[वाचनकाल : ११ मिनिटे]
पंधरा जन्म घेतले तरी आशासारखं गाता येणार नाही; पण नशिबाने त्या कविता लिहीत नाहीत! आणि त्यांनी कधीही कविता कविता लिहू नये. माझं दुकान चालू द्यावं! |
सुरेश भट. ज्या नावाने मराठी गझलांची घोडदौड सुरू झाली ते नाव. अद्वितीय प्रतिभा, चिकाटी आणि जीवनाला धरून राहण्याची जिद्द असलेल्या या अनभिषिक्त सम्राटाच्या वाट्यास कायमच उपेक्षा आणि वंचना आली ती, काव्यवाचनात बिगारी आणि काव्यलेखनात जुळारी, असणाऱ्या काही प्रस्थापितांकडून. मात्र ज्यांना भट कळले त्यांच्याकडून फक्त आदरयुक्त प्रेम . . .
शेर सुचला तर पुढे सरकायचं नसतं. जोपर्यंत पहिला शेर ज्या उंचीचा आहे, तेवढ्याच ताकदीचा दुसरा शेर येत नाही तोपर्यंत!
अमरावतीत अशाच कोण्या एका दुपारी कोपऱ्यावरचा अण्णा चक्कीवाला त्याच्या बासरीवर कसल्याशा स्वरांना वाचा फोडण्याच्या प्रयत्नात होता. तिथल्याच शेजारच्या कट्ट्यावर दोन कान बासरीतून उमटणाऱ्या त्या स्वरांचा अनुवाद करता येईल का याचा ‘कानोसा’ घेत बसलेले . . . त्याचं असं आहे की कधीकधी स्वरांतून काव्य जन्माला येतं, तर कधीकधी काव्यातून स्वर!
दोन दणकट हाकांत अण्णा चक्कीवाल्याची तंद्री भंग करून त्याला तो बासरीवर आळवत असलेल्या रागाची विचारपूस झाली. वास्तविक हे विचारणारा, अण्णा चक्कीवाल्यास लाभलेला तात्कालिक श्रोतादेखील शास्त्रीय गायन व संगीतकलेची बर्यापैकी जाण असणारा. मात्र त्या रागाची ओळख त्यास पटत नव्हती – भटियार. रागाचं नाव सांगून अण्णा चक्कीवाल्याने बासरीला पुन्हा छेडलं. आणि लगोलग त्या स्वरांचा काव्यानुवाद त्या श्रोत्याच्या डोक्यात उगवू लागला – मालवून टाक दीप चेतवून अंग अंग . . .
‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ ही एक ओळ तर जमून आली. या पुढची द्विपदी व मुखडा लिहून तयार व्हायला तब्बल सहा महिने गेले. नंतर हव्या त्या शब्दांच्या तुटवड्यामुळे हे काम पुन्हा बंद पडलं. या कामाची धरसोड होत होती आणि तो सुद्धा शब्दांसाठी धडपडत होता. शेवटच्या काही अंतऱ्यांसाठी तर तो अक्षरशः लढला. अशाने मग ‘मालवून टाक दीप’ पूर्ण व्हायला ‘अवघी’ तीन वर्षे गेली!
गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, यासाठी संयमाने एकाच रचनेचा तीनेक वर्षे पद्धतशीररीत्या पाठपुरावा करणारा अण्णा चक्कीवाल्याचा तो श्रोता म्हणजेच मराठी काव्यजगतातील जीवन‘गाणे’ – सुरेश भट . . .
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
• • •
मराठी हा शब्द स्त्रीलिंगी आहे; पण तरीही मराठी ही सर्वांची बाप आहे!
साल १९५४-५५. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागलेली. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मराठीवरचं निरामय प्रेम आणि तिच्या अस्मितेचा जाज्वल्य अभिमान उरात भरून मराठीचा भार आपल्या खांद्यावर असल्याच्या अंतर्गत प्रेरणेतून सुरेश भट कित्येक आंदोलनांमध्ये उतरले परिणाम – कारागृहाच्या वार्या आणि नावावर काही चंद फौजदारी गुन्हे! मात्र तरीही मराठीवरचं हे प्रेम कमी होणं तर दूरच, याउलट नंतरच्या काळात द्विगुणित झालं.
‘उर्दूची नजाकत मराठीला नसते’ वगैरे बाष्फळ लोणकढी थापा मारणाऱ्यांसाठी भट ‘आपल्या आईचं दूध आपल्याला पिता येत नाही यात आईचा दोष कसा? हे तर बाळ म्हणून आपलं करंटेपण!’ इतकंच सांगतात.
भट आयुष्यभर मराठीचं महत्त्व व स्वतंत्र अस्तित्व शब्दातून कमी आणि प्रतिभेतून जास्त अधोरेखित करत राहिले. ‘हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ हे गीत तर नंतरचं; पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात असताना चोविसाव्या वर्षीच भटांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ लिहिली होती. यातच त्यांची मराठीवरील प्रगाढ श्रद्धा दिसून येते.
साय खातो मी मराठीच्या दुधाची,
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?
• • •
पटले न जगाशी माझे साऱ्यांना नडलो आहे,
मजलाच अचंबा वाटे मी कैसा घडलो आहे?
सुरेश भटांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर गावचा – साल १९३२. भट हे जरी मूळचे ब्राह्मण कुटुंबातले असले तरी आसपासच्या वातावरणामुळे त्यांच्यावर सर्व प्रकारच्या संस्कृतीत व भाषेत मिसळण्याचे संस्कार आपोआपच झाले. सिद्दिकी नावाच्या कोण्या मित्राच्या संगतीने व त्या मित्राच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी उर्दूही शिकून घेतली. इथेच गझल या काव्यप्रकाराची व त्यांची भेट झाली.
भटांचे वडील शल्यविशारद, त्यांना संगीताची व पत्नीला – म्हणजे भटांच्या आईला – कवितांची खूप आवड. ही आवड आनुवंशिकतेने भटांच्याकडे आली असं म्हणावयास हरकत नसावी. वयाच्या साधारण अडिचाव्या वर्षीच भटांना पोलिओचं निदान झालं आणि त्याचमुळे आयुष्यभर त्यांचा उजवा पाय अधू राहिला. पोलिओनं शालेय जीवनात खेळांमध्ये भाग घेण्याची त्यांची स्वप्नं भंग पावली.
पुढे वडिलांनी त्यांना बाजाची पेटी आणून दिली. लवकरच त्यांना शास्त्रीय गायन, संगीत आवडू लागलं. पुढे भविष्यात त्यांनी बासरी, तबला व ढोलकी वादन सुद्धा शिकून घेतलं. अधू उजव्या पायाला भीक न घालता भटांनी सायकल, भालाफेक, तलवारबाजी यातही हात आजमावून पाहिला हे विशेष! व्यायाम करण्यात सुद्धा भट भल्या-भल्यांना मागे सारत!
शालेय जीवनात उत्कृष्ट म्हणावी अशी फारशी काही कारकीर्द भटांना लाभली नाही. मॅट्रिकच्या परीक्षेत, नंतर इंटरमिजिएटच्या परिक्षेत व अंती बीएच्या परीक्षेतही ते दोनदा नापास झाले होते. मात्र नंतरच्या आयुष्यात त्यांनी अशी काही ‘फिनिक्स’ भरारी घेतली की त्यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह तीन विद्यापीठांत ‘एमए’साठीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. १९८६ साली गडचिरोलीत झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
‘कविता आणि भट’ हे समीकरण तसं फार पूर्वी जुळून आलेलं होतं; मात्र ‘गझल आणि भट’ हे समीकरण जुळण्यासाठी साधारण १९५३ साल उजाडलं. प्रसिद्धी पासून जवळपास पंचवीसेक वर्षे दूर राहिलेल्या भटांनी मध्यंतरीच्या काळात कित्येक व्यवसाय पडताळून पाहिले मात्र कुठे जम बसला नाही. फार नंतर त्यांनी अमरावतीत शिक्षकी पेशातसुद्धा नोकरी केली. या धडपडीच्या काळात व नंतरही त्यांनी कवितेचा हात सोडला नाही किंवा कवितेने त्यांचा!
१९६५ साली भटांचा विवाह झाला. पुष्पा व सुरेश भटांना दोन मुले व एक मुलगी. यातील हर्षवर्धन नावाच्या मुलाचा दुर्घटनेत मृत्यू झाला आणि वयाच्या उत्तरार्धात पोहोचलेल्या भटांना मुलाच्या मृत्यूचं दु:ख झेलावं लागलं.
अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही,
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही
• • •
नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं.
साहित्य क्षेत्रातील भटांची वाटचाल सुरू झाली १९६१ साली – त्यांचा ‘रूपगंधा’ आल्यावर. या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पहिला गेला कुसुमाग्रजांना. दुसरा काव्यसंग्रह ‘रंग माझा वेगळा’ साल १९७४. त्यानंतर त्यांनी १९८३ साली प्रकाशित केला ‘एल्गार’ हा गझलसंग्रह.
यात ‘रूपगंधा’ भटांच्या दृष्टीने अगदीच अपरिपक्व ठरला असला, तरीही काव्यजगतात हा काव्यसंग्रह खूप मोलाचा राहिला. ‘रंग माझा वेगळा’ प्रेमात न्हाऊन निघाला. यातील बव्हंशी गझला या प्रेमाचीच कोणतीतरी किनार धरून चालतात. तर ‘एल्गार’ सर्वांगीण भाष्य करणारा एकमेवाद्वितीय असा गझलसंग्रह म्हणून प्रसिद्धीत आला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झालेल्या कारावासाने भटांना नोकऱ्यांपासून वंचीत ठेवलं. परिणामी त्यांच्या आयुष्यातील निर्णायक सात-आठ वर्षे आर्थिक विवंचनेत गेली. १९७० साली ‘सत्यकथा’च्या संपादकांच्या विनंतीने त्यांनी त्यांचं साहित्य ‘सत्यकथा’मध्ये पाठवायला सुरूवात केली. पुढे नागपूरला जाऊन त्यांनी १९७५ ते १९७९ पर्यंत ‘बहुमत’ नावाचं साप्ताहिक चालवलं.
‘एल्गार’ नंतर १९९४ साली ‘झंझावात’ नावाचा गझलसंग्रह प्रसिद्ध झाला. यात शृंगार, प्रेम, वैफल्य ते विद्रोह सर्वांचं प्रकटीकरण वेगवेगळ्या गझलांतून सापडतं. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘काफला’, ‘सप्तरंग’, ‘झंझावात’, ‘सुरेश भटांची निवडक कविता’, ‘रसवंतीचा मुजरा’, ‘हिंडणारा सूर्य’ असा एकूणच भटांचा साहित्यिक प्रवास आहे.
सुरेश भटांची चोपडी अथवा काव्यसंग्रह पंडित हृदयनाथ मंगेशकरांना कोणत्यातरी दुकानात अथवा फुटपाथवर कोठेतरी मिळाला होता. त्यानंतर मंगेशकरांनी भटांना शोधून काढलं व त्यांच्या गझलांना व कवितांना प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. या प्रसंगाची थोडीशी दंतकथा बनल्याने नक्की काय घडलं होतं हे कळण्यास मार्ग नाही.
भटांनी आणि आणखी एका कवीने मिळून, वेगवेगळ्या कवींनी लिहीलेल्या, भटांच्या शंभर आवडत्या गझलांचा संपादीत गझलसंग्रह सुद्धा प्रकाशित केलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा सुरेश भटांवर होता. साहजिकच त्यांनी काही भीमगीतेदेखील लिहिली.
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना,
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
• • •
पंधरा जन्म घेतले तरी आशासारखं गाता येणार नाही; पण नशिबाने त्या कविता लिहीत नाहीत! आणि त्यांनी कधीही कविता कविता लिहू नये. माझं दुकान चालू द्यावं!
गीतकार म्हणून सुरेश भटांचं मराठी चित्रपट सृष्टीवर खूप मोठं ऋण आहे. काही गीते आपण सहजतेने गातो, ऐकतो; मात्र ती सुरेश भटांनी लिहिली आहेत हे शोध घेईपर्यंत लक्षात येत नाही इतके भट मराठी चित्रपट संगीतात मुरलेले आहेत. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘आज गोकुळात रंग’, ‘मेंदीच्या पानावर’ अशी कित्येक गीते आजही मनामनात रेंगाळत राहतात.
‘तरूण आहे रात्र अजुनी’ हे गीत वाचूनच लाजल्याची आठवण आशा भोसले सांगतात. तर दुसरीकडे ‘उषःकाल होता होता’ या गीताला चढलेलं स्फुरणसुद्धा त्यांना आठवतं. भटांच्या लेखणीचा स्वैर संचारच आहे हा बाकी काय? कोणत्याही विषयावर काव्य किंवा गझल केली जाऊ शकते तेही सर्वोत्तम धाटणीत हे जितकं खरं आहे तितकंच ही कला भटांना अवगत होती हेही!
भटांचं काव्यलेखन एकीकडे आणि त्यांची काव्यवाचन प्रतिभा दुसरीकडे असं ते एकंदर प्रकरण आहे. गहन काव्यलेखन व त्याचं दर्जाचं उस्फुर्त काव्यवाचन हे दोन्ही गुण एकाच ठिकाणी सापडले सुरेश भटांमध्ये. शास्त्रीय गायनाचे धडे गिरवलेला पहाडी व भला गंभीर आवाज आणि तासंतास मैफिलीला खुर्चीत बांधून ठेवणारी त्यांची लाघवी ओघवती वाणी . . .
भटांची काव्यवाचन शैली कानांतून मनात उतरते ती पुन्हा बाहेर न निघण्यासाठीच! ‘रंग माझा वेगळा’ व ‘एल्गार’ नावाचे त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर केलेले जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रम आजही वेगळे ठरतात ते यामुळेच. कोणत्याही गझलेला उत्सव बनवून टाकण्याचं सामर्थ्य भट बाळगून होते. एकदा का माणसाला कलेची भूक लागली की ती भागता भागत नाही. ‘रंग माझा वेगळा’ या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांनी त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवून दिले.
‘इतकेच मला जाताना’, ‘अद्यापही पुरेसा’, ‘दीपदान’, ‘चंद्र आता’, ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल’, ‘हारलेले डाव’, ‘तोरण’, ‘यार हो’, ‘कापूर’, ‘साय’, ‘आभार’, ‘रंगात रंगूनी’ या आणि अशाच काही भट साहेबांच्या समृद्ध आवाजातील अतिसमृद्ध गझला ऐकल्या आणि त्या मैफिलीत एका खुर्चीवर आपण नसल्याचा पश्चाताप झाला नाही असा कोणी नसावाच. जर असेलच त्याच्याकडे संगीताचे ‘कान’ नाहीत इतकेच काय ते सत्य शिल्लक उरेल!
मात्र वास्तवात भटांच्या मैफिली या मंचावर कमी आणि त्यांच्या घरी जास्त जमल्या. नागपुरात त्यांच्या घरी आलेल्या चाहत्यांच्या ‘स्वागतासाठी दाराबाहेर उभे राहिलेले भट’ आणि नंतर ‘घरात गझल गायनाची पर्वणी देणारे भट’ ही जोडगोळी ज्यांनी प्रत्यक्षात उपभोगली त्यांच्या सुखाची किंमत त्यांना तरी त्यावेळी कळली असेल असं वाटत नाही. आलेल्या क्षणात माणूस तसही जगतोच कधी?
आणि यातील काही बोटांवर मोजण्याइतक्याच मैफिली ध्वनिमुद्रित झालेल्या आहेत हे आपलं दुर्दैव म्हणू नये तर दुसरं काय?
आपल्या दु:खामुळे लोकांची करमणूक होऊ द्यायची नसते.
• • •
शब्द हे टरफलांसारखे असतात. शब्दांपेक्षा शब्दांच्या आत जे दडलेलं असतं ते जास्त महत्त्वाचं!
वैयक्तिक आयुष्यात – समाजात ज्या वृत्ती दुर्गुण म्हणून कुप्रसिद्ध आहेत त्या – भटांनी गुण म्हणून वागवल्या. बेफिकीर वृत्ती, परखडपणा, परिणामांची चिंता न करता राखलेला स्पष्टवक्तेपणा, सतत प्रवास, पुरोगामी विचार आणि विद्रोही स्वभाव . . . हे गुण तर कोणत्याही कलंदर माणसाची पहिली ओळख. हे गुण भटांत नसते तर नवलच; किंबहुना याच गुणांमुळे त्यांच्या मित्रांचा कमी व शत्रुंचा गोतावळा जास्त!
भटांभोवती कायमच अहंकाराचं एक वलय भिरभिरत राहिलं. त्यांच्या स्वाभिमानाच्या अतिरेकाला दुरभिमान समजलं गेलं; मात्र तरीही त्यांनी त्यांचा हेका कधीही सोडला नाही – हेही अपेक्षितच होतं म्हणा!
शतप्रतिशत साहित्यिक असणाऱ्या भटांना खत्रुड स्वभावासोबतच काही ‘असाहित्यिक’ सवयी होत्या! उदाहरणार्थ, कायम तंबाखू खाणे आणि ती तंबाखू तोंडातून काढून फेकल्यानंतर तेच बोट शुभ्र(?) बनियनला पुसणे! सामाजिक क्षेत्रात प्रेमावर कवने रचणाऱ्या कवीसाठी ज्या शब्दांवर बंदी आहे ते शब्द भटांच्या जिभेवर रूळत. उदाहरणार्थ कोणी म्हणालं की ‘भट बरीच वर्षे तुम्ही काही लिहिलं नाही’ किंवा ‘इतकं कमी का लिहिलंत?’ तर यावर ‘कविता ही होत असते ती कुंथून हागायची नसते’ असलं उत्तर भटांकडून मिळायचं!
असणाऱ्या अशा विविध ‘आभूषणांमुळे’ भट कविजगताकडून कायम अव्हेरले गेले. मंचावर ज्याचे खरे मानकरी तेच होते, अशा मानापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं. याच्याने भटांच्या प्रस्थापितांविरोधात तीव्र विरोध उमटण्याशिवाय बाकी काही घडलं नाही कारण . . . वाचकांनी आणि श्रोत्यांनी त्यांच्यावर करायचं ते प्रेम केलंच!
परंतु अशा या स्वभावाला अनुसरून माणूसघाणं राहणं त्यांनी पसंत केलं नाही. प्रत्येक चाहत्याला ढिगाने लिहिलेली पत्रे तर त्यांच्या विशाल हृदयाची साक्ष आहेतच; पण वैचारिक मतभेद असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनासुद्धा त्यांनी पत्र लिहून भेट घेण्याची इच्छा दर्शवली होती.
त्यांचा परखडपणा, स्पष्टवक्तेपणा, पुरोगामित्व आणि विद्रोह त्यांच्या काव्यात उतरले आणि अजरामर झाले!
मी खरे बोलून जेव्हा पाहिले,
हा टाळाया . . . तो पळाया लागला
• • •
मी कोणी सम्राट वगैरे नाही. तुम्हीही मला सम्राट म्हणू नका!
सुरेश भट आणि गझल या विषयावर आता शेवटी बोलूयात. भट साहेबांच्या वैयक्तिक आयुष्याचा ऊहापोह संपला की त्यांची साहित्यिक कारकीर्द सुरू होते आणि त्यांची साहित्यिक कारकीर्द सुरु झाली की गझलांचं पर्व सुरू होतं. गझल तशी मराठी साहित्याला नवीन नव्हती. माधव ज्युलियन आणि इतर मोजक्या कवींनी मराठीत गझल रूजविण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र जेव्हापासून भट गझल लिहू लागले तेव्हापासून मराठी गझलेनं बाळसं धरलं. मराठी साहित्यात ‘भटांच्या पूर्वी’ आणि ‘भटांच्या नंतर’ असे दोन कालखंडच निर्माण झाले. तिसरा कालखंड अजून तरी निर्माण व्हायचा आहे! म्हणजेच भटांची गझल अजूनही प्रमाण समजली जाते.
हासिल, हजल, रुबाई आणि तिची २४ वृत्ते भट साहेब जितक्या सहजतेने श्रोतृवृंदास समजावून सांगतात; तितकं दुसरं कोणी सांगू शकत नाही. गझल सादरीकरणासाठी ‘गझलपठण’ आणि शेरांसाठी ‘द्विपदी’ हे पर्यायी मराठी शब्दसुद्धा त्यांचेच.
भटांच्या गझलांमध्ये शब्दांची पुनरावृत्ती आहे खरी; मात्र दर वेळी त्या शब्दाचा मायना बदलून जातो. म्हणूनच त्याचा वाचकांवर होणारा अपेक्षित परिणामसुद्धा बदलतो. त्यांच्या ‘एल्गार’ या संग्रहाने गझलपर्व एका वेगळ्याच दर्जाला नेऊन पोहोचवलं. ‘गझलकारांची गीता’ म्हणून प्रसिद्ध असलेला ‘एल्गार’ वाचला, तरीही भट मराठी साहित्यातील एक अजरामर कवी का आहेत हे आकळून येतं.
जो मुळातच सम्राट नसतो त्याने ‘मला सम्राट म्हणू नका’ हे ओरडून सांगण्यात काही मजा नसते. याउलट जो सम्राट असूनही ते पद नाकारतो तो त्याचा मानकरी असतो! या एका अर्थाने आणि त्यांचा साहित्यिक प्रवास पाहता त्या अर्थाने भट हेच गझलांचे अनभिषिक्त सम्राट आहेत हे खरं.
गझल म्हणजे माझं व्यसन आहे. ती माझी कमजोरी आहे. ‘तू मन शुदी, मन तू शुदम’ अशी आमची स्थिती आहे. म्हणजेच तू माझी झालीस आणि मी झालो.
• • •
गीतात थोडीफार सवलत असते. मात्र गझलेत तसं नाही. गझलेत सहजता आणि तिच्या शब्दांत ताकद दोन्ही हवं.
भटांची गझल ही वेगवेगळ्या प्रकारात विभागता येईल. सामाजिक, प्रेमपर, आत्मचिंतनात्मक, तत्वज्ञानी, पुरोगामी, विद्रोही, विरहाची मार्मिकता दाखवणाऱ्या, जीवनाचं मर्म सांगणाऱ्या अशा कितीतरी प्रकारांत त्या विभागता येतील. कोणतीही अशी भावना नाही, जिला भटांची कोणती ना कोणती गझल स्पर्शून जाणार नाही असं ते प्रकरण आहे.
• प्रेमातील अतर्क्य कृतींचा कबुलीजबाब द्यायचाय?
मी हात प्रेमाने जरासा दाबला होता,
जरा ऐकून घे, माझा इरादा चांगला होता!
• प्रेमात लटका राग साजरा करायचाय?
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे,
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
• प्रेमातील नकार मांडायचा आहे?
राग नाही तुझ्या नकाराचा,
चीड आली तुझ्या बहाण्याची
• प्रेमातील त्यागाची परिभाषा जाणायचीये?
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला,
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले
• प्रेमातील दग्याचा जाब विचारणे आहे?
चुंबिलास तू माझा शब्दशब्द एकांती,
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
• विरहाच्या क्षणांना अत्युच्च पातळीवर कवटाळायचंय?
कुठलेच फुल आता मजला पसंत नाही,
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
• या मायावी जगाचं प्रारूप आकळायचं आहे?
ही सुखाच्या इंद्रजालाची जादू,
पिंजर्याला आकाश मानती रावे
• स्वभाव अधोरेखित करायचाय?
जे न बोलायाचे तेच मी बोलतो,
मीच माणूस नाही भला यार हो
• दोन ओळींत व्यक्त व्हायचंय?
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे,
मी मात्र थांबून पाहतो - मागे कितीजण राहिले?
• नशीबाने दिलेला दगा असह्य होतोय?
पुन्हा पुन्हा चूक तीच मी करीत गेलो,
तुझा खुनी हात जीवना मी धरीत गेलो
• आयुष्याची धग पोहचविणे आहे?
काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी!
• जीवनात आलेल्या नामुष्कीला शब्दरूप द्यायचंय?
पीत मी गेलो जरी पेला रिकामा,
झिंगण्याचे हाय बोभाटेच होते!
• एकटेपणा खायला उठलाय?
उत्तरे जेव्हा दिली नाहीत कोणी,
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो
• मरणोत्तरही ज्या बाबी घडतील त्या वर्तवायच्यात?
पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले,
चितेवरी लोक जे नको ते न गेले
• दुनियेचा स्वार्थ शब्दात गुंडाळायचाय?
कसा मी रडू? हे कसले लोकही,
स्वतःचेच डोळे पुसू लागले
• अखेरचं अंतिम सत्य बोलायचंय?
आज ह्या वेड्या मनाचा जोगिया गाऊन झाला,
दूरच्या हाकेप्रमाणे ऐकतो आता स्वतःला
• गतआयुष्यातील चुकांची कबुली द्यायचीये?
प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो!
प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी
• काळाच्या प्रवाहास छेडणाऱ्यांना तंबी द्यायचीये?
दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली,
अजूनी न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली
• पुरोगामी विचार रूजवायचाय?
लोक हो आकाशवाणी भाकरी देत नाही,
देव केव्हा माणसांशी बोलला आहे खरे?
• विद्रोह गायचाय?
गटारात खुपसून माना सूर्य शोधती जे,
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
• देशाला गिळंकृत करणारी जातीव्यवस्था?
माणसे नाहीत या देशात आता
सांगतो जो तो स्वतःची जात आता
‘भिंत खचली कशी’, ‘पाठ’, ‘नाते’ ‘पादुका’, ‘आज बेडा पार बांडू’ या गझला तर मिळवून वाचाव्यात. भटांच्या गझलेत वैयक्तिक आयुष्याचे धागेदोरे चमत्कारिकतेने गोवलेले असतात. जोपर्यंत माणूस त्याचं ‘अ’माणूसपण सोडणार नाही तोवर या गझला तंतोतंत लागू पडतील.
पुढे गाव जेव्हा दिसू लागले,
लुळे पाय माझे रुसू लागले
• • •
मी इन्स्टाॅलमेंटने खरं बोलत नसतो!
पुरोगामी असणं, विद्रोही असणं हे फक्त भटांच्या लेखणीतील सामर्थ्य बनून राहिलं नाही, तर त्यांच्या वास्तविक जीवनातही उतरलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन व त्यांना गुरू मानून, श्रद्धास्थान मानून आयुष्याच्या अंतिम वर्षात भटांनी धर्मांतर करून बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि . . . ‘बोभाटा म्हणजे कीर्ती नव्हे’ म्हणणाऱ्या भंटांनी जातानाही त्यांच्या अगणित शत्रूंचे दात त्यांच्याच घशात घातले!
विझून माझी चिता युगे लोटली तरीही,
विझायचे राहिले निखारे अजून काही
• • •
सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा!
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा!
एकदाही मनासारखा तू
न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा!
खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा!
रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा!
काय मागून काही मिळे?
का तुला गीत माझे कळे?
व्यर्थ हा अमृताचा वसा!
• • •
जीवना तू तसा, मी असा!
तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा!
एकदाही मनासारखा तू
न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा!
खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा!
रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा!
काय मागून काही मिळे?
का तुला गीत माझे कळे?
व्यर्थ हा अमृताचा वसा!
• • •
✒ लेखन - रंगारी
✆ मेल
संदर्भ :
१) संगीत : भट साहेबांचे निवडक कार्यक्रम
२) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) वॉाकमन (लेख)
२) अनवट येसुदास (लेखमाला)
३) वाणीजयराम : ऋणानुबंधाच्या गाठी (लेख)
{fullWidth}✆ मेल
संदर्भ :
१) संगीत : भट साहेबांचे निवडक कार्यक्रम
२) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) वॉाकमन (लेख)
२) अनवट येसुदास (लेखमाला)
३) वाणीजयराम : ऋणानुबंधाच्या गाठी (लेख)