घसट

[वाचानकाल : ४ मिनिटे] 
समागमासाठी एकत्र आलेले दोन साप, snakes entangled together
वासनेचा जन्म होण्यासाठी निसर्गाने प्रत्येक शरीराला एक कालमर्यादा आखून दिलेली असते. त्याआधी ती भावना जन्माला घालण्याचं सामर्थ्य कोणातच नाहीये.


साप एकमेकांना भेंडोळे घालतात त्यात प्रेमाचा काही अंश नसावा कदाचित! कारण एरवी हद्दीत आल्यावरही एकमेकांना जीवे मारणारी जमात केवळ शरीराची गरज म्हणून एकवटते. तशाच काही कृती घडून जातात. कशा, कशासाठी, का काहीच माहीत नसताना त्या फक्त घडून जातात. त्या घडून जातात पुढील परिणामांची हलकीशी जाणीवही नसताना; पण शेवटी व्हायचा तो परिणाम होतोच . . . बरा किंवा वाईट . . . शक्यतो वाईटच . . .
 
आईने मारलेली हाक ऐकू आली तेव्हा घाईतच मयूर तन्वीपासून वेगळा झाला. अंग अजूनही थरथरत होतं. ते कमी की काय म्हणून आईची परत एक हाक आली. त्याने ओठ पुसून पटकन तन्वीचा हात त्याच्या छोट्याशा हातात घेतला आणि दोघांनी जिन्याच्या टोपीखालून बाहेर निघून घराकडे धूम ठोकली. समोर आई उभी होती. कमरेवर हात.
सकाळचे कपडे धुऊन झाले, वळचणीवर टाकून झाले तरी, दररोज आसपासच बागडणारे तन्वी-मयूर दिसत नाहीत म्हणून तिने काळजीने दोघांना हाक मारली होती. दुसऱ्याच मिनिटाला शेजारच्या इमारतीतून दोघेही धावत येऊन तिच्या पुढे उभे होते. मयूर पुढे आणि थोडीशी भेदरलेली‌, बुजलेली तन्वी त्याच्या हाताला धरून मागे.
कुठे गेला होता रे?” आईने विचारलं.
ते . . . इथेच खेळत होतो.मयूरने अडखळत सांगितलं.
काय खेळत होता?” दुसरा प्रश्न.
काय खेळत होतो . . .गोंधळलेल्या मयूरने तन्वीकडे पाहिलं.
लपाछपी!तन्वीने सांगितलं.
बरं बरं, खेळा या इथे, जवळच आणि लवकर या माघारी.
आईचं बोलणं पूर्ण ऐकून घेण्याआधीच दोघंजण तिथून सटकले. आई दुपारच्या स्वयंपाकाकडे वळाली. मघाच्या जिन्यापर्यंत दोघे पोहचले; पण आता तिथे ते शक्य नव्हतं. कारण, इमारतीला जाग आली होती. लोक बाहेर पडत होते, आजूबाजूला वर्दळ सुरू झालेली होती.
आपण नक्की कुठे चुकतोय हे माहीत नसलं, तरी मानवी मनाला आपण चुकतोय हे सांगावं लागत नाही. चुकांची जाणीव आपोआप होते आणि ती ज्या वेगाने होते त्याच वेगाने हळूहळू पुसट होत नष्ट होऊन जाते.
ते दोघेजण पुन्हा हातात हात घालून इमारतीतून निघाले. फिरताना त्यांना घरासमोरील वाळूच्या ढिगार्‍यात काल त्यांनी बनवलेला अर्धवट बोगदा दिसला. तो पूर्ण करून त्यावर किल्ला बनवत बसण्याची कल्पना तन्वीने सुचवली जी मयूरने ऐकता क्षणीच उडवून लावली. कारण त्याच्या मेंदूत काही जाणिवा आणखी स्पष्ट होत्या.
 
तन्वी आणि मयूर दोघे चुलत भावंडं. नव्या वस्तीत जागा घेऊन दोघा भावांनी घर बांधलं त्यांची ही दोन लहान मुले. तन्वीला मोठी बहीण होती अगदी तशीच मयूरलासुद्धा होती. त्या दोघी मोठ्या जशा जवळपास एकाच वयाच्या होत्या तसेच तन्वी-मयूर सुद्धा होते दोघात जेमतेम तीन-चार महिन्यांचा फरक होता. मोठ्या बहिणी सकाळी सातला, जेव्हा लहान दोघे झोपेत असत, तेव्हाच शाळा गाठत. परिणामी उठून आंघोळ-नाष्टा आटपल्यावर तन्वी व मयूरला एकमेकांच्या दोस्तीशिवाय पर्याय नव्हता. दररोज सकाळ-दुपार-संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकांचा सहवास अनिवार्य झाला होता. त्यांचं बालपण मजेत कटत होतं.
या दोघांच्या आयांची म्हणजे जावा-जावांची घनिष्ठ मैत्री होती. आपसूकच त्यांच्या लेकरांचीसुद्धा गट्टी होती! दिवसभराच्या कामाचा उरक आटपण्यासाठी दोघी तन्वी-मयूरला आवरून खेळायला सोडायच्या. वस्तीवर तुरळक घरं असल्याने मैदान भलं मोठं होतं, त्या मैदानाचा पुरेपूर उपभोग दोघेही घेत होते. आजचा दिवस काही फारसा वेगळा नव्हता.
गल्लीतल्या एका उंचपुऱ्या धिप्पाड राकट दिसणाऱ्या पहाडी आवाजाच्या, पण प्रेमळ, म्हाताऱ्याला दोघे उगाचच घाबरत असत. तो लांबून दिसताच दोघांनी शेजारच्या इमारतीत धूम ठोकलेली. त्या इमारतीत त्यांची लपण्याची हक्काची जागा होती जिन्याच्या टोपीखाली तयार झालेली छोटीशी खोली!
तो म्हातारा गेल्याची खातरजमा करून हळूच बाहेर निघणाऱ्या तन्वीचा हात खेचून मयूरने पुन्हा तिला अंधारात खेचलं आणि भिंतीला टेकवून आपणहून तिच्या चिमुकल्या ओठांवर आपले ओठ टेकवले! अगदी काल संध्याकाळी दोघांनी मिळून पाहिलेल्या चित्रपटातल्या नटासारखे!
त्याला ढकलून तन्वी बाजूला निघाली; पण मयूरने तिचा हात धरला होता. त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला पुन्हा भिंतीला टेकवून उभं केलं. यावेळी तन्वीने तिच्या हातातही संपूर्ण न मावणारं त्याचं डोकं स्वतःच्या हातात धरलं प्रतिकार संपला, प्रतिसाद सुरू झाला . . .
दोघांचे ओठ भिडले तेव्हाच हातपाय, संपूर्ण शरीर थरथरायला सुरूवात झाली होती. त्याहून जास्त लक्षणं दाखवण्यासाठी त्यांचं शरीर तितकं तयार नव्हतं किंवा रसायनं स्त्रवण्याइतपत मेंदूची वाढ झालेली नव्हती. पण तो चटका वेगळ्या प्रकारचा चटका, हलकीशी भाजणारी जाणीव ती होत होती.
दोघांना चुंबन कसं घ्यायचं, का घ्यायचं हे कळत नव्हतं तरी त्यांचे ओठ धडकत होते, नाकं चेंबत होती . . . तेवढ्यात आईची हाक ऐकू आल्याने घाईतच तो तन्वीपासून वेगळा झाला होता.
 
फिरून-फिरून दमल्यावर दोघे पुन्हा त्या जिन्याजवळ गेलेच.
वाळूत खेळण्याची कल्पना सुचवणारी तन्वी असो किंवा तिचं मनगट घट्ट धरून योग्य जागा शोधणारा मयूर दोघांच्याही डोक्याचा आता कशाने तरी ताबा घेतला होता‌. वासना म्हणताच येणार नाही अशी ती भावना होती. वासनेचा जन्म होण्यासाठी निसर्गाने प्रत्येक शरीराला एक कालमर्यादा आखून दिलेली असते. त्याआधी ती भावना जन्माला घालण्याचं सामर्थ्य कोणातच नाहीये. भले तुम्ही वासना नसताना शरीराला कृतीस भाग पाडू शकता; पण त्यात काहीच तथ्य म्हणून सापडणार नाही. निरागस मनांमध्ये काहीतरी त्यांच्या जाणिवेपलीकडचं पेरलं गेलं होतं.
तन्वी-मयूर पुन्हा त्या इमारतीत जाऊन खेळू लागले. वर्दळ ओसरली तसं सर्वांची नजर चुकवून तन्वीने मयूरला जिन्यात नेलं आणि तेव्हा आपणहून आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. उजवा पाय उचलून त्याच्या डाव्या हातावर टेकवला. हुबेहूब कालच्या चित्रपटातील नटीसारखा!
दोघे स्थळ-काळ-वेळ विसरले होते, भान निसटत होतं, दोघांची शरीरं कंप पावत होती, हात थरथरत होते, मेंदू रिकामा झाला होता, अंग घामानं निथळलं होतं, तरीही ओठांची हालचाल सुरू होती. यापलीकडे काही होणं शक्य नव्हतं. मनाची, शरीराची, भावनांची, कसलीच सरमिसळ नव्हती, तिथं प्रेमाचा मिलाफ नव्हता, या विश्वातील सुंदर मिलन कामना नव्हती‌ . . .
तिथे फक्त आणि फक्त घसट होती . . . घसट.
 
सकाळी वर्तमानपत्र आणायला गेलेला गल्लीतला एक उंचपुरा धिप्पाड राकट दिसणारा पहाडी आवाजाचा, पण प्रेमळ, म्हातारा लांबून हे सर्वकाही पाहत होता. पावला-पावलांनी दोघांकडे सरकणाऱ्या त्याच्या ओठांवर अगम्य स्मित फुलत होतं आणि डोळ्यांतील भाव जाणिवेच्या पलीकडले . . .
 

संदर्भ :

१) छायाचित्र टाकबोरू

 
वाचत रहा :


4 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. विलक्षण भेदक कथा.जी एकदा वाचली तरी विसरूच शकत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वास्तव कायमच भेदक असतं. योग्य शब्दांत वातावरण, परिस्थिती निर्माण झाली की ते ठळकपणे जाणवतं इतकंच. अशाच स्मरणीय कथा भेटीस घेऊन येण्याचा प्रयत्न राहील.

      हटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال