
विकासाची सायकल नसते, विकासाचा रणगाडा असतो – चालवणारा सुरक्षित फक्त! प्रत्यक्षात रणगाड्यानं जमीन नांगरल्याचा आभास होत असला तरी अप्रत्यक्षात ते जमिनीचं उद्ध्वस्त होणं असतं. विकासाच्या व्याख्या पुन्हा वर्गानुसार बदलणार. आहे रे आहे रे, नाही रे नाही रे. चंद्राच्या चांदण्यात रोमँटिसिझम प्रत्येकाला कुठला दिसायला! रणगाड्याच्या दातऱ्यांत पिसून निघाल्यानंतर जगाकडे पाहणाऱ्याच्या पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयी थोडंसं . . .
पूल बघितलं की धडधडायचं. सुसाट रेल्वे भरधाव जाताना रूळ थरथरतो तसंच. काळीज.
अनारकली का कोणालातरी चिनवलेलं भिंतीत, कुठल्यातरी चित्रपटातलं, तेच आठवायचं पाह्यलेलं. पूल पडू नए, बिघडू नए, नजर लागू नए म्हणून वेशीवरच्या म्हारामांगाला नसल्यास देवदाश्याला नसल्यास वेश्येला पूलाच्या पायात वोतलेल्या भरभक्कम काँक्रीटात चिणायचे. जिवंत. तेच आठवायचं ऐकलेलं.
सिविल कोर्टाकडे जाणारी मेट्रो फलाट क्रमांक दोन वर येत आहे
अमराठी आवाजान् ओढून-ताणून बोललेली मराठी – सुसंस्कृतपणाचे लक्षण. नक्कीच. सगळीकडे मोठमोठ्या, पायऱ्या विस्तृत, जागा मोकळी, हवा टापटीप, स्वच्छता उच्च, माणसं फसवी, गर्दी. खोलच खोल भुयारात उंचच उंच स्ट्रक्चरं. वर्तून चालताना गंमत वाटते; पण खाली इथं इतकं काय-काय घडतंय.
दरवाजा बाईं तरफ़ खुलेगा
वस्तीत विकास आलेला तेवा अनादि काळापासून अनंतकाळापर्यंत, तीन बाय सहाच्या, बाजंला चिटकलेल्या म्हातार्याला विरोध सुचला. नसत्या उचापत्या म्हणून. झोपडपट्टी उठवायला आलेल्या ताफ्यापुढं बाबू गेनू झालेला म्हाताऱ्याचा. वस्ती बघत राहिली. साम-दाम-दंड-भेद बधला नाय म्हातारा. शिवी-दांडू-अश्रूबॉम्ब-पॅलेटच्या गोळ्या. मग कोणतरी म्हणाला मेला आसन्, तपासून त् पाहा खरं . . .
व्हाइल ट्रॅव्हलिंग इटेबल्स आर नॉट अलाऊड
धडाड् धडाड धडाड् धडाड. आपली जुनी रेल्वे बरी, इथंही मस्त संगीताए; पण ते आपलं जीवनगाणं. धडाड् धडाड धडाड् धडाड. उघड्या दारातून येणारा वारा अनोळखी तरी तिथं माणसी ओळखीचे चेहरेएत. इथं थंडी वाजते. एसी. बरं आहे क्लास मिटवले मेट्रॉनं . . . तरी लोक आता कपड्यावरून वगैरे ओळखत बसतात—
माईंड द गॅप
—बिचाऱ्यांना ताप झाला.
मेट्रोच्या हवाई पुलाचा एक पाय झोपडपट्टीच्या शेषनागावर उभा राहिलाए. खडूळ पाण्यात दगड बुडून लाटा उठाव्यात तशी वस्ती गोलाकार हिंदकाळून त्या चौरस पायाभोवती स्थिर झाली. वस्तीतला फक्त तेवढा थोडा भागच नष्ट झाला विकासानं. आधीच्या रेल्वेतनं स्पष्ट दिसायची वस्ती. नाईलाजानं प्हावी लागायची म्हणा. वाजवीचा वाईट-साईट वासबिस येत असे. सोयच नव्हती. आता फक्त, ज्याला हवी त्यानं, उंचीवरून झोपडपट्टी पाह्यची. नाही म्हणायला गरिबीच्या पुढे ढगा-बिघात मस्त पाहता येतं. ही सोय झाली.
धडधडायचं मात्र कायम चालूच, काचंला रेलून, खाली पुलाच्या पायाकडं बघितल्यावर. काळजात.
{fullwidth}