प्राचीच्या यादीत आणखी एका तरुणाचे नाव सामील झाले होते – चंद्रहास. ‘इतरांचे जे झाले तेच आपले होईल’ हे माहिती असूनही ‘इतरांना तिच्याकडून जे मिळाले तेच आपल्याला मिळेल’ या स्वप्नात चंदू गुरफटला होता. मानसला मात्र यातला धोका आपसूकच समजून येत होता. कारण प्राचीने आपल्या मित्राला शारिरीक गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘ठेवावं’ हे त्याला मान्य नव्हतं. प्राचीच्या मते हे प्रेम नसून उत्तम व्यवहार होता! चंदूच्या बाजूने हे एकत्र येणे काय होते?
परत परत बोलवल्यावर चंद्रहास मधूनच कधीतरी वाङ्मय परिषदेच्या कार्यालयात जायचा. अपरान्त वाङ्मय परिषदेचं ते ऑफिस डॉ. अण्णा भुसाणेंच्या घरातच होतं. दरवेळी आपल्याच खिशातले पैसे काढून उपक्रम नावाचं काही स्वत:ची पाठ थोपटणारं रसगुऱ्हाळ चालवावं हे चंदूच्या मनाला पटत नव्हतं. ते उपक्रम म्हणजे कुणाचं तरी गीत-संगीत, गाणं, ज्यांच्या कविता चांगलं मासिक छापणार नाही, त्यांचं काव्यवाचन, कॉलेजमधला एखादा वर्ग सक्तीने पकडून त्यांना ऐकवणं, मुंबई-पुण्यातला पाहुणा बोलावून त्याचं ‘वाङ्मयीन प्रवचन’ मुकाट्याने ऐकून घेणं आणि त्याला फक्त एस.टी.चं जाण्या-येण्याचं भाडं देणं, लहान पोरांना मास्तर लोकांनी सुधारून दिलेल्या किंवा त्यांच्याच आई-वडीलांनी खरडलेल्या यमक्या कविता म्हणायला लावून त्या शब्दांच्या ढकलगाड्यांना बक्षीस वगैरे देणं असे किरकोळ होते.
डॉ. अण्णा भुसाणे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पक्षांत होते. त्यांनाच त्यांची नेमकी पार्टी सांगता आली नसती. स्वत:ची सात-आठ पुस्तकं त्यांनी प्रकाशकाला पैसे पुरवून छापून आणली होती. या परिषदेकडून मराठी साहित्यात मोलाची भर पडणं ही अशक्य गोष्ट आहे हे चंद्रहासच्या चतुर मनाने लगेच ओळखलं. केवळ मनोरंजन म्हणून तो परिषदेकडे बघत होता. चारोळ्या करणारे तिथले कवडे ‘काय कवी!’ म्हटलं की, चहा पाजायचे! वाङ्मयीन हानी घडवणाऱ्या गोष्टींचा चंद्रहासला रागच येऊ लागला होता. चंदू आणि मानस दोघेही चांगल्या कविता करतात आणि अभिवाचनात तितक्याच छान सादर करतात हे ठाऊक असूनसुद्धा रेडिओ स्टेशनवर नोकरी करणाऱ्या परिषदेतल्या कार्यकर्त्यांनी त्यांना एकदाही रेडिओ वाहिनीवर बोलावलं नव्हतं. बातमीत नाव येणं हे साहित्यिकांचं सार्थक कसं काय असू शकतं?
अण्णा एकदा किंचित रागानेच चंदूला विचारू लागले, “तुम्ही लोक नक्की लेखक की, पत्रकार?”
“नक्की सांगायचं तर पत्रकारिता करू शकतील असे लेखक!” चंद्रहास म्हणाला.
• • •
चंद्रहास पक्ष्यांचे फोटो काढायला गेला होता. मळीतली मगर जबडा उघडून बसते. खंड्या पक्षी तिचे दात साफ करतो. ते मांसाचे अडकलेले कण खातो. त्या वेगळ्या दृश्याचं छायाचित्र मगरीने काढू दिलं. तो हिरो खंड्याही उडून गेला नाही. चंद्रहास तो फोटो मिळवताना त्या मगरीच्या जवळ गेला होता, पण तिचं पोट आधीच भरलेलं असावं.
भूक ही एक भयानक गोष्ट आहे. भुकेलं शरीर काहीही करायला धजतं. वासना हीसुद्धा भूकच!
रात्री चंदूच्या डायरीचं पान भरलं.
• • •
पालेकरच्या अपघाताची बातमी अचानक येऊन थडकली! आघातच होता तो. पालेकरच्या वाट्याला आता अपंगत्व येतं की काय अशी भीती वाटत होती. पालेकर घायाळ झाला होता आणि इस्पितळही त्याला वाचवू शकलं नाही. सामना खेळताना जड चेंडू रपकन् बसावा तसं योगेन पालेकरच्या मरणामुळे चंदूला वाटलं. तो सुन्न झाला!
मोठी स्वप्नं रंगवत भरारी घेणाऱ्या पोराला असं अपघाती मरण येतं. त्याच्या अस्तित्वाचा अर्थ-अनर्थ काय लावायचा? जगाला नियंत्रक नसल्याचीच ही निशाणी ना?
हे चंदूने फक्त डायरीत लिहून ठेवलं नाही. मानसशीही त्याचं बोलणं झालं.
मानस म्हणाला, “लोक देवाचं नसणं मान्य करत नाहीत. ते आघात, अपघात पूर्वजन्माशी जोडतात. पाप-पुण्य अशी ‘बालकथा’ सांगतात. जगात काहीही घडू-बिघडू शकतं. मी माझी होमोसेक्शुअॅलिटी मागून घेतली होती का? मग मला तुरुंगात वगैरे टाकायची भाषा कायदा कशी काय करू शकतो?” मानसची गाडी पुन्हा आपोआप त्याच्या विषयाकडे आली.
तेव्हा आधी काही ठरवलेलं नसताना चंदूने मानसला विचारलं, “मी प्राचीकडे जातो याचा तुला राग येतो नं? खरं सांग.”
काही क्षण पोकळ शांततेत गेले.
मग मानस म्हणाला, “राग नाही, पण चिंता वाटते.”
“कशाची काळजी करतोस तू?”
“तुझी काळजी वाटते. तिने उद्या तुलाही नाकारलं तर?”
“प्राची काही माझी बायको नाही.”
“पण हातरुमालासारखं तिने तुला का मळवावं?” मानसने टोकदार प्रश्न फेकला.
चंदू हुशार असून गडबडला. “ते तुला कळायचं नाही.” असं म्हणाला.
“कळत नाही म्हणूनच विचारतोय.” मानस थोडा हट्टालाच पेटला.
“तिचा नकार मला पचवता येईल. मी तिच्या प्रेमात पडलेलो नाही. मौजमस्ती म्हणजे प्रेम नाही. कदाचित मी कुणाच्याच प्रेमात पडणार नाही. प्रेम ही कल्पना कदाचित देवाइतकीच निरर्थक असेल.” चंद्रहास बोलत राहिला.
दोघे तोडीस तोड होते.
“श्यामची आई पुस्तक अजून वाचलं नाहीस ना तू? वाचून बघ एकदा. तुझं जग बदलू लागेल.” मानसने वेगळाच विषय काढला.
“गुरुजींनी आत्महत्या केली होती ना?” चंदूने थोडं पेचात टाकणारा सवाल केला.
“त्यामुळे गुरुजींचं कार्य, त्यांचं आयुष्य याचं महत्त्व कमी होत नाही. त्या काळातला समाजच गुरुजींच्या आत्महत्येला जबाबदार आहे असं मी मानतो.” मानस गुरुजींची बाजू घेत म्हणाला, “फार जुन्या गोष्टी आहेत या.”
मानस हार मानत नव्हता. कापडी पिशवीतून आणलेली ‘श्यामची आई’ची प्रत त्याने बळेबळेच चंद्रहासच्या हाती सोपवली.
– क्रमशः
• संदर्भ :
• वाचत रहा :