[वाचनकाल : १ मिनिट]
मृत्यू विनाकारण होत असतो. ज्याचे कारण सापडते तो खून! खून निसर्गाने केलेला, आजारांनी केलेला, आपल्यांनी-परक्यांनी केलेला, सुडाने, माणसाने, जनावराने केलेला किंवा अतिविचार, चिंतेत गुरफटून माणसाने स्वतःचा केलेला खून! खून आताशा इतके सर्रास झालेत की आपण त्यांना मृत्यू समजून दुर्लक्ष करत राहतो. त्या पक्ष्याचा मात्र मृत्यू झाला किंवा मग खून किंवा काहीही किंवा खेळ . . .
आपलं ठीक आहे, कानात सूं-सूं आवाज तरी येतो! जिथं जायचंय तिथं लवकर पोहचता येतं, आजूबाजूच्या लोकांनाही बघायला मस्त वाटतं . . . पण या डंपर वाल्यांचं काय आहे? त्यांनी ट्रंक अंधाधुंद पळवायचं काय कारण?
गल्ली बघा, रस्ता बघा, त्याची लांबी-रुंदी बघा. नाहीच झालं तर निदान माणसं तरी बघा . . .
तुफान 'रायडर' अंगात घुसतो यांच्या कारण, डंपर कशालाही कोणालाही धडकला तरी यांना काही होणार नसतं. हे अज्ञान आहे की ज्ञान? काहीही असलं तरी यात यांचं सुख असल्याप्रमाणे हे डंपर धडाड् पळवत राहतात.
आपण तर ठरवलंय त्यामुळे की, डंपर दिसला की आधी बाजूला सरकून त्याला निघू द्यावं – जा बाबा!
पक्षी हल्ली अजूनच कमी झालेत. झाडं नाहीत, मोकळं आभाळ नाही, बागडायला रानं नाहीत, मोकळी मैदानं नाहीत, अन्न-पाणी मिळणं अवघड, गोंगाट इतका की किलबिलाट ऐकवायची सोय नाही, पहावं तिथे नुसत्या सिमेंटच्या झोपडपट्ट्या प्रदीर्घ . . . त्यांनी तरी कुठं जायचं म्हणा. बहुदा त्यांनी जावं – मरून जावं . . .
दिसेल त्यावर तो मनाशीच बोलत निघाला होता कुठेतरी. वेळ दुपार आणि संध्याकाळच्या मध्यात – म्हणजे शक्यतो दुपारच.
काय ही पोरं पण रस्त्याच्या मधोमध खेळतील! हा टेनिस बाॅल जर न पाहता मी अशा वेगात यावरून गाडी घातली असती तर सटकलो असतो बेकार! आणि काही कळायच्या आतच सगळं झालं असतं शांत-शांत . . .
त्यानं आजूबाजूला पाहिलं, बाजूच्या झोपडपट्टीतून कोणीच चेंडूकडं धावत आलं नाही. मग यानं शेवटी गाडी थांबवली वाकून चेंडू उचलला तर शेजारी मोठमोठे काळे चट्टे . . . भले रुंद . . . गाडीचं चाक घासल्यावर पडतात तसे काहीसे.
त्यानं वणांचा मागोवा घेत समोर पाहीलं तर समोर तोबा गर्दी, गर्दीत लपलेला डंपर आणि तुरळक कोलाहल क्षणाक्षणाला वाढणारा . . .
✒ लेखन - रंगारी
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) चौथी मिती (स्फुट)
२) धुडावरलं बांडगुळ (स्फुट)
३) हाफ तिकीट - एक इकास
{fullWidth}
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) चौथी मिती (स्फुट)
२) धुडावरलं बांडगुळ (स्फुट)
३) हाफ तिकीट - एक इकास