अनवट येसुदास - भाग ५

[वाचनकाल : ७ मिनिटे] 

येसुदास, भारतीय गायक, yesudas indian singer
गुलजारच्या शब्दांना जिवंत करत मनाला पुन्हा एकदा दहा वर्षांचं लहानगं, निर्मळ, नाचरं मूल बनवू शकतो तो केवळ हाच आवाज.


येसुदास – भारतीय चित्रपटसृष्टीस आणि संगीतास लाभलेला एक अद्वितीय आवाज . . . या माणसाची कित्येक गाणी आपण नकळत ऐकलेली असतात आणि मनोमन त्या गीतांचा संबंध दुसऱ्या गायकाशी जोडलेला असतो, तरीही तो वाईट मानत नाही . . . तो गातच राहतो . . . 'अनवट येसुदास' या गायक येसुदासच्या जन्मदिनानिमित्त त्याचा सांगितीक प्रवास अलवारपणे उलगडून दाखविणाऱ्या लेखमालेतील हा अंतिम भाग पण . . . येसुदासचं काना-मनात रूंजी घालणं ते अंतिम नाही. याउलट त्याचं ते गुणगुणत राहणं पश्चात मनाला अधिक भिडेल अशी ही अनवट लेखमाला . . .

निव्वळ गाणी ऐकण्यासाठी वारंवार मनुष्यजन्म घ्यावा‌ अशा अलौकिक ताकदीच्या रचना येसुदासच्या आवाजात अजरामर झालेल्या आहेत. उदाहरणार्थ,
 
का करू सजनी, आए न बालम . . .
खोज रही हैं पिया परदेसी अंखियां, आए ना बालम!
है मतवाली प्रीत हमारी, छुपे ना छुपाए,
सावन हो तुम, मै हूं तोरी बदरिया, आए न बालम!
 
१९७७ साली 'स्वामी' सिनेमात येसुदासच्या आवाजात रेकॉर्ड झालेली ही ठुमरी आजही तितकीच ओलसर वाटते. कलेचा हा अप्रतिम नमुना खरोखरच बडे गुलाम अली यांच्या मूळ रचनेला तितकाच भव्य कुर्निसात आहे.
 
भोर भई और सांझ ढली रे, समयने ली अंगडाई . . .
यह जग सारा नींदसे हारा, मोहे नींद न आई . . .
मैं घबराऊ, डर डर जाऊ, आए वह-न आए . . .?
 
या शब्दांत पडद्यावर शबाना आझमीच्या भरल्या डोळ्यांपुढे तरळणारी अफाट यातना येसुदासनं आपल्या व्याकुळ सुरांनी कण न् कण टिपली आहे. या अमूर्त तडफडाटापुढं तबला-बासरी-गिटार हा सारा वाद्यवृंद निस्तेज ठरतो. येसुदासच्या स्वरांसह काळाचा पट सरकताना दिसतो फक्त प्रेयसीच्या हातात हळुवारपणे साडी ठेवणारा नि कमरेत हात घालून तिला आपल्या बाहूंनी फुलासारखी उचलणारा उमद्या चेहऱ्याचा 'तो' . . . जो आता हाकेपलीकडं गेलाय, कदाचित कायमचाच.
 'दिलके टुकडे टुकडे करके मुस्कुराके चल दिए' अशी गझलविश्वातल्या प्रेमिकेची निष्ठूर अदा! तिच्याविना, तिच्यानंतर चंद्र-तारे-फूल कशातच मन रमत नाही आणि भिजल्या राती अंगांग जाळणाऱ्या ऋतूत कसं जगायचं हे तर तिनं शिकवलेलंच नाही.
 
इक बुतसे मोहब्बत करके मैंने यही जाना है,
समझाएसे जो ना समझे, दिल ऐसा दीवाना है . . .
उसका गम जीको लगे तो . . ‌. जगका कोई गम नहीं,
चले पांव दिलोंपे रखके, उसकाही जमाना है!
 
ह्यातलं हरेक सत्य 'त्याला' पचवून जगत राहायचं आहे. प्रीतीविण मन म्हणजे बिनवासाचं चंपाफूल हे मान्य असूनही तेच फूल आपल्या घरी सजवण्याचा हट्ट मनाला का बरं सोडवत नसेल? असे उत्तरं नसलेले कैक प्रश्न 'त्याला' जन्मभर कुरतडत राहणार आहेत.
 
उलफतकी नई मंजिलको चला तू बाहें डालके बाहोंमे
दिल तोडनेवाले, देखके चल, हमभी तो खडे है राहोंमें
 
या साध्यासुध्या ओळींनी मन हादरून जायचं तसं काही कारण नाही; पण,
 
क्या क्या जफाए दिलपे सहीं,
पर तुमसे कोई शिकवा न किया . . .
इस जुर्मकोभी शामिल कर लो
मेरे मासूम गुनाहोंमें!
 
हे चरण पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझं मन बेसावध होतं. चटका बसला.
 
जब चांदनी रातोंमें तुने
खुद हमसे किया इकरार-ए-वफा
फिर आजही क्यों हम बेगाने
तेरी बेरहम निगाहोंमें . . . ?
 
ह्या ओळी ऐकायला हृदय ताळ्यावर नव्हतं. ज्या आवाजात यत्किंचितही भग्नता-विकलता नाही, तो आवाज इतकी ताकद आणतो कुठून?
येसुदासचा सर्वात महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे त्याच्या अनुपम स्वरातली अंगाईगीतं. विख्यात अंध संगीतकार रवींद्र जैन यांनी 'मला जर माझी दृष्टी कधी परत मिळाली तर मी बघेन अशी पहिली व्यक्ती म्हणजे येसुदास!' असे उद्गार का काढले असावेत ह्याचं उत्तर इथं मिळतं.
१९८८ साली सिनेविश्वानं डोक्यावर घेतलेल्या गोविंदानं तद्दन व्यावसायिक सिनेमाची वाट सोडून एकदम निराळाच दाक्षिणात्य सिनेमा पाहिला नि त्याचा रिमेक करायचं ठरवलं. रोल होता कचऱ्याच्या ढीगात काकडत पडलेल्या एका छोट्याश्या मूकबधीर मुलाला दत्तक घेऊन सांभाळू पाहणाऱ्या एका चित्रकार तरूणाचा. आपल्या चॉकलेट हिरोच्या प्रतिमेमुळं अर्थातच चोहोबाजूंनी कडाडून झालेला विरोध मोडून काढत गोविंदानं हे धाडस दाखवलं आणि 'हत्या' या पिक्चरनं इतिहास रचला. या सिनेमात एक प्रसंग आहे.
 गोविंदा ऊन-ऊन वरणभात भरवत असताना हा बच्चू अचानक ताटावरून उठतो आणि पळत बाहेर अंगणातल्या भर पावसात जाऊन थांबतो. गोविंदा छत्री घेऊन बाहेर पाहतो, तर तिथं पोर्चमध्ये बाळ मांडीवर जोजवणाऱ्या आईच्या निर्जीव श्वेत पुतळ्याला हा निष्पाप जीव बिलगलेला. त्याला उचलून आत आणून उबदार टॉवेलनं पुसावं, तर तो त्याच टॉवेलनं गोविंदाचेही ओले केस पुसू पाहतो. पार्श्वभूमीवर अंगाई वाजत राहते . . .
 
जिंदगी महक जाती है,
हर नजर बहक जाती है,
ना जाने किस बगियाका फूल है तू मेरे प्यारे . . .
 
इथं ५-६ वर्षांपूर्वी जन्मतः गमावलेल्या, आपल्या हातातही न घेता आलेल्या तान्ह्या बाळाची आठवण येऊन गोविंदाचे डोळे एकदम पाणावतात आणि व्हायलिन-वीणा-मँडोलीनच्या तालावर येसुदासचे स्वर पाझरू लागतात,

 

तेरा मेरा दर्द का रिश्ता, देता है दिल को सहारे
आ रा रू, आ रा रू . . .

कितीही मोठे झालात तरी 'धिस साँग स्टिल् हिट्स यू हार्ड'! 

'तेरी भोली मुसकानोंने मुझे बाबुल बना दिया' हे फारसं ऐकिवात नसलेलं गाणं ऐकत असताना माझं पाऊल असंच अडखळलं ते या ओळींपाशी;

तूही मेरी जुहीकी कली और तूही मेरी सोनचिरैया,
तुझको पाकर मिल गई जैसे मेरी बिछड़ी मैया . . .
 
काय असतं 'बाप' होणं म्हणजे? मैथुनप्रक्रियेचा अनिवार्य परिणाम? चिमुकल्या हातांनी राकट पर्वताला पाश घालावेत आणि ते नाजूक बंध तोडण्याची त्याची हिंमत होऊ नये असा एखाद्या पुरूषाचा 'बाबा' होण्याचा प्रवास येसुदास इतक्या करूण सुरांत कसा बांधू शकतो?
 
कोई गाता, मैं सो जाता,
संस्कृतीके विस्तृत सागरपर,
सपनोंकी नौकाके अंदर,
सुखदुखकी लहरोंपर उठके
बहता जाता, मैं सो जाता . . .
 
आंखोंमें भरकर प्यार अमर,
आशिष हथेलीमें भरकर,
कोई मेरा सिर गोदीमे
रख सहलाता, मैं सो जाता . . .
 
मेरे जीवन का कारा जल,
मेरे जीवन का हालाहल
कोई अपने स्वरमे मधुमय
बरसाता, मैं सो जाता . . . .
 
तत्त्वज्ञानाची इतकी सुरेख बैठक आणि कारूण्याचं इतकं हेलावून टाकणारं दर्शन एखाद्या अंगाईत असू शकतं? दुबईच्या एका संगीतकार्यक्रमात अब्जाधीश उद्योगपती बी. आर. शेट्टीनं येसुदासच्या अशा दैवी सुरांना भुलून त्याला तिथल्या तिथं चक्क 'रोल्स रॉयस सिल्व्हर स्पिरिट' भेट दिली यात नवल ते काहीच नाही.
 येसुदासच्या स्वर्गीय आवाजानं 'किसे खबर कहा डगर जीवनकी ले जाएगी', 'तुम्हें कैसी मिली है जिंदगी', 'मधुबन खुशबू देता है', 'तेरी छोटीसी इक भूलने सारा गुलशन जला दिया'  सारख्या जीवनगाण्यांना एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला आहे.
 
सूरज न बन पाए तो, बनके दीपक जलता चल!
फूल मिले या अंगारे, सचकी राहोंपे चलता चल!
 
किंवा
 
गाओ मेरे मन,
चाहे सूरज चमके रे चाहे, लगा हो ग्रहण!
 
यांसारखी ध्येयवादी आशागीतं असो की,
 
बीती हुई रातकी, सुनाती है कहानी,
यह सुबह सुहानी!
कलियोंका बचपन, फुलोंकी जवानी,
यह सुबह सुहानी!
 
अशी बावरी प्रभातधुन, कितीतरीदा ही गाणी गुणगुणत तुम्हाला कधी अंतर्मुख होऊन स्तब्ध बसावंसं वाटतं, तर कधी गालातल्या गालात हसावंसं वाटतं.
 
पलकोंपे चलते चलते जब उंघने लगती हैं,
सो जा, आंखे सोती है, तो उडने लगती हैं!
सौंधेसे आकाशपे नीले बजरे बहते हैं,
पांखीजैसी आंखें सपने चुगने लगती हैं!
 
पियानोच्या मधुर सुरांसह 'दायरा' फिल्ममधलं हे गाणं तर खास येसुदासच्या स्वर्गीय आवाजासाठीच घडलंय. 'पिघली हुई है गिली चांदनी' या गुलजारच्या शब्दांना जिवंत करत मनाला पुन्हा एकदा दहा वर्षांचं लहानगं, निर्मळ, नाचरं मूल बनवू शकतो तो केवळ हाच आवाज.
'सुरमयी अंखियोंमें नन्हामुन्हा एक सपना दे जा रे . . .' हे 'सदमा' चित्रपटातलं येसुदासचं एक जरामरणविहीन गीत. ही फक्त अंगाई नाही, ह्यात उभ्या जन्माचा असह्य तडफडाट कमल हसनसारख्या चतुरस्त्र अभिनेत्यानं केवळ डोळ्यांतून व्यक्त केला आहे.
 
निंदियाके उडते पाखी रे, अंखियोमें आजा साथी रे!
रा री रा रूम, ओ रा री रूम . ‌. .
सच्चा कोई सपना दे जा, मुझको कोई अपना दे जा
अंजनासा, मगर कुछ पहचानासा!
हलकाफुलका शबनमी, रेशमसेभी रेशमी . . .
 
इथं मांडीवर केव्हाच झोपी गेलेल्या श्रीदेवीला थोपटता थोपटता कमल हसन आता स्वतःच्या थकल्या मनालाच जणू आपल्या कातर सुरांनी थोपटतोय. अपघातात सापडून स्मृतिभ्रंश होऊन मनानं लहान झालेली श्रीदेवी त्यानं चक्क कुंटणखान्यात सापडता सापडता वाचवून घरी आणलेली. कधीतरी ही बरी होणार, कदाचित आपलं अस्तित्व पार विसरणार. कदाचित ही कधीही बरी होणार नाही, पण आपल्या मनात तिच्याविषयी फोफावत चाललेला अनुराग कधी समजूही शकणार नाही. आपल्या अस्पर्शित, अनासक्त प्रीतीचा रंग भगवाच हे तो उमजून आहे. तो तिच्यासारखा लहान होऊ शकणार नाही नि ती त्याच्यासारखी मोठी. पण हे स्वप्नवत निरागस प्रेम क्षणभंगुर ठरलं तर . ‌. . तो ते सहन करू शकणार नाही, सहन करू शकणार नाही! त्याला हे स्वप्न संपायला नको आहे, नको आहे!
 
रातके रथपर जानेवाले, नींदका रस बरसानेवाले,
इतना कर दे कि मेरी आंखे भर दे,
आंखोमें बसता रहे, सपना यह हसता रहे . . .
 
इतकी आर्त आराधना मी कधीही ऐकलेली नाही. निद्राधीन श्रीदेवीकरता तो 'रा री रा रूम, ओ रा री रूम' गुणगुणतो, तेही चक्क कपाळाच्या बटा मागं सारून आईनं थोपटून झोपवावं तसं आश्वासक भासतं. पण मग नंतरची ती अंतःकरण चिरत जाणारी याचना काय फक्त निद्रादेवीपाशी? की प्रत्यक्ष परमेश्वरापाशी?
 
कहासे आए बदरा . . . हो, घुलता जाये कजरा . . .
पलकोंके सतरंगी दीपक,
बन बैठे आंसूकी झालर,
मोती का अनमोलक हिरा, मिट्टीमें जा फिसला!
 
हे माझं सर्वात आवडतं गीत. रोजच्या धकाधकीच्या रूटीनमध्ये वन्स इन् अ व्हाईल, एका जगावेगळ्या मितीत पाऊल ठेवायचं असेल तर हे गाणं आवर्जून ऐकलंच पाहिजे. तंबोरा, तबला आणि रूणझुणत्या नुपुरांच्या तालावर येसुदास शब्दांमध्ये बघता बघता प्राण ओतत जातो,
 
नींद पियाके संग सिंघारी,
सपनोंकी सुखी फुलवारी,
अमृतका प्याला जैसे विषमें बदला . . .
 
हे आर्त बोल खरं तर अंतःकरण पिळवटून टाकणारे, काळजावर सपासप घाव घालत राहणारे . . .
पण एव्हाना माझ्या आसपास येसुदासच्या अमर्त्य सुरांनी रिंगण धरलेलं असतं, मला मायेनं गोंजारत भोवताली जाडसर कवच पांघरलेलं असतं. आता शब्दांतल्या वेदना सुरांच्या गर्दीतून वाट काढत माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विकल मनावर एक दाट सय चढलेली असते, एकेक जखमेवर आपल्या स्वरानं हलकेच मलम चोळत हा गंधर्व गात राहतो, लहान मुलीला कानगोष्ट ऐकवावी तसं मला या गंधर्वानं बोट धरून स्वप्नांच्या दुनियेत नेऊन सोडलेलं असतं आणि, किमान त्या दुनियेत तरी, मला कितीतरी महिन्यांनी एक शांत, तृप्त, कृतज्ञ झोप लागलेली असते.
संपूर्णत: स्वप्नविहीन . . .

 
 लेखन – सायली
 

• संदर्भ :

१) छायाचित्र : टाकबोरू
 
• वाचत रहा :
 
 

1 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. Lahanpani vadilanni Yesudas aikaychi saway lawli, tape recorder war. Mag nantar haluhalu te aikna Ani Yesudas, donhi vismrutit gele. Tumhi parat ekda Yesudas chi navyane olakh karun dilit. Lahanpani te shabd samajnyachi kuwat navhati, pan to awaj Ani lay manat ghar karun hoti. Tumchya lekhmaletun tar Yesudas kayamcha manat korla gela, kharach thanks, itkya sundar likhanasathi.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال