कुमारजी - गगन में आवाज हो रही झिनी . . .

[वाचनकाल : ११ मिनिटे] 

कुमार गंधर्व, kumar gandharva
कुमारजींच्या भजनातून मन प्रसन्न आणि पावन होतं. शांत होतं. आपण नकळत मनात डोकावतो आणि मनाच्या मानससरोवरात संथ तरंगत विहार करणारा शुभ्र हंस दिसतो.

हयात असते तर आज ८ एप्रिल रोजी पं. कुमार गंधर्वांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण केली असती. भारतीय संगीत निसर्गाशी तादात्म्य पावलेले असते, याचा अनुभव कुमारजींच्या गायनातून येतो. माध्यान्ही देवीला बळी देण्यासाठी नेण्यात येत असलेल्या बकरीच्या मनातील घालमेल, स्वरांतून दाखवता येण्यासाठी परंपरागत संगीताच्याही पलीकडे जात नव्या स्वरावलींचा, लगावाचा आणि बंदिशीतील शब्दांचा विचार त्यांनी केला आणि त्यातून मधुसूरजासारख्या रागाची निर्मिती झाली. अलौकिकत्वाचा स्पर्श असलेली प्रयोगोत्सुक गायनशैली हे त्यांचे एक ठळक वैशिष्ट्य होतेच, परंतु नवतेच्या अविरत शोधातून वृद्धिंगत होत गेलेली ज्ञानलालसा आणि तत्वचिंतनाला पोषक ठरणारी त्यांच्यातली झळाळती बौद्धिक प्रतिभा त्यांना श्रेष्ठत्व बहाल करत होती. अशा या एकमेवाद्वितीय गणल्या गेलेल्या कुमार गंधर्वांनी आत्मसात केलेल्या गायनपैलूंचा वेध घेणारा हा लेख ...

डिसेंबर १९५३ ची संध्याकाळ. कुमारजी पुन्हा गाऊ लागल्यानंतरचा हा पहिला पब्लिक परफॉर्मन्स. इलाहाबाद मधील लोक अतिशय संगीतप्रेमी होते. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इतकी, की काही लोकांना हाॅलच्या बाहेर देखील बसावे लागले होते. सहा-सात वर्षे लोकांनी त्यांचे गाणे ऐकले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या गायकीबद्दल वेगळीच उत्सुकता होती. सुरूवातीला कुमारजींच्या पत्नी भानुमती यांनी मुलतानी रागातील ‘ख़याल’ सादर केले व त्यानंतर दोन भजने गायली मग एका छोट्याशा इंटरव्हल नंतर कुमारजींनी त्यांचे गाणे ‘लंकेश्वरी’ रागात गायला सुरूवात केली. सत्येंद्रनाथ वर्मा म्हणतात की, ‘त्यादिवशी कुमारजी अशाप्रकारे गायले की त्याचा एक ‘इलेक्ट्रोफाईंग इफेक्ट’ सगळ्यांवर झाला. तिथे उपस्थित असणाऱ्यांना वर्षानुवर्षे, मला तर ते दृष्य, ती संध्याकाळ, ते गाणे अजूनही आठवते.’
पंडित कुमार गंधर्व रचनेत आणि गायकीतही पूर्णपणे नवीन विचार मांडून अत्यंत क्रांतिकारी कामगिरी करणारे मोठे गायक आणि रचनाकार! कुमारजींचे खरे नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी (कोमकाली). त्यांना ‘कुमार गधंर्व’ ही पदवी ते सात वर्षांचे असताना गुरुकल्ल मठाचे शांतिवीरस्वामी यांनी त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली. त्यानतंर ते जनमानसांत ‘कुमार गधंर्व’ याच नावाने ख्यातकीर्त झाले. मात्र, त्यांच्या अब्जावधी चाहत्यांसाठी ते ‘पंडित कुमार गंधर्व’ नसून त्यांचे लाडके ‘कुमारजी’ आहेत!
कुमारजींचे वडील व दोन जेष्ठ भाऊही गायन-वादन करीत असत. त्यामुळे अर्थातच संगीतानुकूल भूमी असल्यावर त्याला अंकुर फुटणे स्वाभाविकच होते पण घरात मात्र कोणालाही या मुलाच्या मनावर काही संस्कार होत आहेत, अगर रुजत आहेत असा संशयसुद्धा आला नव्हता आणि अशाच स्थितीत एका दिवशी वयाच्या सहाव्या वर्षी, भिजलेली जमीन फाटून कोंब बाहेर यावा त्याप्रमाणे कुमारजी एकदमच गाऊ लागले. त्या गाण्याने सर्वांना इतका चमत्कार वाटला की बोलायची सोयच नाही. पुढे कुमारजी जसजसे गाऊ लागले तसतसे त्यांच्या वडिलांनी गाणे सोडून दिले! आणि इथूनच कुमारजींच्या गायकीला सुरुवात झाली. संगीताचे कसलेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ गाणे ऐकून मोठमोठ्या गायकांच्या हुबेहूब नकला ते मोठ्या तयारीने करत होते.
कुमारजी वयाच्या अकराव्या वर्षी अशा प्रकारे गाणे गायचे की फैय्याज खाँसाहेब (त्याकाळातील तानसेन म्हणनू प्रसिद्ध असलेले) सुद्धा चकित व्हायचे. बालवयातील गायन ऐकल्यावर उस्ताद फैय्याज खाँसाहेबांनी कुमारजींना शाबासकी दिली होती. ‘मेरे पास जागीर तो नही. लेकिन ये कुबुल कर लो।’ असे म्हणत खाँसाहेबांनी डोक्यावरची पगडी काढून कुमारजींच्या डोक्यावर ठेवली होती. शांताराम कशाळकर सांगतात की, ‘कुमारजींचे गाणे ऐकून नेहमी वाटायचं की हे या जन्माचे गाणे नाहीच! त्यासाठी या जन्मात यायच्या आधीपासूनच तपश्चर्या सुरू केली असणार!’ असंही काही लोक म्हणायचे की ‘बाल गधंर्वंसारखे पक्के सुर कुमारजींना उपजतच प्राप्त झाले होते. कुमारजींचा आवाज खूप सुरेल होता आणि तो सुरेल आवाज त्यांनी अभ्यासाने, सततच्या तालमीने अवगत केला होता.’
सावतंवाडीचे महाराज ऐकून होते की कुमारजी खूप चांगली नकल करतात गाण्याची. त्यांनी विचार केला की पाठ करून गाणे गात असेल म्हणून त्यांनी त्याच आठवड्यात ‘रेहमत खाँसाहेब’ यांची बाजारात नवीन आलेली ‘छेडो ना मैकाजी’ या भैरवी ची रेकॉर्ड ऐकवली. हिंदी ही भाषादेखील माहित नसलेल्या कुमारजींनी पाहिल्या दुसऱ्या आलापानतंरच गायला सुरुवात केली आणि म्हणाले, ‘मला पुढील गाणे असे डोळ्यांसमोर दिसू लागले व मी त्या रेकॉर्डिंगसोबत गात गेलो.’
१९३६ साली कुमारजींच्या वडिलांनी त्यांना मुंबईला बी. आर. देवधर यांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ (देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक) ह्या निवासी संगीतसंस्थेत दाखल केले व कुमारजी प्रा. देवधर यांचे शिष्य बनले. ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ येथे प्रत्येक घराण्यातील गायक वादक येऊन त्यांच्या कलांचे प्रदर्शन करत असत त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम सांगीतिक अनभुव मिळत.
कुमारजींचा जीवनप्रवास राजरस्त्यानी न होता वेगळ्याच वाटेने झाला. मुळापासून वृत्ती स्वतंत्र व बंडखोर, त्यातून प्रज्ञा आणि प्रतिमाही थोर आणि स्वभाव निर्भय. शिवाय प्रा. देवधरांच्या तालमीमुळे ते कोणत्याही घराण्याच्या शिस्तीत अडकलेच नाहीत कारण प्रा. देवधरांचाच स्वभाव कोणाच्या शिस्तीत अडकून राहण्याचा नव्हता. देवधरांच्या शागीर्दीत कुमार वयाच्या बाराव्या वर्षीपासून ते तेविसाव्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ अकरा वर्षे होते पण ही गुरू शिष्याची जोडी घराणेदार, कर्मठ गुरुजी व अंधश्रध्द शिष्य अशी झाली नाही. कुमारजींचे लहान व संस्कारक्षम वय आणि देवधरांचा व्यासंग व चाकोरीबाहेरचा विचार हा सुयोग विशेष फलदायी झाला. महत्त्वाकांक्षी वृत्ती, संवेदनशील मन, कोणत्याही कठीण आडवाटेत शिरायचे अंगात धाडस आणि संगीतविषयक निरनिराळ्या चर्चा व चिकित्सा यांचे नित्य श्रवण, यांनी कुमारांच्या बालवयात आणि तारुण्यात खोल परिणाम झाला. अमक्या गायकात अमका दोष आहे हे कळल्यावर कुमारजी स्वतःशी निश्चय करायचे की आपल्या गायनात हा दोष येता कामा नये. अमकीतमकी गोष्ट फारच चांगली पण तशीच अवघडदेखील आहे असे ठरले की कुमार मनात प्रतिज्ञा करायचे की मी ती करून दाखवणारच. अमक्या तर्हेचे गाणे असायला हवे अशी चर्चा झाली की कुमारजी मनाशी गाठ बांधायचे की आपण ते गायचेच, मग काय वाटेल ते होऊदे. प्रत्येकाच्या गाण्यात प्रा. देवधर काही ना काही दोष काढायचेच, परिणामी कुमारजींनी प्रतिज्ञा केली की या पुढे कोणासारखे गायचे नाही व कोणाचीही नकल उतरवायची नाही.
कुमारजींनी संगीताचे प्राथमिक धडे जरी देवधरांच्या गायनशाळेत घेतले असले, तरी त्यांनी आपल्या कलेला एकांगी बनविले नाही. पं. विष्णुनारायण भातखंडे यांच्या 'हिंदुस्थानी संगीत पद्धती' या ग्रंथाचा अभ्यास करून संगीतातील प्रयोग-प्रात्यक्षिकेही केली. उस्ताद सिंदेखाँकडून मध्यलयीत विविध ढंगात बंदिश सादर करण्याचे कसब देखील त्यांनी आत्मसात केले. ह्या सर्वांचे परिणामस्वरूप म्हणनू १९४६-४७ नतंर त्यांची स्वत:ची गायनशैली आकाराला आली. ओंकारनाथ ठाकूर यांच्या गानपद्धतीची दाट छाया कधीकधी कुमारजींच्या गायनात दिसते तर कधीकधी ग्वाल्हेर व आग्रा घराण्यांचे मनोहारी दर्शन घडते. ते वरच्या पट्टीत व जोरकसपणे गात असत. समेवरचा त्यांचा स्ट्रोकही जोमदार व हुकमी असे. त्यांच्या शैलीवर कोणत्याही विशिष्ट घराण्याचा फारसा प्रभाव नव्हता आणि त्यांच्या मधुर ओळींनी अनेकदा प्रस्थापित स्वरतंत्राचा विरोध केला होता, ज्यामुळे त्यांचे समवयस्क त्यांना नवीन संगीताची रचना करणारे बंडखोर निर्माते म्हणून ओळखू लागले.
देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक ह्या संस्थेत संगीताचे अध्ययन करीत असताना इतर सहाध्यायींच्या अध्यापनाची जबाबदारीही कुमारजी सांभाळत. त्याचवेळी त्यांचा परिचय ‘भानमुती कंस’ या कराचीहून आलेल्या व संगीत शिक्षणाकरिता देवधर स्कूलमध्ये दाखल झालेल्या युवतीशी झाला. भानमुतींना ठुमरी शिकवताना जेव्हा कुमार आणि भानमुतीजी गायच्या तेव्हा इतरांना ऐकताना ते गाणे कमी आणि त्यांच्यात संवादच चालू आहे असं वाटायचं. त्याची परिणती पुढे १९४७ मध्ये त्यांच्या प्रेमविवाहात झाली. असं म्हणतात की, कुमारजींचे लग्न ठरल्यानंतर ते अजूनच चांगल्या मुडमध्ये गाऊ लागले होते.

“कोणा कशी कळावी वेडांत काय गोडी
ती प्रेम मूढतेची सुटती न गूढ कोडी”

विवाहानंतर वर्षभरात कुमारजींना क्षयरोगाचे निदान झाले. त्यामुळे हे दांम्पत्य कोरड्या हवेत देवास (मध्यप्रदेश) येथे स्थलांतरित झाले. भानुमतींनी चरितार्थासाठी देवास येथील कन्याशाळेत नोकरी करून या श्रेष्ठ कलावंतास जपले. कुमारजींच्या जीवनात त्यांच्या पत्नी भानुमतीचे खूप मोठे योगदान आहे. आधी एक शिष्या, मग एक प्रेयसी, मग एक पत्नी आणि त्यानंतर कुमारजींचा सांभाळ. कुमारजींना बरे करण्याचे सगळे श्रेय भानुमतींनाच जाते. १९६१ मध्ये दुसरा मुलगा यशोवर्धन याच्या जन्माच्या वेळी भानुमतींचे निधन झाले. आपल्या ‘अनुपरागविलास’ या पुस्तकातील अर्पण पत्रिकेत कुमारजी लिहितात . . .

‘भानुमतीला...
जिने माझा प्रत्येक विचार व प्रत्येक कृती
पारखून घेतली आणि दुसऱ्या कुणापाशी जाऊन पारख करवून घेण्याची गरज कधीच भासू दिली नाही . . .
जिने माझे विचार आपलेसे केले
आणि आपल्या विचारांनी माझ्यामध्ये साहस निर्माण करून माझ्या विचारांना साकार केले
जिचे स्मरण केल्याशिवाय मी कधीच काही करू शकत नाही . . .”

तब्येतीच्या कारणास्तव कुमारजी देवासला राहायला गेले आणि तिथे त्यांच्यातला रचनाकार आकार घेऊ लागला. आजारपणामुळे पुढची पाच वर्षे कुमारजींना गायला सक्त मनाई होती, ती त्यांनी पाळली. कुमारजी गाऊ शकत नव्हते, पण ते सतत चिंतन करत असायचे. अत्यंत डोळसपणे त्यांनी संगीताचा आणि त्यातील सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला. २४ तास अंथरूणावर पडून असलेल्या कुमारजींचे आजूबाजूला ऐकू येत असलेल्या लोकसंगीताकडेच लक्ष लागून असायचे आणि इथूनच नवनिर्मितीला सुरूवात झाली. लोकसंगीतातून आलेल्या भक्तीसंगीतात कुमारजींना सर्जनाचे झरे सापडले. माळव्यातील लोकसंगीत त्यांच्या कानावर पडलं आणि त्यातून खास कुमार धाटणीच्या रचना निर्माण झाल्या. आजारपणामुळे निराश न होता ह्या काळात कुमारजींनी रागसंगीताचे अत्यंत सखोल असे अध्ययन करून अनेक नवनवीन राग-रागिणी व अप्रचलित राग प्रकाशात आणून भारतीय संगीतात मोलाची भर टाकली. मालवती, निंदियारी, संजारी, राही, अहिमोहिनी, सिंधुरा, सहेली तोडी, सोहोनी भटियार, गांधी मल्हार, लगन गंधार अशा अनेक रागांची ओळख कुमारजींनी रसिकांना करून दिली. ‘राग हा माझा मित्र असेल; तर त्याला मी किती ओळखतो यावर सारे काही अवलंबून आहे. मी जर नीट ओळखत असेन तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मला उलगडता आलेच पाहिजेत’, अशी कुमारजींची धारणा होती.
हवापालट व शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तब्येतीत सुधार होताच १९५३ मध्ये कुमार पुन्हा गाऊ लागले. त्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, माळवा आदी प्रांतातील माळवी-हिंदी भाषांतील लोकगीतांचा चिकित्सापूर्वक व सूक्ष्म अभ्यास करून ‘गीत-हेमंत’, ‘गीत-वर्षा’, ‘गीत-शिशिर’ इत्यादी कार्यक्रम सादर केले व संगीताला लोकगीतांचा एक नवीनच आयाम दिला. याशिवाय कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या संतवाणीचा ‘त्रिवेणी संगम’ व यांसारखे कुमारजींनी संगीतात गीतांना नवीन चाली देऊन केलेले प्रयोग त्यांच्या उपजत प्रतिभेचे निदर्शक होत. देवासच्या वास्तव्यात त्यांनी ‘कुमार संगीत अकादमी’ची स्थापना केली.
कुमारजींवर खयाल गायनाची एक वेगळी पद्धत मांडल्याबद्दल अनेक परंपरावादी लोकांकडून टीका झाली आणि रूढीप्रिय रसिकांना पण त्याचा सुरुवातीला थोडासा त्रासच झाला. स्वत: त्यांचे गुरू प्रा. देवधर यांनासुद्धा त्यांची ही गायकी मान्य नव्हती. परंतु, कुमारजींनी या स्वतंत्र पद्धतीवर अतिशय सूक्ष्म अभ्यास केला होता आणि त्याच्या परिणामकारकतेविषयी त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. शारीरिक मर्यादांमुळे त्यांचा श्वास जास्त काळ टिकत नसे आणि त्यांच्या स्वराची पट्टीसुद्धा इतर गायकांच्या तुलनेत खूप वरची होती. जी कदाचित त्यावेळच्या खयाल गायनाला पोषक नव्हती असं म्हणता येईल. परंतु, तरीसुद्धा या मर्यादांमध्येच त्यांना स्वत:ची ओळख सापडली आणि अत्यंत धाडसाने त्यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा मिलाफ याआधी झाला होता. परंतु, तो उपशास्त्रीय ठुमरी-दादरा यापुरता मर्यादित होता. कुमारजींनी खयाल गायनावर या लोकसंगीताचे रोपण केले व एक निराळाच मेळ आपल्याला ऐकायला मिळाला.
या लोकसंगीतातील तालाचं तत्त्वसुद्धा त्यांनी आपल्या रचनांमध्ये समाविष्ट केलं. ‘लहानपण देगा देवा’ हे गीत आपण नीट ऐकलं, तर आपल्या लक्षात येईल की त्याचा ठेका एका विशिष्ट प्रकारचा आहे. कुमारजींच्या बऱ्याच निर्गुणी भजनांमध्ये हा ठेका आपल्याला आढळतो. रूढार्थाने भारतीय संगीतात वापरल्या जाणाऱ्या ठेक्यांमध्ये सम आणि काल अशी रचना असते. परंतु, या ठेक्यात दर चार मात्रांनंतर समच येते. या ठेक्यात खालीची जागाच नाही. लोकसंगीतातील कलावंत हे शास्त्रीय तालीम घेतलेले नसतात. निसर्गातून, रोजच्या जगण्यातून आणि आपल्या उपजत प्रतिभेतून निर्माण होणारं त्यांचं संगीत! सम-कालाच्या नियमांमध्ये ते बसत नाही. वरवर अशास्त्रीय आणि चुकीची वाटणारी ही गोष्ट कुमारजींना खूप मोहक आणि स्वाभाविक वाटली आणि त्याच्यातील सौंदर्याने ते आकर्षित झाले. त्याच्यातला कच्चेपणा किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण rawness असं म्हणतो, तो rawness कुमारजींना फार पूर्वीच दिसला होता. कुमारजींनी गायलेलं अजून एक भजन आहे. तुकाराम महाराजांचं ‘लक्ष्मीवल्लभा दीनानाथा पद्मनाभा..’ या अभंगातसुद्धा हाच प्रकार आपल्याला दिसतो. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग कुमारजींनी स्वरबद्ध केलाय, ‘लहानपण देगा देवा’. या गाण्याचा भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुमारजींनी आपला आवाजच बदललाय. तो अगदी लहान मुलासारखा करून टाकलाय. लहानपण धारण करून जणू त्यांनी हे गाणे गायलेले आहे.
अभंगांबरोबर कुमारजींनी फार अप्रतिम अशी भावगीते पण संगीतबद्ध केली. आणि त्यातही स्वत:चा एक विचार अत्यंत ठळकपणे त्यांनी मांडला. कवी अनिल यांचं ‘अजुनी रुसून आहे’ किंवा ‘आज अचानक गाठ पडे’ जरूर ऐका. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की कुमारजी आपण नेहमी ऐकलेल्या रागाचे सूरसुद्धा वेगळ्याच पद्धतीने गाताहेत! म्हणजे स्वरांची स्थानेच पूर्णपणे वेगळी! उदाहरणार्थ- ‘आज अचानक गाठ पडे’ या संपूर्ण मालकंसमधील (काही जाणकारांच्या मते, हा मध्यमापासून गायलेला भीमपलास आहे.) गाण्यात त्यांनी लावलेला कोमल गंधार हा आपण याआधी ऐकलेल्या कोमल गंधारापेक्षा इतका चढा आहे की क्षणभर आपण चक्रावून जातो. परंतु, कुमारजींनी अत्यंत डोळसपणे आणि जाणूनबुजून तो तसाच वापरलेला आहे. पहिल्यांदा पचनी पडायला जड गेलं तरीसुद्धा नंतर त्याची जादू आपल्याला कळायला लागते. राजा बढे यांनी लिहिलेल्या ‘कोणा कशी कळावी’ या गाण्यातसुद्धा कुमारजींनी बिनधास्तपणे शब्द मध्येच तोडलेले आहेत! तसं करताना त्यांना काही वावगे वाटलेले दिसत नाही. फार लहानपणी रॉबर्ट हेरिक या कवीची ‘डिलाईट् इन डिसॉर्डर’ ही कविता वाचली होती आणि ती खूप आवडली पण होती. भारतीय अभिजात संगीतातसुद्धा या लोकसंगीतातून प्रेरणा घेतलेल्या ‘डिलाईट् इन डिसॉर्डर’ अतिशय सुंदर प्रयोग होऊ शकतो हे जाणणारे कुमारजी हे पहिलेच असावेत. इतका क्रांतिकारी विचार एका अत्यंत घराणेदार तालीम मिळालेल्या गायकाने करणं हे खरोखरच अत्यंत विस्मयकारक आहे!
स्वत:च्या संगीतरचना सोडून कुमारजींनी वसंत देसाई या संगीतकाराकडेही काही अप्रतिम गाणी गायली. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेले ‘उठी उठी गोपाळा’ किंवा ‘ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ ही गाणी अतिशय श्रवणीय आहेतच, परंतु एवढेच नाही; तर वॉल्युम कंट्रोल आणि डायनॅमिक्स या पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातून जन्म घेतलेल्या अस्त्रांचा अत्यंत सुंदर वापर कुमारजी त्यांच्या सर्व गाण्यांमध्ये करताना दिसतात. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ मध्ये कुमारजींचे मराठी शब्द, ‘जल्म जल्मलो’ ऐकताना गंमत वाटते! ‘कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो’ मधला अभिनय ऐकण्यासारखा . . . सुंदर, छोट्या छोट्या तानांनी नटलेलं हे पद, वाणी जयराम यांच्या आवाजाचीसुद्धा एक वेगळी धार दाखवून जातं.
कुमारजींनी नटसम्राट बालगंधर्व यांच्या गायकीचासुद्धा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि ‘मला उमजलेले बालगंधर्व’ ही मालिका रसिकांसमोर अर्पण केली. ‘मला उमजलेले बालगंधर्व’च्या माध्यमातून बालगंधर्वाच्या गायकीची वेगळीच बाजू कुमारजींनी दाखवून दिली आहे. ‘नाथ हां माझा’, ‘मम आत्मा गमला’, ‘जोहार मायबाप जोहार’, आणि ‘प्रभु अजी गमला’ भैरवी, ही कुमारजींनी गायलेली नाट्यगीते मन प्रसन्न करतात. कुमारजींचे ‘त्रिवेणी’, ‘ऋतुराज महफिल’, ‘भूप दर्शन’, ‘गीतवर्षा’, ‘मला उमजलेले बालगंधर्व’, ‘मालवा की लोकधुनें’ यांसारखे अनेक नवोन्मेषी सांगीतिक प्रयोग या काळात रसिकांसाठी पर्वणी होती. नुसते संगीतच नव्हे, तर उत्तम साहित्य, उत्तम स्थापत्यकला, उत्तम चित्रकला, शिल्पकला आणि अन्य अनेक क्षेत्रांमध्ये ते संचार करत. या सगळ्यातील सुंदर आणि मोहक गोष्टींचा अर्क आपल्या संगीतात मिसळून कुमारजींनी जो रस निर्माण केला त्याला खरोखरच तोड नाही.
कुमारजी यांच्या शास्त्रीय गायकीबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलेले आहे. परंतु, मराठी संगीतात त्यांनी दिलेलं योगदान हे इतर शास्त्रीय संगीतकारांपेक्षा खूप वेगळं आहे आणि खूप स्वतंत्र विचारांचं आहे. जेव्हा अतिशय तीक्ष्ण प्रज्ञेचे कलावंत आपला परीघ सोडून मुक्तपणे संचार करतात, तेव्हा त्यांच्या आविष्कारांना एक निराळीच उंची प्राप्त होते. त्याच त्याच प्रथांमध्ये अडकलेल्या कुठल्याही कलेला तिच्या कक्षा विस्तारण्याकरता अत्यंत प्रतिभावान आणि भ्रमर वृत्तीच्या उत्तुंग माणसांची गरज असते. कुमारजींनी मराठीत केलेल्या कामाचा संख्यात्मक आवाका एवढा नसेल कदाचित; परंतु मराठी संगीतकलेला आज जी उंची प्राप्त झाली आहे, त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, हे मात्र शंभर टक्के सत्य!
‘निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा’ असे म्हणत कुमारजी आपल्यासमोर जणू निर्गुण या शब्दाचा अर्थच उलगडून दाखवतात. सतत चालणारा निर्गुणी ठेका साथीला घेऊन कुमारजी आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली निर्गुणी भजनांच्या द्वारे आपल्याला कबीराच्या भक्तीचे, तल्लीनतेतील त्या निराकार अवस्थेचे दर्शन घडवतात. ‘अवधूता गगन घटा’, ‘सुनता है गुरु ग्यानी’, ‘घट घट में पंछी डोलता’, ‘झीनी रे’, ‘हीरना समझ बूझ’, ‘गुरुजी..जहां बैठु वहा छाया जी’, ‘राम निरंजन न्यारा रे’ ही आणि अशी अनेक निर्गुणी भजने पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात!
कुमारजींचं ‘हंस अकेला’ ऐकताना मला नवल याचं वाटतं की, कुमारजींनी गायलेल्या कबीरांच्या निर्गुण भजनामधला शांत रस इतका उत्कट कसा असतो? एखाद्या शांत सरोवराच्या नितळ पृष्ठभागावर सहज तरंगत जाणारा हंस अवचित आपले शुभ्र पंख पसरून हवेत उडून जातो. त्याच्या शुभ्र पंखांचं पाण्यावर क्षणकाळ प्रतिबिंब पडतं, पाण्यावर सूक्ष्म लहरी उमटतात आणि सारं पुन्हा स्तब्ध होतं. या दृश्य अनुभवानं मनात भक्ती उचंबळून येते आणि नकळत डोळ्यांतून पाझरते. कुमारजी ‘हंस अकेला’ हे भजन म्हणताना मूळचा श्राव्य अनुभव पूर्णपणे मानसिक होतो आणि भजन संपता-संपता आध्यात्मिक होतो.
वस्तुत: हे भजन ‘मृत्यू’संबंधी आहे. आत्म्यानं मनुष्य शरीराची कुडी सोडली आणि पार्थिवतेतून आत्मा अनंतात विलीन झाला. म्हटलं तर अतीव दु:खदायक प्रसंगाचं कबीरजी वर्णन करतात. त्यांची रचना कोमल असली तरी भाषा नेहमीप्रमाणे रोखठोक आहे.

‘यमके दूत बडे मजबूत
यम से पडा झमेला’

असं म्हणून ते मृत्यूमधली अपरिहार्य अगतिकता व्यक्त करतात. परंतु, कुमारजींच्या स्वरांनी या शब्दांची अशी काही मांडणी केलीय की त्या घटनेमधली क्रूरता नष्ट होते. मरण अटळ आहे या भावनेने मनाचा थरकाप होण्याचं थांबतं. कबीरजी मोठ्या हिमतीने मृत्यूविषयी बोलतात. ‘जैसे पात गिरे तरुवरसे, जब हुए उमर पुरी’ असं म्हणताना वृद्धापकाळातल्या मृत्यूविषयी आपण बोलत नाही तर ज्याचं आयुष्य संपलं तो पुढे जातो असं म्हणतात. अशा विषण्ण अनुभवाकडे ते तटस्थपणे पाहतात. ते म्हणतात, ‘ही परमात्म्याची कहाणी आहे. मी तर फक्त ‘हरी’चे गुण गातो. त्या गुणगानामधूनच मला मन:शांती मिळते. माझं देवाशी भांडण नाही. ज्याच्या त्याच्या करणीने जो तो आपापलं आयुष्य जगतो. गुरू आपल्या कर्मानं आणि शिष्य त्याच्या कर्मानं जगतो नि मरतो.’
कुमारजींचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून देशभरात विविध स्वरमैफली आणि कार्यक्रमांनी साजरे होणार आहे. याचा आरंभ आज ‘कालजयी’ संगीतोत्सवाद्वारे मुंबईत होईल. विविध माध्यमांतून सुप्तपणे आपल्या नकळत आपली मते घडवली जात आहेत. सभोवतालचा गोंगाट, कर्कशता नष्ट करून मनाला उभारी देणार्‍या अवकाशाचा शोध प्रत्येकजण घेत आहे. अतीव द्रूत वेगाने धावणार्‍या अशांत पर्वात मनाला शांत करणारा विलंबित स्वर शोधत आहे. आत्मप्रेमात व आभासी वास्तवात मग्न समाजासमोर, स्वत: आणि समाज दोन्ही बदलण्याचे कडवे आव्हान आहे. ‘माझे मज कळो येती अवगुण’ ही तुकोबांची वाट धरली की मग सुरू होतो आत्मशोधाचा मार्ग! अगदी तसंच कुमारांच्या गायनातील समग्रतेमुळे आपल्या अपूर्णत्वाची जाणीव तीव्र होत जाते. आर्तता, चैतन्य, आत्मीयता, आर्जव अभिव्यक्त करणारे तत्त्वचिंतक कुमारजी आपल्याला आत्मसंवादास भाग पाडतात. त्यातून अवघड व नकोसे प्रश्न नव्याने पडू लागतात. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आपले आयुष्य उजळून निघते. कल्पकतेला स्पर्श करण्याची उर्मी येते. स्वर व शब्द, बुद्धी व भावना, निसर्ग व मानव ही सारी द्वैते कुमारांच्या गायनात मिटून जातात. कुमारजी मन:पूर्वक ऐकले तरी घनघोर अज्ञान दूर होऊ शकते. आपल्या आत डोकावण्याची सवय लागली की बाहेरचं जग स्वच्छ दिसू लागतं आणि मग कुठल्याही विपरीत काळात वाटचाल करणं सुगम होतं. अशी आंतरयात्रा करता यावी, यासाठीच ऐकत राहावे - पुन्हा पुन्हा - कुमार गंधर्व!
कुमारजींच्या भजनातून मन प्रसन्न आणि पावन होतं. शांत होतं. आपण नकळत मनात डोकावतो आणि मनाच्या मानससरोवरात संथ तरंगत विहार करणारा शुभ्र हंस दिसतो. तो शुभ्र असतो, कारण विशुद्ध असतो. त्याला कोणत्याही पाप, कुकर्माचा काळिमा लागलेला नसतो. निष्कलंक असणं हे त्या ऊर्जारूपी आत्म्याचं शुद्ध स्वरूप असतं. तो शुभ्र पंखांचा हंस आपल्या मनात सापडतो, तोच मुक्तीचा अद्वैत क्षण. कुमारजींचा शुभ्र हंस अनंतात विलीन झालाय, उरल्यात त्यांच्या स्मृती . . . मनाला प्रसन्न करणाऱ्या . . .


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال