[वाचनकाल : ३ मिनिटे]
एकीकडं ह्या हाफ तिकीटामुळं संतूनाना सुखावला हुता तर पप्या मातूर घाईला आला हुता. |
ताई-माई-अक्कांनी ‘पक्का’ विचार करावा यासाठी निवडणुकांचं बिगुल वाजताच त्यांना आकर्षित करणाऱ्या बहु सवलती जाहीर होतात. अतार्किक ‘रेवड्या’ वाटपाची स्पर्धा लागल्याने सध्या ‘हाफ तिकीट’ मौसम सुरू आहे. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘गाठीभेटी’ यांच्या लाटांत आता गृहीणीस सिलेंडरची किंमत आणि वाढत्या महागाईचा विसर पडल्यास नवल नाही . . .
फकाफक फुकून सहावी विडी संतूनानानं विझवली आणि जरा निवांत कट्ट्यावर विसावला. हे एक वंगाळ वेसन. कुणी इचारणारं नसलं कि संतूनाना असा फकाफक विड्या फुकतो. ट्यांशन आलं तरी फुकतो नि ट्यांशन गेलं म्हणून तर जास्तच फुकतो. फुकनेवालों को फुकने का बहाना चाहिए! संतूला बहाना मिळालाय. त्याच्या मागची राधाक्काची कटकट सुटली. अं हं म्हंजे राधाक्का गचकली नाय काय! तशी ती संतू नानाच्या तेराव्याचं जेवूनच जानार हाय. सध्या फकस्त यस्टीचं हाफ तिकीट झाल्यामुळं राधाक्का फिरस्तीवर हाय. पर जाऊन जाऊन जाणार कुठ्ठं? तर लेकीच्याच गावाला. आजकाल घरात जेवलं तरी हात धुवायला राधाक्का लेकीच्या घरात पोचती! जेवली नसली तर घरात मिशरी भाजून दात घासायला लेकीच्या अंगणात असती! आजवर तिच्या लेकीचं लै हाल झालं म्हनं. म्हंजे असा राधाक्काचा समज. बाकी राधाक्का जशी तिथं जायला लागली तसं लेकीच्या सासूनं घर सोडलं. तिला बी हाफ तिकीट लागू झालं ना! पर काय बी असो संतूनाना खूश हाय. तेच्या मागची ब्याद एवढ्या सस्तात टळली (म्हंजे कालपतूर जिथं पन्नास रुपै लागायचं तिथं पंचवीस रुपयेच लागत्यात आता!) म्हणून संतूनाना जाम खूश हाय.
“काय नाना . . . चांगलं खाटक्याच्या बकऱ्यावानी नटलंईस कि . . .”
कट्ट्याव बसायला आल्याला वडापवाला पप्या उगाच खोचकत म्हणला तशी नानाची समाधी भंग पावली.
“पप्या आज काय गाडी भरली न्हाई वाटतं.” अंगावर पडल्याली पाल वरच्यावर झटकावी तसं नाना पप्याला झटकत बोलला. त्याला तेच्या रंगाचा भंग नको हुता. अजून एखाद दुसरी विडी तेला शिलगावत ठेवायची हुती आणि पप्या मातूर त्यावर पाणी वतनार हेची नानाला खात्री हुती.
“काय सांगायचं नाना . . . गाडीच भरंना. रोज चार ट्रिपा व्हायच्या तिथं कशाबशा दोन हुयात.” पप्यानं आपलं रडगाणं मांडलं.
“अस्का? माणसास्नी प्रवास आवडंना झालाय का काय?”
आता आलंय अंगावर तर घ्यायचं शिंगावर म्हणून आपलं नानानं काय तरी इचारलं.
“तसं नाय गा नाना. प्रवास सुरुच हाय. पर वडापकडं कोण ईना. समदे हाफ तिकीटाकडं पळाय लागल्यात. आता निस्ती बाप्या बाप्यांची गाडी भरुन आमचा धंदा चालणाराय का?” पप्यानं आपल्याला नेमका बोचणारा काटा कुठं सलतोय ते नानाला दाखवून दिलं.
एकीकडं ह्या हाफ तिकीटामुळं संतूनाना सुखावला हुता तर पप्या मातूर घाईला आला हुता. पप्याची वडापची गाडी ह्या आधी अशी रेचून भरायची. भाजी इक्कायला चालल्याल्या वत्सला काकूच्या बुट्टीखाली हात घालून त्या बुट्टीला आधार देतानं चौघल्याचा शिरपा तात्या असा मोराच्या पिसाऱ्यावानी फुलून यायचा. वत्सला काकू बी मग लाजून भाजीचा एकेक देठ खुडत बसायची. सुताराची पिंकी आणि गावड्याचं चिंट्या हेंची चोरट्या नजरेची झोंबाझोंबी पप्याला अगदी गाडीच्या आरशात सप्पय दिसायची. ह्या घटना आता ह्या हाफ तिकीटामुळं इतिहास जमा झाल्या. वत्सला काकू आता भाजी इक्काय जाती पर शिरपा तात्या उगाच चावडीम्होरं घिरट्या घालत बसतो. पप्याच्या गाडीत उदास बसलेला चिंट्या आता ‘जानी जिगरजानी मन’ हे गाणं बदलून ‘अब तेरे बिन जी लेंगे हम्म’ असलं काय तरी लावाय सांगतो. उबग आलाय पप्याला. यस्टीचा संप चालू हुता तवा ह्याच पप्यानं व्हात्या गंगेत हात धू-धू धुतलं हुतंत. आता तेच निस्तराय आलंय.
“पप्या एक आयड्या दिऊ का तुला? तू बी तुज्या वडापचा रेट निम्म्यावर आण. म्हंजी सगळी परत तुझ्याकडं येत्यात बग.” संतूनानानं काय तरी सल्ला द्यायचा म्हणून दिला. कारण या निम्म्या रेटमुळं तेला मिळणारं सुख गमवायचं न्हवतं.
“खुळा का काय संतूनाना. अगा डिझेलच दर किती वाढल्यात! वडापचा रेट कमी करुन परवडणार का?” पप्या आता काकुळतीला आला हुता.
“मग आता ह्यावर काय तोडगा काढशील?” नानानं इचारलं.
“तसा तोडगा काढलाय मी.” पप्यानं डोळं मिचकावत सांगितलं.
“कसला तोडगा?” नाना आता बुचकळ्यात.
“कसाय नाना . . . हिकडं बायकांचं तिकीट हाफ केलंय नि तिकडं गॅसचं दर वाढीवल्यात. आता मी रोज आमच्या बायकूला यस्टीनं पाठीवतो माहेरला. तिकडं ती जाती आणि माझा रोजचा डबा घिऊन येती. म्हायेरचे लोक भेटल्यामुळं बायको खूश. आयता डबा मिळतो तर मी खूश आणि घरचा गॅस वाचतो तर आमची फ्यामिली खूश! हेला म्हणायचं ‘सबका इकास’. आता कशाला वडापची वडाताण कराय पायजे?” हसत हसत पप्या बोलला नि संतूनानानं मातुर डोसक्याव हात मारून घेतला . . .
✒ लेखन - जान्हवी
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) बजेट एक वांदा (लेख)
२) पुढारी (लेख)
३) जगण्यातला राम : तुकाराम (लेख)
{fullWidth}✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) बजेट एक वांदा (लेख)
२) पुढारी (लेख)
३) जगण्यातला राम : तुकाराम (लेख)