वाणी जयराम : ऋणानुबंधाच्या गाठी

[वाचनकाल : ४ मिनिटे]
वाणी जयराम, vani jayram

मराठीसह १९ भाषांत १० हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या गायिका वाणी जयराम यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. अनेक पुरस्कारांनी सन्मानित वाणी जयराम यांना गेल्या काही दिवसांत भारत सरकारतर्फे पद्मभूषणही देण्यात आला. ‘ऋणानुबंधाच्या’ सारखी काही अजरामर गीते त्यांची आठवण छेडीत राहतील . . .


सकाळी अवचितपणे रेडिओ वर ‘ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी’ गाणे लागले की सगळे सोडून आवाज थोडा वाढवून रेडिओ शेजारीच खिळून राहायचे – हा लहानपणापासूनचा आवडता उद्योग. अगदी गाण्याचा अर्थ समजत नव्हता, तेव्हापासूनचा हा शिरस्ता! पुढे गीताचे बोल समजण्याची समज आली, तेव्हा तर हा शिरस्ता आणखी घट्ट झाला. आणखी पुढे त्यातली गंमत कळायला लागली. गायक-गायिका समजायला लागले. तसतसे ह्याच्या प्रेमात पडणे आले. आजही ॠणानुबंधाच्या कुठेही लागले किंवा लावले की हेच होते.
     आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते. ‘आकाशवाणी पुणे . . .’ हा रोजच्या सवयीचा आवाज देखील हवाहवासा वाटतो. 

अवीट गोडीचे प्रेमाच्या नात्याचे पदर हळुवार उलगडून दाखवणारे काव्य म्हणजे ‘ऋणानुबंधाच्या’! भेटी-गाठी आणि नाती-गोती यांचे एक स्वर्गीय नाते मनात घट्ट करणारे गीत ‘ऋणानुबंधाच्या’! ऋणानुबंधाच्या भेटीची ओढ लागलेल्या अनामिक क्षणाचे हे अप्रतिम शब्दचित्र पुन:पुन्हा मोहवते, श्रवण आनंद देते. गोड भेटीच्या आठवणी . . . रुसण्याच्या, हसण्याच्या, हसण्यातील रुसण्याच्या अन रुसण्यातील हसण्याच्या . . . फुलवते.
     ‘कुमार गंधर्व’ ह्यांच्या बरोबरीने ‘वाणी जयराम’ ह्यांनी हे गीत अजरामर केलेय. गाणे ऐकताना जितके कुमार भावतात तितक्याच वाणी जयराम गाणे मोहक करतात. प्रत्येक वेळी नव्याने ऐकताना एकेक ओळ, एकेक तान हृदयात आनंद निर्माण करते. प्रत्येक ओळ अनुराग निर्मित असते . . .

कधी तिने मनोरम रुसणें
रुसण्यात उगिचःते हंसणे
म्हणून ते मनोहर रुसणें
हंसणे रुसणें रुसणें हंसणे
हसण्यांवरती रुसण्यांसाठी
जन्मजन्मीच्या गाठी

आधी कुमारांच्या बरोबरची गायिका कोण असावी असा प्रश्न पडला होता.‌ आलापीत कुणीतरी दाक्षिणात्य गायिका असावी असंही वाटत होतं. गायिकेचे नाव ‘वाणी जयराम’ आहे हे समजल्यावर त्या स्वराचे-आवाजाचे सगळे संदर्भ जुळू लागले . . .

बोले रे पपीहरा पपीहरा
बोले रे पपीहरा पपीहरा
नित् घन बरसे नित मन प्यासा
नित मन प्यासा नित मन तरसे

• • •

तमिळनाडूमधील वेल्लोर इथे छोटी ‘कलैविनी’ संगीतविश्वात कार्यरत आईवडिलांच्या संगीतमय मायेत वाढत होती. सिलोन रेडिओवरची गाणी आवडीने ऐकायची. वेडच होते म्हणाना सिलोन रेडिओचे! मनापासून ऐकलेली हिंदी गाणी ती म्हणून दाखवायची. त्यातून, आपलाही आवाज सिलोन रेडीओवर ऐकता यावा ही इच्छा प्रबळ होत गेली. 
     वयाच्या आठव्या वर्षापासून लहानग्या कलैविनीने मद्रासच्या ऑल इंडिया रेडिओसाठी गाणं गायला सुरुवात केली.
     पुढे कॉलेज शिक्षण संपवून त्या स्टेट बँकेत नोकरी करू लागल्या. १९६७ साली लग्न होऊन मुंबईत आल्या. लग्न संगीताची आवड असलेल्या कुटुंबात झालं. त्यांची सासू ‘पद्मा स्वामीनाथन’ कर्नाटक संगीतामधील गायिका होत्या. 
     पती जयराम जेव्हा वाणी यांची गाणी ऐकायचे तेव्हा आपल्या बायकोनं गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं असा आग्रह धरायचे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर – संगीतातील वाणी यांचा रस वाढल्यानंतर – त्यांनी बँकेतील नोकरी सोडली आणि पूर्णवेळ व्यावसायिक गायिका म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

• • •

लग्न झालं त्याच वर्षी, १९६९ मध्ये वाणी मुंबईतील एका सार्वजनिक संगीत कार्यक्रमात गात होत्या.
     संगीतकार ‘वसंत देसाई’ यांनी हा हिरा हेरला. वसंत देसाई त्यावेळी कुमार गंधर्व यांच्याबरोबर एक मराठी अल्बम रेकॉर्ड करत होते. वाणी यांचा आवाज ऐकल्यानंतर वसंत देसाई यांनी कुमार गंधर्व यांच्याबरोबरच्या ‘देव दीनाघरी धावला’ अल्बममध्ये ‘ऋणानुबंधाच्या’ गाण्यासाठी वाणी यांना संधी दिली आणि ह्या गाण्याने इतिहास घडवला!

‘ऋणानुबंधाच्या’ खूपच लोकप्रिय झालं. वाणी जयराम हे नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं.
     हृषिकेश मुखर्जी १९७१ मध्ये ‘गुड्डी’ बनवत होतें.  सिनेमासाठी उत्तम गाणी लिहून तयार होती. तीन गाणी गाण्याची संधी त्यांनी वाणी ह्यांना दिली. जया बच्चन ह्यांच्या भूमिकेसाठी ही गाणी होती. वाणी जयराम यांनी त्या तिन्ही गाण्यांचे अक्षरशः सोने केले. ‘बोले रे पपीहरा’, ‘हरी बिन कैसे जीयूं’ आणि ‘हमको मन की शक्ती देना’ ही तिन्ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि वाणी याचं नाव हिंदी सिनेमाविश्वात लोकप्रिय झालं. 
     ‘हमको मन की शक्ती देना’ हे गाणं तर आजही अनेक शाळांमध्ये प्रार्थनागीत म्हणून गायलं जातं. 

वाणी यांनी वसंत देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्राचा दौरा करून  अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांना या गाण्याबरोबरच अनेक गाणी शिकवली. गाणे जगणारी गायिका गाणे मुलांमध्येही रुजवू लागली! 

• • •

आरडी बर्मन, श्यामजी घनश्यामजी, कल्याणजी आनंदजी, मन्ना डे, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांबरोबर त्यांनी अनेक श्रवणीय गाणी दिली. ठुमरी, गजल, भजन सारखे गाण्याचे विविध प्रकार गायले. ‘मेरे तो गिरधर गोपाल’ ऐकलंय?

मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई
जाके सर मोर मुकुट मेरो पति सोई
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई

• • •

हे असं सगळं आठवत असताना मनात ‘ऋणानुबंधाच्या’ रुंजी घालतच असते. त्या गाण्याचे ऋणानुबंध आहेतच असे घट्ट, मोहक आणि तरल . . .
     आठवणींच्या सागरतीरी प्रेमात अनुभवलेल्या आत्यंतिक क्षणांच्या भेटी आयुष्य पुढे जाते तशा धूसर होत जातात. पुढे आपसातल्या दुराव्याचे, धुसफुसीचे, रुसव्यांचे क्षण नुसते आठवले तरी आपण त्यावर निरागसपणे हसतो. एकमेकांवर प्रेम करण्यासाठीच आपण हे ऋणानुबंधाचे जन्म जन्मलेलो असतो अन त्यामुळेच कधी गट्टी जमली तरी हरकत नाही हे जाणवते. कारण भेटींच्या त्या आठवणींची तृप्तता दोघांनाही आयुष्यभर तृप्ती देत राहते. या भेटींची महिमाच ‘अतीव अंतरहृदयीची आर्त मायेची’ अशी आहे. 
     हे गाणं कोणीही, कधीही, कुठेही ऐकले तरी त्याच्या आठवणींची तार छेडली जावी इतकी आशयसंपन्नता यात आहे. 
     हे सगळं आपसूक घडून येते कुमार आणि वाणी ह्यांच्या जादुई आवाजातून!

• • •

लहानगी कलैविनी जशी जन्मली तशी संगीतमय झाली होती.
या मुलीच्या बारशाच्या दिवशीच ज्योतिषानं पुढे ती मोठी गायिका होईल, असं भविष्य कथन केलं. त्याला साजेसं नाव ठेवावं, असंही वडिलांना सुचवलं. म्हणून या मुलीचं नाव कलैवाणी म्हणजे कलावती, बुद्धिमती ‘माँ सरस्वती’ ठेवण्यात आलं. घरी त्याचं लघुरूप वाणी झालं. निव्वळ गायन, संगीतच नाही, तर पेंटिगचाही व्यासंग असलेल्या कलैविनीनं आकाशवाणीपासून टिव्ही, सिनेमापर्यंत आपलं नाव सर्वत्र सार्थक केलं. 
     सिलोन रेडिओवर आपलं गाणं लागावं, असं या लहान गुड्डीचं स्वप्न होतं. योगायोग असा की, वाणी यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातल्या ‘गुड्डी’ मधल्या ‘बोले रे पपीहरा’ या गाण्याची सिलोन रेडिओने त्याकाळी अक्षरशः पारायणं घातली आणि वाणी जयराम यांची स्वप्नपूर्ती झाली!
     आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी काही निर्णय केला. पार्श्वगायन सुरू करण्याआधीपासूनच भक्तीसंगीत गात असलेल्या वाणी जयराम यांनी आपल्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जाणिवेनुसार, निखळ शुद्ध भक्ती संगीतावर लक्ष्य केंद्रित केलं. त्या तमिळ, हिंदीत कविताही करत. 

दासी होकर तेरी मैं उदास कैसे रहू प्रभू, 
बस आसपास के लोगों ने मुझे,
प्यार के बदले मे जहर पिलाया,
चाहे सारा जग रुठे, 
राह ना बदलो आ प्रभू

अशा शब्दांतून त्या आत्मकथन पर कविता लिहीत. नुकत्याच झालेल्या ७४व्या प्रजासत्ताक दिनी या गानसरस्वतीला पद्मभूषणाची महिरप लाभल्यानं त्यांचा यथायोग्य सन्मानही झाला. 

काल शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी वाणी जयराम गेल्या. 

पुन्हा त्यांचे ‘ऋणानुबंधाच्या’ ऐकताना . . . गायिका वाणी जयराम तमिळ भाषिक आहेत . . . असे कधी वाटलेच नाही हे ही प्रकर्षाने जाणवले.

‘बोले रे पपीहरा’
‘हमको मन की शक्ती देना’
‘मेरे तो गिरीधर गोपाल’
‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’
‘बलसागर भारत होवो’
‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’

ही आणि अशी मराठीसह १९ भाषांत १० हजारांहून अधिक गाणी वाणी जयराम ह्यांची आठवण छेडीत राहतील! ऋणानुबंधाच्या गाठी अशाच घट्ट राहतील!

सागरतीरी आठवणींनी
सागरतीरी आठवणींनी
वाळूत मारल्या रेघा

 

• संदर्भ :

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال