इट्स ‘माय’ मराठी!

[वाचनकाल : १० मिनिटे]  
जादुई पुस्तक आणि लेखणी, मराठी भाषा प्रतीकात्मक कव्हर, mystical book and pen
मानवी उत्क्रांतीमधील भाषा हा महत्त्वाचा टप्पा. लहानग्यांच्या बोबड्या बोलापासून ते वृद्धांच्या तोतऱ्या शब्दापर्यंत भाषेचा विराट पसारा आहे.


आज आंतरराष्ट्रीय भाषा दिन. अमृतातही पैजा वगैरे ठीक आहे; पण सध्या लागलेल्या इंग्रजीसोबतच्या स्पर्धेचं काय? जागतिकीकरणाच्या वादळात आपलं मराठी तारू कोठेपर्यंत? राजभाषा ठरणे न ठरणे हा भाषिक संवर्धनाच्या दृष्टीने गौण मुद्दा! कारण, मराठी राजभाषा घोषित झाल्यानंतर एका दिवसात मराठी पूर्वपदावर येईल असे नाही! मुळात हे पूर्वपदकाय आहे?‌ भाषेचे खरे सौंदर्य हे हिंमराठी, मिंग्लिश अशा इतर भाषामिश्रणात आहे?
 

आफ्टर ऑल मराठी कम्पल्सरी पाहिजे! कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉटस् जितके क्लिअर्ली एक्स्प्रेस होतात, तितके फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं!

ही पु.लं.ची आमचे भाषाविषयक धोरणमधली कोपरखळी आजही तितकीच ताजी का बरं वाटते आपल्याला? कारण एकच राजभाषा म्हणून महाराष्ट्रात पूर्वापार मिरवणाऱ्या मराठीची आजकाल लक्तरं झालीत यात दुमत संभवत नाही!
कथा-कादंबऱ्यांत आढळणाऱ्या माजघर, पडवी, तुळई, बळद अशा किती शब्दांचा अर्थ आपल्याला सहजी समजतो? उंबराचं फूल, झाकलं माणिक, लंकेची पार्वती, ठणठणपाळ, अकलेचा खंदक, कपिलाषष्ठीचा योग असे शब्दप्रयोग आज कितीदा वापरात आढळतात? तितिक्षा, युयुत्सू, मुमुक्षू, अर्धोन्मीलित अशा तद्दन साहित्यिक शब्दांचा अर्थ कितीजणांना लागतो? ‘अर्धचंद्र देणेकिंवा द्रविडी प्राणायाम घालणेकिंवा दे माय धरणी ठाय करून सोडणेअसे वाक्प्रचार आज कितीसे प्रचलित आहेत? परीक्षा, पाश्चात्त्य, अनसूया, आध्यात्मिक, उज्ज्वल, ऊहापोह, ऊर्मी, सुज्ञ, हाहाकार, पृथक्करण, मातु:श्री, दूर्वा, अधीन हे शब्द लिहिताना  आपण अजूनही उकार-वेलांटी-संधी- विसर्गाचा घोटाळा करून परिक्षा, पाश्चात्य, अनुसया, अध्यात्मिक, उज्वल, उहापोह, उर्मी, सूज्ञ, हाहा:कार, पृथ:करण, मातोश्री, दुर्वा आधीन असेच अशुध्द स्वरूपात लिहिताहोत काय?
दुर्दैवानं चालू मिनिटाला तरी याची उत्तरं आपल्याला अंतर्मुख करणारी आहेत. पारतंत्र्यकाळात मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसेम्हणून खंतावणारे कवी माधव जूलियन आज हयात असते, तर मराठी नसे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा असेम्हणून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असता अशी दुरवस्था आहे आज आपल्या मराठीची!भारतात प्राचीन साहित्यपरंपरा, दीड ते अडीच हजार वर्षे वय, स्वयंभू स्वरूप, प्राचीन-आधुनिक भाषारूपांची एकमेकांशी घट्ट नाळ या चार निकषांनुसार ६ भाषा अभिजात मानल्या जातात. महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे समितीमार्फत पुराव्यांसह ५०० पानी अहवाल केंद्र सरकारकडे सादर करूनही वर्षानुवर्ष मराठी या दर्जापासून वंचितच आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठीच्या संवर्धनाकरता किती केंद्रीय अनुदान मिळेल हा प्रश्न गौण आहे. मात्र, यामुळे मराठीच्या जोपासनेकरता झटणाऱ्या शिक्षक- कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल यात तीळमात्र शंका नाही. याच प्रयत्नांचा भाग म्हणून साताऱ्याजवळ भिलारहे पुस्तकांचं गाव निर्माण झालं. पुढे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी फायलींवर मराठीतच टिपणी नोंदवणं बंधनकारक झालं. परंतु आजही एखाद्या न्यायाधीशाने मराठीत निकालपत्र लिहिल्यास ब्रह्मकमळ उमलल्यागत त्याची बातमी होते. मराठी पाट्या वापरायला लावण्याच्या अट्टाहासात ‘Adidas’ सारख्या ब्रँड्सकडून ‘आडिडास’ असे मराठीकरण(?) होऊन मराठीची कुचेष्टा होताना आढळते. एकट्या मुंबईतच गेल्या १० वर्षात महानगरपालिकेच्या १३२ मराठी माध्यम शाळांना टाळी लागलेली आहेत!
हे नष्टचक्र नेमकं कुठं जाऊन थांबणार आहे?
प्रसिध्द लेखक श्री. म. माटे आणि ग. प्र. प्रधान यांनी संतांच्या अभंगवाणीतली नि राजकारण्यांच्या भाषणांतली उदाहरणं वेचून जातिप्रदेशनिहाय शब्दलकबी, म्हणी, वाक्प्रचार कसे निर्माण झाले याची सुरेख चर्चा केली आहे. आजही मराठी कादंबऱ्या, ऐतिहासिक कागदपत्रं, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्यप्रवाहातल्या कथा-कविता-आत्मकथनं यांचा सखोल समाजशास्त्रीय अभ्यास करण्यास अक्षरशः प्रचंड वाव आहे. अशा संशोधनाची वानवाच आजघडीला मराठीची वाढ खुंटवून तिला ज्ञानभाषा व रोजगारभाषा होण्यापासून रोखत नाही काय?
ज्ञानकोशकार केतकर यांनी १९३०च्या दशकातच भाषिक अतिक्रमणाचा मुद्दा मांडताना कोर्टकचेऱ्या, टपाल-लेख-भाषणं इ. औपचारिक भाषाव्यवहारासह खाजगी पत्रव्यवहारांचाही आधारस्तंभ बनलेल्या इंग्रजीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु त्याचबरोबर केवळ फॅशनम्हणून मराठी सही किंवा मराठीत पत्रव्यवहार करणाऱ्यांची लेखनभाषा अधिक शुध्द असेल ही अपेक्षाही वेडगळ ठरते. बहुजनवर्गात शिक्षणप्रसारामुळे ज्ञानाची भूक वाढली असली तरी ही तरुणाई वाचनाकडे वळावी या दृष्टीने सक्रीय प्रयत्न घडत नाहीत. केवळ मासिकांची वाढती संख्या, वृत्तपत्रांचा प्रचंड खप आणि नवीन शब्दांची प्रचंड टांकसाळ एवढ्या बाह्य आणि संख्यात्मक पैदाशीकडे पाहून चालणार नाही. या पिकांत निकोपतेची बीजं किती आणि क्षयाची बीजं किती याचाही विचार होणं जरूरीचं!

बलुचिस्तानपासून मलायापर्यंत आणि बुखाऱ्यापासून कोलंबोपर्यंत जेवढे देश इंग्रज जिंकतील, तेवढ्या सगळ्यांची एक भाषा करण्याची महंमद तुघलकी योजना करू नका!

असा इतिहासाचार्य राजवाडे यांचा कालातीत इशारा आज आपण विसरून कसं चालेल? अहिराणी, वऱ्हाडी, मराठवाडी, कोकणी या मराठीच्या जिवंत व प्रवाही बोलीभाषा. त्यांच्या प्रवाही स्वरूपाला खीळ घालणं म्हणजे प्रमाण मराठी भाषेच्या नरड्यालाही नख लावण्यासारखं झालं! मराठीला कन्नड, गुजराती, हिंदी, तेलुगू, पोर्तुगीज व फारसी शब्दांचीही सुरेख देणगी लाभल्याची बाब भाषिक स्थित्यंतराविषयी आरडाओरड करण्यापूर्वी ध्यानात घेणं आवश्यकच.उदाहरणार्थ, दैनंदिन व्यवहारात आपण गैरहजर, दररोज, नाउमेद, कमकुवत, बेफिकीर, सरकार यांसारखे फारसी-अरबी उपसर्गाचे शब्द वापरतो.
पोर्तुगीजांकडून आपल्याला बटाटा, पगार, हापूस, बिजागरे, तंबाखू अशा शब्दांचा उपहार मिळालाय. कन्नडमधून आपण अडकित्ता, भाकरी, तूप, खलबत्ता, अण्णा, अक्का, किल्ली, विळी तर तेलुगुमधून अनारसा, शिकेकाई, किडूक-मिडूक असे शब्द अनुसरले आहेत. तामिळनं आपल्याला चिल्ली-पिल्ली, सार, मठ्ठा आणि हिंदीनं भाई, बेटा, तपास, दाम असे शब्द बहाल केले आहेत. याला भाषिक अतिक्रमणकसं बरं म्हणता येईल? हा तर भाषिक मिलाफ’!
सुनीतकार केशवसुत, गझलकार सुरेश भट आणि हायकूकार शिरीष पै यातल्या कोणावरही मराठीची वाट लावल्याचा आरोप करता येईल का? उलट परभाषेतील साहित्यप्रकार मराठीत तिचा लहेजा सांभाळत रुजवून त्यांनी स्वभाषा संपन्नच केली आहे.
नामवंत समीक्षक पी. के. क्षीरसागर यांनी १९३६ सालीच काय विधान केलं होतं, पाहा;

भाषेत किती हजार शब्द आहेत, याबरोबरच त्यापैकी किती शब्द जास्तीत जास्त लोकांना समजतात, किती शब्द त्या भाषेच्या प्रकृतीशी जुळणारे आहेत आणि किती शब्द त्या भाषेच्या कुशीत जन्मणाऱ्यांच्या प्रत्यक्ष सामाजिक क्रिया-संकेतांशी संबध्द आहेत याला महत्त्व दिलं पाहिजे. भाषाशुध्दीच्या अतिरेकी संकल्पनांनी डागाळलेल्या बीजातून भाषिक अराजकाच्या विषवल्लीच तरारतील!

याचाच अर्थ असा की केवळ परभाषिक शब्द टाळणं व स्वभाषेतील व्यवहारक्षेत्र वाढवणं हे उपाय पुरेसे नाहीत. अगदी रोज हाती पडणाऱ्या वृत्तपत्रांतही घाईमुळे आणि नावीन्यप्रेमामुळे दररोज शेकडो प्रकारच्या व्याकरणचुका होतात. इतर कुठल्याही वाङ्मयापेक्षा वृत्तपत्रांचं वाचन सर्व स्तरांतल्या लोकांकडून नित्यनेमानं होत असल्याने त्या चुकांचा चटकन आणि व्यापक प्रमाणात प्रसार होतो.
उदाहरणार्थ, स्वातंत्र्यवीर सावरकरकृत शब्द वापरायचा म्हणून अद्ययावतहा शब्द मराठी वर्तमानपत्रांनी चक्क २० वर्ष अद्यावतया अशुध्द स्वरूपात वापरला! प्रसिध्द भाषाभ्यासक अरुण फडके यांच्या मते, आपण मथितार्थ, मध्यांतर, आशीर्वाद, कोट्यधीश, निर्भर्त्सना, तत्काळ अशा कित्येक संधी मतितार्थ, मध्यंतर, शुभ आर्शीवाद, कोट्याधीश, निर्भत्सना, तात्काळ अशा हमखास चुकीच्या स्वरूपात उच्चारतो व लिहितो आता बोला!
आज मराठीला मरणापेक्षा विद्रुपतेची आणि दुर्बलतेचीच अधिक भीती आहे. यासाठी प्रत्येक परकीय शब्दाला संस्कृत-फारसीप्रचुर प्रतिशब्दाचा वापर करणं किंवा भाषांतरानं अर्थ दुरापास्त बनवणं थांबवलं पाहिजे. साहित्यात बोजड आणि अर्थशून्य मराठी शब्द वापरण्याची बौद्धिक विकृती टाळली पाहिजे. अशिक्षित वर्गात रुजलेले स्टेशन-पासपोर्ट यांसारखे इंग्रजी शब्द लेखनातही सोपेपणाखातर वापरले पाहिजेत. उदाहरणार्थ, ‘कादंबरीहा सुंदर शब्द टाकून ‘उपन्यास’ सारखा तिरपागडा शब्द वापरण्यात काय अर्थ?
टेबल, कंडक्टर, सिग्नल, रेल्वे, बॅट अशा रूढ व सर्वमान्य इंग्रजी शब्दांपासून कसल्याशा भाषिक आकसापोटी बुंबाट पळण्यात काय अर्थ?
आणि किंवा आणि यांची गल्लत करणाऱ्यांना वर्गीय तुच्छतेनं पाहण्यापेक्षा त्यांची मदत करणं हे आपल्याला महत्त्वाचं का वाटत नाही? जर व्हताहा उच्चार ग्राम्य आणि अशुद्ध असेल, तर नव्हताहा उच्चारसुद्धा अशुद्धच समजला पाहिजे, नाही का? त्यामुळे भाषा अभिजात किंवा हिणकस नसते तर ती कालपरिस्थितीनुसार बदलत राहते हे आपण नेमकं कधी लक्षात घेणार आहोत? मुळात भाषा जितकी कृत्रिम व पंडिती, तितकीच ती शोषित समाजापासून कित्येक योजनं दूर हे सूत्र लक्षात घेऊन
१) स्वभाषेच्या प्रकृतीचं सूक्ष्म ज्ञान
२) ज्या परभाषेतले शब्द आपलेसे करायचे तिचा शास्त्रशुध्द अभ्यास
३) वाचकांना सुबोध अर्थप्रतीती करून देण्याची तळमळ
 ४) योग्य वेळी योग्य शब्द सुचण्याइतपत भाषाप्रभुत्व
हे चार घटक एकत्र यायला हवेत. तरच स्वभाषेची विटंबना आणि सामान्य वाचकाचे हाल न करता नवे शब्द योजता येतील.
बदल नाकारणारीभाषा मृतप्राय होते. सध्याच्या वेगवान युगात जी भाषा बदल पचवूनतगेल तीच वृद्धिंगत होईल, हे तर अटळ वास्तव! मात्र बदल सामावून घेणंआणि बदलात वाहवत जाणंया दोन भिन्न बाबी आहेत. सरमिसळ ही दुधात साखरेसारखी हवी. सिनेमा-नाटकांच्या शीर्षकांना इंग्रजी आधार घ्यावासा वाटणं, मराठी गाण्यांत हिंग्लिश बोल घुसडणं, वृत्तवाहिन्यांकडून जैसा की आप देख सकते हैच्या धर्तीवर जसं की आपण पाहू शकताछाप वाक्यं पेरून मराठीच्या चिंधड्या उडवणं अत्यंत चुकीचं आहे. आजकाल फेसबुक-ब्लॉगवरील विचारवंतांची सद्दी पाहता सामाजिक माध्यमांनीही किमान व्याकरणिक भान बाळगणं अत्यावश्यक होय.
कोणताही बदल उत्क्रांतीस्वरूप घडवला तर सहज शक्य बनतो. भाषासंवर्धनाचंही असंच आहे. गरज आहे ती योग्य नियोजनाची, ‘मला मातृभाषेत शुध्द लिहिता-बोलता आलंच पाहिजेया इच्छाशक्तीची, जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपली भाषा ही ज्ञानभाषा किंवा रोजगारभाषा म्हणून टिकावी या निर्धाराची आणि मनामनांत जोपासली जाऊन वाढतच राहिली पाहिजे या तळमळीची! तर आणि तरच, मराठी ही त्या अर्थाने राजबिंडी भासू लागेल यात शंकेला वावच नाही.
 
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशा इंग्रजांचा वासाहतिक कालखंड. टास्मानियातल्या एका आदिवासी जमातीतल्या माणसाला किरकोळ चोरीखातर मृत्युदंडाची शिक्षा झाली. आता कितीही क्रूर कायदा लागू केला तरीही तुम्ही म्हणाल एका चोरीखातर फाशी? त्यातली मेख अशी की शेवटपर्यंत त्या कोकलून गयावया करणाऱ्या माणसाला आपली बाजूच मांडता आली नाही; कारण त्याच्या जमातीचा तो एकटाच प्रतिनिधी जिवंत उरला होता आणि त्याची भाषा जाणणारी एकही व्यक्ती पृथ्वीतलावर शिल्लक नव्हती! अखेर तो आणि त्याच्यासह त्याची भाषा, दोघेही एकाच वेळी सुळावर चढले!
भाषा लिखित स्वरूपात जतन असो की मौखिक, ती कायमस्वरूपी जपली जाईलच हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणूनच भाषा जगवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगवणं! त्या भाषेत व्यवसाय बहरत नसेल, तर भाषा फार काळ टिकणार नाही.
काही वर्षांपूर्वी भारत सरकारने देशाच्या भाषिक सर्वेक्षणासाठी केलेलं नियोजन ६०० कोटी रुपये एवढं होतं. पण प्रसिद्ध भाषाभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी त्याच सुमारास तशाच प्रकारे सर्वेक्षण केलं आणि त्याला फक्त ८० लाख रुपये खर्च आला. ६०० कोटींचा एक टक्का म्हणजे सहा कोटी, त्याच्या १ दशांश म्हणजे ६० लाख! याबद्दल ते काय सांगतात पाहा;

मला हे सर्वेक्षण शक्य झालं; कारण भाषा बोलणारे लोक त्यांच्या भाषांसाठी जीव ओवाळून टाकायलाही तयार आहेत! तुम्हाला वाट्टेल ती मदत करायला ते तयार असतात. कारण त्यांना आपल्या भाषेबद्दल प्रचंड प्रेम आहे. आपली भाषा कोणीतरी ऐकायला हवी, त्या भाषेबद्दलची माहिती ऐकायला हवी, असं त्यांना वाटत असतं. पण त्यांचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. या सगळ्या लोकांच्या भाषांची युगानुयुगे मुस्कटदाबी झाली आहे.

१८०२ मध्ये देशात छपाईची कला आली. त्यात आठ भाषा छापल्या गेल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या भाषांमध्ये छापील साहित्य आहे, त्या भाषांनाच घटनेच्या आठव्या परिशिष्टात टाकलं गेलं. ज्या भाषा आठव्या परिशिष्टात आहेत, त्यांचाच विचार प्रांतरचनेच्या वेळी केला गेला. त्यामुळे मौखिकच राहिलेल्या भाषांवर खूप अन्याय झाला हे इथं समजून घेतलं पाहिजे.
मानवी उत्क्रांतीमधील भाषा हा महत्त्वाचा टप्पा. लहानग्यांच्या बोबड्या बोलापासून ते वृद्धांच्या तोतऱ्या शब्दापर्यंत भाषेचा विराट पसारा आहे. आपला इतिहास, परंपरा व संस्कृती यांची खोलवर ओळख भाषेद्वारे होते. विचार, मतं, भावना यांची प्रभावी देवाणघेवाण भाषेद्वारेच घडते. आता हेच बघा ना, हिमाचल प्रदेशच्या भाषांमध्ये बर्फासाठी २२०पेक्षा जास्त शब्द आहेत. गढूळ पाण्यावर पडणारा बर्फ, बर्फ पडताना चंद्रप्रकाश असेल तर, बर्फ पडल्यानंतर वादळ येणार असेल तर, अशा विविध प्रकारांसाठी ढीगभर शब्द! म्हणजे जेव्हा हिमालयाचे हिमनग वितळायला लागतील तेव्हा असे शब्द जिवंत असले, तर त्या हिमनगांचं वितळणं जास्त लवकर कळेल. त्सुनामी आली त्या वेळी अंदमानचे सगळे आदिवासी जगले. एकही आदिवासी मेला नाही. कारण त्यांच्याकडे बदलणाऱ्या लाटांचं अंग समजणारे शब्द होते. एक शब्द म्हणजे पूर्ण ग्रंथालय असतं. कारण तो शब्द मिळवायला आपल्याला पाच लाख वर्ष लागली आहेत. आदिम काळापासून आपण आवाजाचा वापर करून संकेत द्यायचो. ७० हजार वर्षांपूर्वी आपण एक संपूर्ण वाक्य तयार करण्याच्या टप्प्यावर आलो. म्हणूनच आपली भाषा हा आपला दैदिप्यमान वारसा आहे हे समजून घेऊन त्यानुसार वागलं पाहिजे.
बहुभाषिकत्व हे भारताला लाभलेलं वरदानच. आपल्या देशात आजही ७८० पेक्षा जास्त भाषा आहेत. एक भाषा, एक धर्म, एक वंशही राष्ट्रवादाची कल्पना आपण इटली आणि जर्मनीकडून घेतली होती. पण १९३०च्या सुमारास आपल्याकडील विचारवंतांना लक्षात आलं की, ती संकल्पना आपल्याकडे शक्य नाही. मग बहुभाषिक राष्ट्रीयत्वाची संकल्पना आली. १९४६ ते १९४९ या दरम्यान घटना समितीच्या वादविवादांमध्ये हा विषय सातत्याने आला. शेवटी त्यांनी ठरवलं की, आपल्या देशात किमान १४ तरी मान्य भाषा असाव्यात. या समितीत ज्या मुद्द्यांवर पूर्णपणे चर्चा झाली, त्यांची आर्टिकल्सबनली. पण जे मुद्दे अर्धवट राहिले, ते शेड्युल्समध्ये सहभागी केले गेले. बहुभाषिकत्वहा सुंदर वस्तुपाठ आज आपण जगासमोर ठेवू शकतो, म्हणूनच तर आपण सांस्कृतिकदृष्ट्या जास्त उत्क्रांत आहोत!
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाषा ही पर्वतासारखी मरते! भाषा ही जीवनप्रणाली नाही. त्यामुळे जैविक प्रक्रिया भाषेला लागू नाहीत. भाषा ही चिन्हप्रणाली आहे. म्हणजे भाषा मरत नाहीच. भाषा ही मारलीजाते. भाषेचा मृत्यू कसा असेल, याची कल्पना करायची असेल, तर एखाद्या पर्वताचा मृत्यू कसा असेल, अशी कल्पना करा. दगडांचे काही तुकडे, गारगोट्या जसजसे तुटत-निखळत जातात तसतसा पर्वत मरत जातो. भाषा तशीच मरते. भाषा म्हणजे वाचिक चिन्ह आहे. चिन्ह एकदा निर्माण झाल्यानंतर त्याची किंमत कधीच कमी होऊ शकत नाही. लोकांवर आर्थिक किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरच लोक भाषा सोडून जातात. ते नाईलाजानं नव्या भाषा स्वीकारतात. म्हणजेच सरकारच्या एखाद्या धोरण/योजनेमुळे भाषेचं नुकसान होत असेल, तर याचा निश्चितच गंभीर विचार व्हायला हवा.
प्रत्येक भाषा म्हणजे एक स्वतंत्र विश्व आहे. त्यामुळे त्या प्रत्येक भाषेची लिपीही वेगवेगळी असणारच. अनेकदा सगळ्या भाषा एकाच लिपीत लिहिल्या जाव्यात, वगैरे गोष्टींबाबत चर्चा होते. पण सगळ्या देशांमध्ये सगळ्या जगासाठी एकच सरकार येऊ शकेल का, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळे ही गोष्ट व्यवहार्य नाही. लिपी ही संकेत आहे आणि भाषा हे चिन्ह आहे. भाषेतही कालाचं आणि अवकाशाचं आकलन करण्याची विशिष्ट पद्धत असते. ती दुसऱ्या भाषेत तशीच असत नाही. त्यामुळे प्रत्येक भाषा ही युनिक वर्ल्ड व्ह्यूआहे.
जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या आणि मंदीचा फटका बसला, त्या वेळी भारताला मात्र ही आर्थिक मंदीची झळ त्या मानाने खूपच कमी प्रमाणात बसली. कारण अनौपचारिक अर्थव्यवस्थेनं आपल्या देशाला तारलं. ही अनौपचारिक किंवा पूरक अर्थव्यवस्था चालवणारे लोक छोट्या छोट्या समाजांचे आणि अनेक भाषा बोलणारे होते. म्हणजे ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी अनेक भाषांमधून बोलणारे छोटे समाज पुढे येतात. एखादी भाषा लोप पावते; कारण त्या भाषेतून व्यवसाय निर्माण होत नाहीत. उदाहरणार्थ, मुंबईची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी आजूबाजूचे छोटे भाषासमूह टिकवले, तरच मुंबईला नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.
 
मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी मराठी भाषेची सद्यस्थितीया विषयावर परिसंवाद घेण्याची प्रथा आहे. त्याबाबत बोलायचं तर संस्कृत काव्यातल्या ट्रान्स्फर्ड एपिथेटनावाच्या प्रकाराची आठवण होते. होळीच्या दिवशी आपण बोंबा मारतो, मित्र-शत्रू सगळ्यांच्याच नावाने खूप ओरडतो. त्यामुळे आपल्या अंतर्मनावरचा ताण हलका होतो. साहित्य संमेलनातील या चर्चा म्हणजे अंतर्मनाचा निचरा करण्याचाच प्रकार म्हणावा लागेल!
वस्तुतः वंश, धर्म, जमीन आणि भाषा हे अस्मितासंघर्षाचे चार मूळ मुद्दे जगभर आहेत. या चारही मुद्द्यांत भाषा हा अत्यंत प्राचीन मुद्दा आहे. भाषिक वर्चस्वावरून लढाया होऊ नयेत, यासाठी भाषेबद्दल मोकळेपणे चर्चा व्हायला हवी, लोकशिक्षण मिळायला हवं, भाषांच्या विविधतेबद्दल आदर वाढायला हवा. तरच असे संघर्ष कमी होतील. मातृभाषेतून शिक्षण मिळालं, तर माणूस लवकर आणि उत्तम शिकतो. तसंच नवनवीन भाषा शिकून घेतल्या तर नवनव्या संस्कृतींशी परिचय घडून माणूस त्यांचा आदर करू लागतो. परिणामी बहुभाषिक शाळेचं मॉडेलच जगाला उपयोगी पडेल. परंतु भारताच्या थ्री लँग्वेज फॉर्म्युलाची आज काय अवस्था आहे? याचं आत्मपरीक्षण महाराष्ट्रासह प्रत्येकच राज्याने केलं पाहिजे.
परंतु त्याचबरोबर भाषेसाठी केवळ केंद्र किंवा राज्य सरकारनेच काही करावं, ही अपेक्षाच बेजबाबदार, चुकीची आणि एकांगी आहे. भाषा ही सरकारपेक्षा जुनी आहे. सरकारं येतील जातील, पण भाषा कायम राहणार आहे!
 
तात्पर्य बोलू जाता, ‘आफ्टर ऑल इट्स मायमराठी!असे दांभिक नक्राश्रू गाळण्यात काहीच हशील नाही. कालचक्र गरगरत आहे; प्रश्न इतकाच की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेया काव्यपंक्तींमागचे सावध पडघम आपण वेळीच समजून घेतोय की नाही हा!
 

संदर्भ :

१) मराठी भाषा : वाढ आणि बिघाड श्री. के. क्षीरसागर

२) मराठी भाषा : आज आणि उद्या डॉ. अनिल गवळी

३) राजकारणातील भाषा ग. प्र. प्रधान

४) भाषाभिवृध्दीची सामाजिक दृष्टी श्री. म. माटे

५) आधुनिक भाषाविज्ञान डॉ. मिलिंद मालशे

६) स्मृतिभ्रंशानंतर डॉ. गणेश देवी

७) मराठीची दुरवस्था संपणार तरी कधी ? – सारंग दर्शने (लेख म. टा.)

८) मराठीचे मारेकरी- पराग करंदीकर (लेख म. टा.)

९) छायाचित्र – टाकबोरू

 
वाचत रहा :
३) बंडू गुरुजींचेसंवादकौशल्य (लेख)

१) मिर्ज़ा ग़ालिब (लेख)

२) शेवटचे पान (मुक्तक)



आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال