गांधी गोडसे – एक युद्ध (समीक्षण)

[वाचनकाल : दोन मिनिटे] 
महात्मा गांधींजी, Mahatma Gandhi

गांधीहत्यादिनाच्या चारेक दिवस आधीच ‘दिग्दर्शक राजकुमार संतोषी’ यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार. नेहमीच्या कथानकाला वेगळ्या पद्धतीने हाताळलेल्या या चित्रपटाला बरे-वाईट दोन्ही प्रतिसाद मिळत आहेत. व्यक्तींमधील तफावतीची ही कहाणी नसून विचारधारेची लढाई या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. याच चित्रपटावरील छोटेखानी समीक्षण.

सर्वप्रथम लक्षात हे घ्यावे की ही एक काल्पनिक कथा आहे. ३० जानेवारी १९४८ला नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. त्यातून जर गांधीजी वाचले असते तर पुढे काय झाले असते, ही कल्पना म्हणजेच हा चित्रपट. 
    गांधी व नथुराम गोडसे, या दोन्ही व्यक्तींचे विचार लक्षात घेऊन पुढे काय घडले असते याचा घटनाक्रम मांडला आहे. यामध्ये गांधीजींना अपेक्षित भारत व त्यांचा समाजावरील प्रभाव यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गांधीजींना विरोध करणारी एक प्रभावी व्यक्तिरेखा म्हणून डॉक्टर आंबेडकरांचाही वापर खुबीने केला गेला आहे. इतर व्यक्तिरेखांना मात्र, या चित्रपटात विशेष असे महत्त्व मिळत नाही.

१) गांधीमुळे पाकिस्तानला ५५ करोड रुपये देण्यात आले.
२) गांधी फक्त मुसलमानांच्या हिताच्या कृती करतो.
३) गांधी हिंदू धर्मविरोधी आहे.
४) गांधी स्वतःच्या हट्टापुढे देशाला महत्त्व देत नाही.
५) गांधीच्या विचारांमुळेच देशाची प्रगती नाही झाली.

अशा अनेक मुद्द्यांना या चित्रपटात चर्चेद्वारे हाताळण्यात आले आहे. आपण इतिहास न वाचता, कोणी इतिहासाबद्दल काही सांगेल ते ऐकतो व मानतो. त्यातही जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध टीका होत असेल, तर ती योग्यच असेल, यावर आपला जास्त विश्वास असतो. प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येक व्यक्तीवर अयोग्य टीका होत असतात. आपण जिवंत असूनही, या अयोग्य टिकांसमोर खूप वेळा हतबल होतो. मृत व्यक्तींना त्यांचा पक्ष मांडण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे, या टीका योग्यच असतील, हा समज समाजामध्ये पसरतो. जर गांधी जिवंत असते, तर त्या टीकांना कसे सामोरे गेले असते याची उत्कृष्ट मांडणी हा चित्रपट करून देतो. 

१) हिंदुस्तान म्हणजे नेमके काय व हिंदू धर्म किती व्यापक आहे?
२) एक देश फक्त जमिनीच्या तुकड्याने तयार होतो, की त्यातील लोकांच्या एकतेने?
३) आज देशातील अशांततेस कारणीभूत फक्त मुसलमान धर्माला ठरवले जाते. मात्र, इस्लाम भारतामध्ये येण्याआधी भारतात हिंसा व अशांतता नव्हती असे नाही!
४) आपला धर्म व आपली संस्कृती यातून आपण योग्य शिकवण घेतोय का?
५) द्वेषाने फक्त अधोगती होते. जेव्हा डोके शांत व स्थिर असते, समजून घेण्यास तयार असते, तेव्हा माणसाच्या नैतिक कक्षा उंचावतात!

अशा उत्कृष्ट चर्चांनी हा चित्रपट नटलेला आहे. मात्र या चर्चांची चित्रपटात सुरुवात करण्यास दिग्दर्शकाने फारच उशीर केलेला दिसतो. गांधींना थोडे जास्त महत्त्व दिलेले दिसते. गोडसे या व्यक्तिरेखेबद्दल नीट मांडणी झाली, मात्र जसे गांधीजींच्या सहकाऱ्यांबद्दल सविस्तर दाखवण्यात आले; तसे गोडसेचे आदर्श व त्याचे सहकारी यांबद्दल फार काही दाखवले गेले नाही. 
     कथालेखन, दिग्दर्शन व अभिनय या सर्वांत चित्रपट उजवा ठरतो. मात्र आहिंसा या देशाच्या एकतेसाठी किती आवश्यक आहे व एकविसाव्या शतकात सुद्धा गांधीजींचे विचार किती महत्त्वाचे ठरतात, हे आणखी प्रभावीपणे नक्कीच दाखविता आले असते. 
     फक्त ऐकीव गोष्टींच्या आधारे गांधीजींवर टीका करणाऱ्यांनी हा चित्रपट पाहून आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यावीत. एकविसाव्या शतकासाठी – गांधी योग्य होता की गोडसे? हा महत्त्वाचा प्रश्न नाहीये.

जर भारताला पुन्हा पारतंत्र्यात जायचे नाही, तर या ‘देशासाठी योग्य’ काय आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ही जाणीव हा चित्रपट नक्कीच करून देतो.


• संदर्भ :

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال