स्त्री स्वास्थ्य भाग – ५ (स्तनांचा कर्करोग – ३)

[वाचनकाल : ४ मिनिटे] 

स्त्री डॉक्टर आणि कॅन्सर दिवस, lady doctor on cancer day
इतर कर्करोगांप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगांच्याही चार अवस्था (स्टेजेस) असतात.


स्तनांचा कर्करोग हा विषय जितका गहन आणि मोठा आहे, तितकाच त्रासदायक आणि दुर्लक्षितसुद्धा. वेळीच ओळखता न आल्याने एकदा का कर्करोगाचे आक्रमण शरीरावर झाले की त्याला परतावून लावणे, अशक्य नाही पण, कर्मकठीण आहे. परिणामी कर्करोगाचे आक्रमण हे मानसिकसुद्धा असते! शक्यतो इतक्या शारीरिक - मानसिक हालअपेष्टांमधून जाण्याची वेळ येऊच नये यासाठी आधीपासूनच दक्षता घेणे आवश्‍यक असते. ही दक्षता घेता येईल वाचनातून मिळालेल्या माहितीतून . . .

स्तनाचा कर्करोग हा खरं तर स्तनाच्या पेशींमध्ये निर्माण होणारा कर्करोग आहे. कर्करोग सामान्यतः ‘लोब्युल्स’ (Lobules) किंवा स्तनाच्या नलिकांमध्ये (Ducts/Tubules) विकसित होतो. ज्या ग्रंथींमध्ये दूध असते त्यांना ‘लोब्युल्स’ म्हणतात आणि ग्रंथींमधून स्तनाग्रांपर्यंत दूध पोहोचवणाऱ्या वाहिन्या ‘नलिका’ म्हणून ओळखल्या जातात.
स्तनातील फॅटी टिश्यू किंवा तंतुमय संयोजी ऊतिकांमध्येदेखील कर्करोग होऊ शकतो. अनियंत्रित कर्करोगाच्या पेशी अनेकदा इतर निरोगी स्तनाच्या ऊतींवर (Tissues) आक्रमण करतात आणि हाताखालील लिम्फ नोड्स (Lymph Nodes) पर्यंत जाऊ शकतात. थोडक्यात – कर्करोगाच्या पेशींना शरीराच्या इतर भागात स्थलांतरित होण्यास मदत करणारा प्राथमिक मार्ग म्हणजे लिम्फ नोड्स’.
कुठलाही कर्करोग जर सुरूवातीच्या अवस्थेतच लक्षात आला, तर वेळीच उपचार करून पूर्ण बरा करता येऊ शकतो. त्यासाठी सावध राहणे अतिशय गरजेचे. जितका ओळखायला उशीर होईल, तितकाच कर्करोग बळावत जातो व समस्या वाढत जाते. या कर्करोगाच्या अवस्थांविषयी जाणून घेऊया . . .

स्तन कर्करोगाच्या अवस्था (Breast Cancer Stages)

इतर कर्करोगांप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगांच्याही चार अवस्था (स्टेजेस) असतात. पहिल्या अवस्थेत कर्करोगाची गाठ ही २ सेमीपेक्षा लहान असते. तीच दुसऱ्या स्टेजमध्ये २ ते ५ सेमी होते. तिसऱ्या स्टेजमध्ये ५ सेमीपेक्षा मोठी बनते. जर ही गाठ खाली छातीच्या स्नायूला किंवा त्वचेला चिकटलेली असेल, तर तिला चौथी अवस्था म्हणतात. त्याचबरोबर माळांसारख्या किती गाठी काखेत आहेत त्यावर कर्करोगाची अवस्था ठरवली जाते. साधारणतः काखेतील माळ ही तिसरी स्टेज असते आणि हाच आजार जर दुसऱ्या अवयवांमध्ये म्हणजे फुफ्फुसांत, हाडांत  व मेंदूत पसरला गेला असेल तर त्यास चौथी अवस्था म्हटले जाते.

स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार

स्तनाच्या कर्करोगाचे दोन प्रमुख वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते:
१) इनव्हेसिव्ह/आक्रमक (Invasive)
२) नॉन-इनव्हेसिव्ह/इन सिटू (Non Invasive)

इनव्हेसिव्ह कर्करोग स्तनाच्या नलिका किंवा ग्रंथींमधून स्तनाच्या इतर भागात पसरतो. नॉनइनव्हेसिव्ह कर्करोग मूळ ऊतींमधून (Primary Tissues) पसरत नाही. या इनव्हेसिव्ह,  नॉनइनव्हेसिव्ह कर्करोगात पुन्हा दोन उपप्रकार पडतात – डक्टल कार्सिनोमा आणि लोब्युलर कार्सिनोमा.

इनव्हेसिव्ह/आक्रमक

• डक्टल कार्सिनोमा स्थिती :
इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा (IDC) हा स्तनाच्या कर्करोगाचा सर्वात प्रचलित प्रकार आहे. हा स्तनाच्या दुधाच्या नलिकांमध्ये सुरू होते आणि नंतर स्तनाच्या आसपासच्या ऊतींवर आक्रमण करतो. त्यामुळे इतर अवयवही ग्रासित होऊ शकतात.

• लोब्युलर कार्सिनोमा स्थिती :
इनवेसिव्ह लोब्युलर कार्सिनोमा (ILC) प्रथम स्तनाच्या लोब्युल्समध्ये उद्भवतो व नंतर आसपासच्या ऊतींवर आक्रमण करतो.

नॉन-इनव्हेसिव्ह/इन सिटू

• डक्टल कार्सिनोमा स्थिती :
‘डक्टल कार्सिनोमा इन सिटू’ (DCIS) हा नॉन इनव्हेसिव्ह कर्करोग आहे. DCIS मध्ये कर्करोगाच्या पेशी स्तनातील नलिकांपुरत्या मर्यादित राहतात आणि त्यांच्या सभोवतालच्या स्तनाच्या ऊतींमध्ये प्रवेश करत नाहीत.

• लोब्युलर कार्सिनोमा स्थिती :
‘लोब्युलर कार्सिनोमा इन सिटू’ (LCIS ) हा असा कर्करोगाचा प्रकार आहे, जो स्तनाच्या दूध उत्पादक ग्रंथींमध्ये विकसित होतो.

[लोब्युल आणि नलिका (डक्ट) यांतील फरक वर स्पष्ट केला आहे. लोब्युल्स म्हणजे दुध असणार्‍या ग्रंथी आणि नलिका म्हणजे स्तनाग्रांपर्यंत (Nipples) दूध पोहचवणाऱ्या वाहिन्या]

स्तनाच्या कर्करोगाचे उपचार (Breast Cancer Treatment)

स्तनाच्या कर्करोगात, त्याची अवस्था किती पुढे गेली आहे आणि गाठ किती मोठा झाली आहे या गोष्टी कोणत्या प्रकारच्या उपचाराची आवश्यकता आहे हे ठरवण्यात कळीची भूमिका बजावतात.
उपचार करण्यासाठी डॉक्टर कर्करोगाचा आकार, स्तर आणि ‘ग्रेड’ (म्हणजे तो वाढण्याची आणि पसरण्याची शक्यता किती आहे ते अनुमान) ठरवतात. त्यानंतर वैद्यकीय पर्याय शोधले जातात. स्तनाच्या कर्करोगावरील सर्वात लोकप्रिय उपचार म्हणजे शस्त्रक्रिया (Surgery). याखेरीज;

१) किमोथेरपी (Chemotherapy)
२) लक्ष्यित थेरपी (Targeted Therapy)
३) रेडिएशन (Radiation Treatment)
४) हाॅर्मोन थेरपी (Hormonal Therapy)

यासारख्या अनेक अतिरिक्त उपचारपद्धती स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत. रोगाच्या अवस्थेनुसार या दोन-तीन उपचारपद्धती मिळवून उपचार केले जातात.

• रेडिएशन (किरणोत्सर्ग) थेरपी :

उच्च-शक्तीच्या रेडिएशन बीमचा वापर कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना रेडिएशन थेरपीने मारण्यासाठी केला जातो. बहुतेक रेडिएशन थेरपीसाठी बाह्य बीममधून विकिरण (किरण सोडण्याची प्रक्रिया) पध्दत वापरली जाते. शरीराच्या बाहेरील बाजूस, एका प्रचंड संगणकाचा उपयोग करत, हे किरण सोडले जातात.
कर्करोगाच्या उपचारातील प्रगतीमुळे डॉक्टरांना शरीरातून कर्करोगाचे विकिरण करण्याची परवानगीदेखील मिळाली आहे. किरणोत्सर्गी उपचारांच्या या प्रकाराला ‘ब्रेकीथेरपी’ म्हणतात. ब्रॅकीथेरपी करण्यासाठी कर्करोगाच्या गाठीजवळ शरीरात छोट्या किरणोत्सर्गी गोळ्या ठेवतात. थोड्या काळासाठी, गोळ्या तिथेच राहतात आणि कर्करोगाच्या पेशी मारण्याचे काम करतात.

• किमोथेरपी :

इतर उपचारांसह, विशेषत: शस्त्रक्रियेसह, ह्या उपचारपध्दतीचा उपयोग औषधांद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी केला जातो. काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर रुग्णांना किमोथेरपी देतात. अपेक्षा अशी असते की औषधाने गाठ संकुचित होईल आणि नंतर शस्त्रक्रिया इतकी आक्रमक होणार नाही. मात्र किमोथेरपीचे अनेक अनपेक्षित दुष्परिणामही आहेत.सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे डोक्यावरील संपूर्ण केस जाणे.

स्तन कर्करोगाच्या उपचारपद्धतीमध्ये भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आता पूर्वीप्रमाणे पूर्ण स्तन काढण्याची गरज नसते. स्तन संवर्धन शस्त्रक्रिया करून फक्त कर्करोग असलेला भाग काढता येतो. यामुळे स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. तसेच वैवाहिक व सामाजिक जीवनात संकोचल्यासारखे होत नाही. आजार बरा झाल्यानंतर आनंदी आयुष्य जगणे सोपे होते.
उपचार हे रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे यावरून ठरवले जातात. तिसऱ्या अवस्थेतील कर्करोग हे मुख्यतः शस्त्रक्रिया करून बरे केले जातात. पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत स्तनाचे संवर्धन करतात; पण स्तन संवर्धन प्रक्रियेमध्ये क्ष-किरणांचे उपचार (X-ray Treatment) घेणे आवश्यक असते. तसेच आपण जनुकीय चाचणी (Genetic Test) करून रुग्णाला किमोथेरपीपासून वाचवू शकतो. मात्र ज्यावेळी कर्करोग परत होण्याची शक्यता असते तेव्हा किमोथेरपी (Chemotherapy) किंवा हार्मोनथेरपी (Hormone Therapy) दिली जाते. चौथ्या अवस्थेत किमोथेरपी, हार्मोनथेरपी किंवा टार्गेटेडथेरपी (Targeted Therapy) दिली जाते. (टार्गेटेड म्हणजे ज्या भागात कर्करोग झालाय तोच भाग.)
जनुकीय तपासणी करून ठरवले जाते की या सर्व थेरपींमधील कोणती थेरपी रुग्णाला देण्याची आवश्यकता आहे. आज किमोथेरपीच्या (Chemotherapy) शास्त्रातही भरपूर सुधारणा झाल्या आहेत. सध्या पूर्णतः वेदनारहित व कोणताही दुष्परिणाम न होता किमोथेरपी देणे शक्य होते. एखाद्या रुग्णाला किमोथेरपीची गरज भासल्यास ती साधारणतः ६-८ वेळा द्यावी लागते. मात्र प्रत्येक वेळेस हातातील नसेतून किमोथेरपी देणे त्रासदायक होते. बऱ्याच वेळा नसा सापडत नाहीत किंवा हाताला सूज येणे, हात दुखणे असे त्रास होतात. अर्थात आजकाल हे सर्व टाळून वेदनारहित किमोथेरपीही देता येते. त्यासाठी किमोपोर्ट (Chemoport) नावाचे साधन वापरले जाते.
किमोपोर्ट हे छोटीशी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या छातीवरील स्नायूत बसवतात व त्याची नळी मानेतील रक्तवाहिनीत सोडली जाते. यानंतर सर्व औषधे किमोपोर्टच्या चेंबरमधून दिली जातात. यामध्ये कुठेही हाताला सुई लावण्याची गरज नसते. ही पूर्णतः वेदनारहित पद्धत आहे. तसेच रूग्ण हाताचा वापर करू शकतात व आपली सर्व कामे पूर्ववत करू शकतात.
अशाप्रकारे स्तन कर्करोग उपचारानंतर संपूर्ण बरा होऊ शकतो.

सजग रहा, स्वस्थ रहा.


✒ लेखन - जुईली
मेल

संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू

वाचत रहा :
१) स्त्रीस्वास्थ्य (सर्व भाग)
२) झुंजार ती (लेखमाला)
३) डॉक्टर रखमाबाई (लेख)


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال