मनात तू येऊ लागलास
आज द्वेषासाठी बॉयकाॅट नियंत्रित करणारे
तूच होतास खऱ्या बाॅयकाॅटचा जनक
हे मान्य तरी करतील का रे

काळाशी सुसंगत नसूनही
काळाहून वेगवान ठरलेल्या
तुझ्या चरख्याची चक्रे फिरत असताना
वारंवार अजूनही कुठेतरी सुरू असतील
गुप्तसभा एकमेकांना मिठाया भरवत
वाटले जातील पेढेही लपून-छपून
गल्लोगल्ली तुझ्या मृत्यूच्या आनंदात
तुला सहा वेळा मारण्याचा प्रयत्न केल्यावर
ही जमात सातव्या वेळेस तू संपलास
असं सांगत फिरते बिनदिक्कत
अनादी-अनंत काळापासून
तू मात्र असतोस उभा
हिंसेचा प्रत्येक रोड शो बघत शांतपणे
अन् जातोस मागोमाग
त्यांनी फैलावलेला कचरा वेचत
कारण तुला संपवण्यासाठी
बरेटाच्या तीन गोळ्या
काफी नव्हत्या
काफी नाहीत
काफी नसतील

• • •

तूही चुकलास मीही मान्य करतो
संतती नियमनासारख्या काही गोष्टी
तुला नव्हत्या मुळातच मान्य
आणि थांबलास तू जातीनिर्मूलनात
हरिजन हे नाव देऊन फक्त
हा तुझ्यावर उमटलेला एक
समकालीन असण्याचा ओरखडा
असेच आणखी काही ओरखडे सोडले तर
डाव्यांनी तुला कडकडून मिठी मारावी
द्यावं आलिंगन अन् कवटाळावं गळ्याशी
असंही नाही आणि उजवे तुला
उभ्या जन्मात कधी मनातून पुजतील
असंही नाही जुन्या-नव्याची नव्या-जुन्याशी
सांगड घालता घालता तू बनलास
या दोन तटांमधून वाहणारा खळाळता झरा
बाकी तू जसा होतास तसा
आणि जसा आहेस तसा
आमची गरज नाहीस
आवश्यकता आहेस
हे कधी कळेल का रे कोणाला

अहिंसेचा जन्म बुद्धिवादातून होत असेल
तर कुठून होतो उगम हिंसेचा
पोराने आईला बापाने पोरीला
भावाने भावाला बहिणीने बहिणीला
जीवे मारण्याचं शेण लोकांच्या डोक्यात
कुठून जन्म घेतं सांगू शकशील का
मला तर काही समजत नाही
समजत नाही काय म्हणाला असतास
तू बाबरीचा विध्वंस पाहून
की जाणवली असती तुला
कारसेवकांच्या पेटत्या रेल्वेची धग
तू मात्र नक्कीच होरपळला असतास
इथून तिथून पेटणाऱ्या
हरेक जातीय दंगलीतून
या दंग्याना बुद्धीवाद शिकवण्याचं
जर कोणी ठरवलंच तुझ्या नावाने
तर त्याला फाडून टाकतील
निम्मा इकडचे निम्मा तिकडचे
अन् करतील कंटिन्यू बलात्कार
एकमेकांच्या आयाबहिणींवर
कवटी-कवटीत चेतलेल्या
सुडाच्या आगीत उघड्या अंगाने
अन् पोलादी छातीने शिरणारा
कोणी उरला नाही आता
म्हणूनच तू निर्भय थोर होतास रे
तुझं सार अहिसां
तुझं सारं काही अहिंसा

तुझ्या हत्येला सांगतात वध
म्हणतात ही लढाई विचारधारेची
मग विचारधारेच्या कोणत्या लढाईत
चालवतात विद्यार्थ्यांवर अंदाधुंद लाठ्या
काठ्या स्मोक बाॅम्ब आणि पेलेट फायर
डाॅक्टर व्यापारी पत्रकार शेतकरी
तुझ्या पद्धतीने सत्याग्रह करणारे
सगळे मोडून पाडले जातात
आणि विचारधारेच्या कोणत्या लढाईत
तिच्या जनकालाच उखाडतात मुळापासून
हे लोक सांगू शकतील का रे

तू होतास स्वच्छतेचा आग्रही
पण फक्त तेच तुझं योगदान नाही
तुला स्वच्छतेचा ब्रँड अँबेसिडर
ठरवणारे विसरतात साफ
तू हटवलेली सामाजिक किड
माणसांच्या मेंदूतून खाली केलेला मैला
आणि त्यांच्या मनावर मारलेला पोछा

जगाला महायुद्धाचे डोहाळे लागलेले
असताना अहिंसेच तू बीज रोवल होतंस
औद्योगिक क्रांतीच्या रोगट वाऱ्यातही
पहा वाढत चाललाय तुझा तो वटवृक्ष
अन् त्याच्या सावलीत विसावणारी गर्दी

• • •

हल्लीचे आम्ही पाहतो
जे दाखवलं जातं मग दिसतो
आम्हाला तुझा छिन्नविछिन्न
जीवनपट कडव्यांनी रचलेला
जालियनवालात वाचलेला गांधी
दांभिक उपोषणे करणारा गांधी
पक्षपात करणारा गांधी
मुस्लिमधार्जिणा गांधी
पोरींबाळींसमवेत गांधी
अय्याश गांधी
बालहट्टी गांधी
गांधी वर्सेस पटेल
गांधी वर्सेस नेहरू
गांधी वर्सेस आंबेडकर
गांधी वर्सेस सुभाषबाबू
गांधी वर्सेस भगतसिंग
५५ कोटींचे बळी
मी नथुराम गोडसे बोलतोय
नथुराम गोडसे ज्ञानदान केंद्र
नथुराम गोडसे वक्तृत्व स्पर्धा
गांधी वर्सेस नथुराम गोडसे
गांधी वर्सेस एवरीथिंग
एवरीथिंग वर्सेस गांधी
हॅशटॅग लेस्ट किल गांधी
वन्स फाॅर अँड ऑल
अँड देन देअर वाॅज मिश्टर गांधी

तू आधी पाहिला नथुरामातला राम
अन् उरलास या सगळ्यांना पुरून उरून
अजूनही सापडला नाही यांना
त्यांच्या टोळीत तुझ्या नावाचा सब्स्टिट्यूट 
आणि म्हणूनच हे फिरतात दारोदार
तुझ्या नफरतीचा कचरा वाटत
ओला वेगळा सुका वेगळा
यांनी अर्धवट मनाने प्रत्येक भिंतीवर टांगलेल्या
तुझ्या तसबीरीत तू मात्र नुसताच हसत असतोस
का कशासाठी काय तुझ्या हसण्याचं प्रयोजन
का मग हे आहे नियोजन सर्वांना
तुझ्या हसण्याचा संसर्ग देण्याचं
तुझ्या संसर्गजन्य हास्याची लागण होण्याआधी मात्र
लवकरच हिंसेचा हिंस्त्र प्रलय येईल
सगळं होईल जमीनदोस्त बुडापासून फक्त
तुझी हरेक तसबीर तरंगत राहील वरचेवर
मग नोआहच्या नावेप्रमाणे
तीला धरून राहिलेल्या प्रत्येकाला
तू तारून नेशील सुरक्षित ठिकाणी
एका नव्या युगात आणि
मला माहिती आहे गांधीबाबा
त्याही तसबीरीत तू हसतच असशील

• • •

• संदर्भ :

• वाचत रहा :

 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال