बंदा रुपया

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
पाॅलिश मारण्यासाठी ऐरणीवर सज्ज असणारा बुट, shoe on shoe polish anvil
चांभाराने जड लोखंडी ऐरण पुढे घेतली. शेजारून टीपीने चिखलात भरलेला बुट ऐरणीवर टेकवला.


या जगात चलनाविना काही होत नाही आणि कोणत्याही चलनाला माणसाची उपमा दिली जात नाही अशी ती दुहेरी गंमत आहे. म्हणजे कधी कोणत्या पाचच्या ठोकळ्याला ‘हा अगदी अमुक-तमुक व्यक्तीसारखा आहे’ असं कोणी म्हणेल? पण ठराविक व्यक्तीला म्हणता येतं की ‘तो ना एकदम बंदा रूपया आहे!’ किंवा ‘तो एकदम खोटं चलन निघाला’ . . .

सुटात प्रचंड अवघडत होतं तरीही सदाशिवराव कसंबसं त्याच्याशी जुळवून घेण्याचा पुरेपूर यत्न करत होते. हा यत्न केला नसता तर हसं झाल्यावाचून गत्यंतर नव्हतं. कारण, सभोवताली दिसतंय ते उच्चभ्रू महाविद्यालय म्हणजे थोडक्यात कॉलेजच. तिथे प्रवेशाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच असणाऱ्या एकमेव ‘थ्री-पीस’वर सदाशिवरावांनी चारेक मित्र जमवले होते.
     हा नीलम – ही नीलम नव्हे ‘हा’ नीलम किंवा मग किरपान देहाचा तो जतिन आणि इंग्रजीत नाव सांगणारा तुळतुळीत हनुवटीचा चकचकीत टी.पी. मेहता. तिघंही बापाच्या संपत्तीला – सागरातून थेंब कमी करावा तसं – उंची सिगारेटच्या धुरातून कमी करण्याच्या धडपडीत असणारी गोरी-गोमटी पोरं. त्यांच्यात सदाशिवराव जमेल तितकं सुशिक्षित इत्यादी ‘दिसण्याची’ खटपट करीतच होते, खासकरून ‘मॉडर्न’ – तक्रार नव्हती, कारण हेच तर कधी काळचं त्यांचं स्वप्न . . .
     तीनेक दिवसानंतर वसतीगृहाच्या, म्हणजे होस्टेलच्या, मखमली दुनियेतून बाहेर निघायला आज पावसाने संधी दिली होती. सर्वांना स्वतंत्र खोली असूनही सदाशिवरावांनी पत्र्याच्या ट्रंकेतलं सामान बाहेर काढलेलं नव्हतं. इतकंच काय तर गंजून ट्रंकेला पडलेलं भोकसुद्धा भिंतीकडे तोंड करून ट्रंक ठेवलेली‌‌.

आता कडाक्याचा पाऊस आला आणि आपण भिजलो तर नंतर आज रात्री थ्री पीस धुवून टाकता येईल जेणेकरून उद्या ओला राहिला तरी पावसाचं कारण पुरेल . . .
     “सदाशिवराव कोणत्या विचारात आहात?” टीपी.
     “नाही, नाही, काही नाही.” मागे पडलेले सदाशिवराव रस्त्यावरचे ओहोळ चुकवत तिघांपर्यंत पोहोचले.
     नीलम भरमसाठ पैसे घेऊनही केस नीट न कापणाऱ्या त्याच्या ‘रेग्युलर बार्बर’ला इंग्रजीत शिव्या देत होता. तर जतिन आजूबाजूने साध्या कपड्यात वावरणाऱ्या – पण सुंदर असणाऱ्या मुलींच्या – दुर्दैवावर हवेतलं मत मांडत होता. तेवढ्यात शेजारून मोटार गेली आणि नेमक्या कोपऱ्यात चालणाऱ्या टीपीच्या बुटावर चिखलाचा फटकारा बसला.
     “साला ब्लडी बास्टर्ड . . .”
     मग शहरात ‘हर्बल सर्विस टी’ देणाऱ्या एकमेव हॉटेलचा रस्ता सोडून या तिघांनी चांभाराचा शोध सुरू केला. सदाशिवराव जितक्या अनिच्छेने चहा प्यायला निघाले होते, तितक्याच अनिच्छेने ते आता चांभार शोधू लागले.
     “इकडे एक चांभार बसतो. या गल्लीच्या टोकाला.” जतिनने रस्ता दाखवला.
     “तो कायम एकच बनियन घालतो तो ना? जरासा म्हातारा? नंबर वन पाॅलिश! नंबर वन.” नीलम‌.
     टीपी नकळत तिकडे वळाला.
     “नको. इकडे नको. तिकडे दुसरा चांगला चांभार आहे, तो एकदम मस्त पाॅलिश मारतो.”
     “सदाशिवराव खरं तुमच्या बुटाची पाॅलिश मस्त आहे. तुम्ही स्वतः मारता?” नीलम.
     “हो. नाही.‌ ते . . .”
     “सोडा ना सदाशिवराव. चला इथे जवळ आहे जतिन सांगतोय तर घेऊ पाॅलिश मारून.‌ परत हर्बल टी घेतला की सरळ होस्टेल.” टीपी म्हणाला, “मध्येच पाऊस आला तर काय करणार? चला लवकर.”
     गल्लीत घुसताना सदाशिवराव थोडे आणखीनच बुजले; पण सोय व अंतर पाहता तिघांना आणखी विरोध दर्शवला असता तर ते तिघे बिघडले असते.
     गल्लीच्या टोकावर भिजाक, मात्र त्यामानाने थोड्या कोरड्या, कोपऱ्यात एक म्हातारा चांभार कोण्या लहान पोराच्या वहाणेचा अंगठा शिवत बसला होता. डागडुजीसाठी एक जुनाट छत्री बाजूला गुंडाळून ठेवलेली होती. बरीच जुनाट झालेली हत्यारं, चामड्याचे तुकडे, डोक्यावर भलीमोठी छत्री आणि त्या ठरलेल्या बनियनमधला म्हातारा चांभार . . .
     समोर हातात छत्री, डोक्यावर हॅट आणि अंगात कडक इस्त्रीचा थ्री पीस घातलेल्या टीपीला पाहून चांभाराने पोराची वहाण थोडावेळ बाजूला सरली व जड लोखंडी ऐरण पुढे घेतली. शेजारून टीपीने चिखलात भरलेला बुट ऐरणीवर टेकवला.
     “तुम्ही इथेच कुठेतरी राहता म्हणालात ना सदाशिवराव?”
     तोपावतो तिघांच्या मागे लपलेले सदाशिवराव गोंधळले.
     “अं? . . . पूर्वी राहत होतो, आता राहत नाही.”
     “का हो घर सोडलं? की भाड्याने होतात?”
     “नाही म्हणजे होतं घर इथेही. पण हल्ली नाही राहत कोणी तिथे. सगळे गावाला असतात.”
     “बरबर. ओके-ओके‌‌.”
     चांभाराचे अचानक हात थांबलेले जाणवून टीपी त्याकडे वळाला – बुट पाॅलीश झाला होता – दुसरा पाय.
     “म्हणजे मग ‘प्रॉपर’ इथलेच म्हणायचं तुम्ही?” नीलमने विचारलं.
     “बालपण इथेच गेलं असणार?” जतिन.
     “वडील काय करतात म्हणाला?” टीपी.
     तिन्ही बाजूंनी प्रश्न येताच सदाशिवराव गोंधळले. “वडील . . . वडील रिटायर आहेत, सरकारी नोकरी होती!”
     चांभाराचे हात पुन्हा स्तब्ध – दुसरा बुट पूर्णपणे पाॅलिश झाला नव्हता.‌ हात क्षणभर थांबून पुन्हा सुरू झाले.
     जतिन आणि नीलमनेही बुटाला पाॅलिश मारून घेतली.
     “अहो सदाशिवराव सहजासहजी आलात तर घ्या पाॅलिश मारून.” नीलम.
     “नाही. नाही. माझ्या बुटांवर कुठे उडलाय चिखल?”
     “तरीही करून घ्या, चांगली दिसते पाॅलिश. आणि तेवढीच चांभाराला मदत!”

चांभार सदाशिवरावांची हरेक कृती नकळतपणे निरखत होता – बहुदा खरोखर बाराण्याची मदत हवी असेल.
      सदाशिवराव नकार देत होते मात्र ‘इथपर्यंत आलाच आहात तर घ्या पाॅलिश मारून’ या मित्रांच्या हट्टामुळे त्यांनी शेवटी हो नाही करत-करत ओशाळून हसत बुट ऐरणीवर ठेवला. बुट खाली ऐरणीवर मात्र सदाशिवरांची नजर वर – ढगात – बहुदा पावसाचा वेध घेत असणारे सदाशिवराव . . .

मित्रांप्रमाणे बाराण्याच्या पाॅलिशसाठी चांभाराला बंदा रुपया दिला खरा मात्र हाॅटेलकडे जाताना सदाशिवरावांचा वेग बराच मंदावला होता .‌ . .


• संदर्भ :

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال