[वाचनकाल : ५
मिनिटे]
आजचा दिवस महत्त्वाचा. स्त्री-शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य किंवा स्त्री-मुक्ती इत्यादी बिरूदांसाठी तो महत्वाचा आहेच; पण या पलीकडे जाऊन आपली पूर्वापार चालत आलेली पुरूषसत्ताक ‘संस्कृती’ उलथून टाकण्यासाठी जीवन वेचलेल्या सावित्रीसाठी हा दिवस जास्त लक्षात ठेवला जावा. सावित्रीमध्ये कोणताही कडवट विरोध नाही, आकांडतांडव नाही, समाजाप्रति आक्रोश नाही. जर काही असेल तर निव्वळ प्रकाशाची ओढ, बदलाची आशा आणि अविरत कष्ट . . .
झेलूनिया अंगावरती शेणा-मातीची घाण ।
दिले विद्येचे ज्ञान ।
लेकी कराया सज्ञान ।।
पाहायला गेले तर सावित्रीबाई फुलेंची ही ओळख आपल्याला आहेच.
स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या व नवऱ्याच्या कामात खांद्याला खांदा लावून समाजासाठी
अहोरात्र झटणाऱ्या, एका महान
स्त्रीची फक्त एवढी ओळख पुरेशी नाही असे वाटते. आजच्या समाजाने व विशेषतः मुलींनी ‘सावित्री’ समजून घेणे
हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज, शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. तरीही
विविध कारणांनी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या बालकांची किंवा तरुणांची संख्या भारतात
प्रचंड आहे. अगदी माझ्या परिचयात अशा मुलीसुद्धा आहेत ज्यांना शिक्षणाचा कंटाळा
आलाय व लग्न करून मोकळे व्हावे असे वाटते. २१ व्या शतकातील भारतसुद्धा, ‘शिक्षण घेऊन कोणाचं भलं झालं?’ असा प्रश्न विचारतो.
जवळजवळ १८० वर्षांपूर्वी सावित्री नावाच्या एका बालिकेचे
दहाव्या वर्षीच लग्न झाले. मुलींना शिक्षणाचा अधिकार नसताना तिच्या नवऱ्याने तिला
जे काही शिकवले ते तिने मनःपूर्वक आत्मसात केले व वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच
मुलींना शिकवणारी भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवला.
आजच्या मुली
लग्न करताना, मुलगा नेमका
काय करतो, किती कमावतो, घरदार आहे का आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्याहून श्रीमंत
आहे का हे पाहतात. जात-पात, रंग-रूप या
इतर गोष्टीसुद्धा आल्याच.
त्या काळात
स्त्रियांना हे स्वातंत्र्य नव्हते. त्यात नवरा असा मिळाला, ज्याचे विचार समाजापेक्षा पूर्ण वेगळे. मुलींना शिक्षण
देण्याचे काम करतो म्हणून सासर्याने घराबाहेर हाकलले तेव्हा, शांतपणे त्याला साथ देत अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला
संसार उभा करणारी सावित्री वेगळी ठरते. उदरनिर्वाहासाठी ज्योतिबांना मिशनच्या
शाळेत नोकरी करावी लागे. त्यामुळे, स्वतःच्या
शाळेत त्यांना पूर्ण वेळ देता येत नसे. ही जबाबदारी सावित्रीबाईंनी स्वतःच्या
खांद्यावर घेतली. त्यावेळच्या वर्तमानपत्रांत हा उल्लेख आहे की, अनेकदा त्यांना जेवायलाही वेळ मिळत नसे. परंतु, त्यामुळे त्या त्यांचे काम थांबवत नसत.
शिक्षक होणे
ही साधी गोष्ट नाही. मुलांची त्या विषयातील गोडी वाढवणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे व शिक्षणाबद्दल त्यांमध्ये
रस निर्माण करणे, सोबतच
त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून घडवणे; हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे. आजचे शिक्षण, फक्त ‘शिक्षणाचा
बाजार’ होऊन राहिले
आहे, ही टीका
शिक्षकांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
समाजाच्या
विरोधात जाऊन शिक्षण घेताना, त्यावेळी
मुलींच्या मनात अनेक प्रकारचे भय असायचे. ते भय नाहीसे करून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावत अभ्यासात गोडी निर्माण
करणे, हे
सावित्रीबाईंसाठी मोठे आव्हान होते. परंतु, खरेच त्यांचे कार्य पूर्णत्वास जात होते का? याची पडताळणी करण्यासाठी, दादोबा पांडुरंग या शिक्षणाध्यक्षाकडून मुलींच्या शाळेतील
पहिली वार्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी १८५२ रोजी घेण्यात आली. मुली शैक्षणिक
परीक्षा देऊ शकतात, हाच
समाजासाठी कुतुहलाचा विषय ठरला व ही परीक्षा पाहण्यासाठी शाळेच्या आवारात ३००० हून
जास्त लोक जमले. २३७ मुलींनी परीक्षा दिली व या परीक्षेचा निकाल १००% लागला. मुली
शिकू शकतात, परीक्षा देऊ
शकतात व पास सुद्धा होऊ शकतात; हा धडा
समाजाला देऊन सावित्रीबाईंनी एक नवी क्रांती रचली.
१८५७ च्या
उठावानंतर त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यास सनातन्यांच्या विरोधामुळे ब्रिटिश
सरकारने मदत देणे थांबवले. तरीही हार न मानता स्वकष्टाने पैसा उभारत विद्यादानाचे
हे पवित्र काम फुले दांपत्याने न थकता चालू ठेवले.
समाजाला
एखादा संदेश सरळ-सरळ देण्यापेक्षा, त्यांच्या
मनाला लागेल अशी गोष्ट करून, तो
अनपेक्षितपणे त्यांच्या मनावर बिंबवणे हा ज्योतिबांचा स्थायीभाव होता. स्त्रियांना
आदर दिला पाहिजे, हे समाजाला
थेट सांगण्यापेक्षा, त्यांनी
स्वतःच्या पत्नीला ‘अहो-जाहो’ ने बोलण्यास प्रारंभ केला.
आज आईला ‘तू’ आणि वडिलांना
‘तुम्ही’ या प्रकारे बोलावताना, आपण एक प्रकारचा भेदभाव करतोय, ही कल्पना अनेकांच्या मनात नसते. या परिस्थितीत बायकोला ‘तुम्ही’ म्हणून हाक
मारण्याचा प्रश्नच येत नाही. ज्योतिबांनी आपल्या आचरणाने त्यांच्या
विद्यार्थ्यांमध्ये स्त्रियांना कशाप्रकारे आदर द्यावा ही शिकवण दिली.
समाजाला
सरळ-सरळ योग्य काय आहे, ते न
सांगण्याची कला, सावित्रीबाईंनीसुद्धा
नेमकी उचलली. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमुळे अस्पृश्यांच्या शाळेत, विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे होते. दानाच्या किंवा इतर
माध्यमातून शाळेसाठी जो पैसा प्राप्त व्हायचा, त्यातील एक वाटा ज्योतिबा, सावित्रीबाईंच्या कर्तृत्वासाठी; त्यांचा हक्क म्हणून, त्यांच्या स्वाधीन करायचे. ही विद्यार्थीगळती
थांबविण्यासाठी सावित्रीबाईंनी, ‘हेच पैसे ‘उपस्थिती
भत्ता’ म्हणून
अस्पृश्य विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, जेणेकरून त्यांचे शिक्षण चालू राहील’ ही कल्पना ज्योतिबांसमोर मांडली व पूर्णत्वास आणली.
‘मुलींना दिले
जाणारे शिक्षण व सोबतच अस्पृश्यांमधील कमी केली जाणारी अंधश्रद्धा’ या कार्यामुळे सावित्रीबाईंना खूप अपमान सहन करावा लागे.
आजच्या युगात, मनुष्य एक तर अपमानाचा बदला घेतो किंवा मानसिकदृष्ट्या
दुर्बल असेल, तर त्या
अपमानाने कोसळून पडतो. सावित्रीबाई फुलेंवर शेण, चिखल किंवा
दगड फेकणाऱ्यांना त्या म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत असताना, तुम्ही माझ्यावर शेण व खडे फेकत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.’
एखाद्या
संताच्या ठायीसुद्धा हा संयम आज आपल्याला पाहायला मिळणार नाही.
आपल्या मनात
समाजाबद्दल कळवळ नसते असे नाही. समाजात काहीही वाईट घडले, तर त्याचा निषेध करणारे ‘स्टेटस’ ठेवण्यात आज
बहुतेकांचा पुढाकार असतो. ज्याप्रमाणे २४ तासात ते ‘स्टेटस’ आपोआप निघून
जाते, त्याचप्रमाणे
आपल्या मनातूनसुद्धा ती गोष्ट अलगद निघून जाते. समाजात काही चुकीचे घडतेय, तर त्यावर उपाय काय? यावर हे पती-पत्नी कायम चर्चा करायचे. विधवांसाठी आश्रम
सुरू करणे असो, अस्पृश्यांसाठी
हौद खुला करणे असो किंवा विधवांचा अपमान टाळण्यासाठी नाभिकांचा संप करणे असो, या गोष्टी अशा चर्चांमधूनच पुढे आल्या. नाभिकाच्या संपाची
दखल ‘द टाइम्स’ या वृत्तपत्राने घेतली होती व त्याबद्दल इंग्लंडमधील
स्त्रियांनी १८९० साली सावित्रीबाईंना अभिनंदनाचे पत्रसुद्धा पाठवले होते.
गरिबांना मदत
करताना सावित्री आपला हात कधीच आखडता घेत नसे. त्यावर, नेमकेपणाने खर्च करण्याचा स्वभाव असणारे ज्योतिबा त्यांना
खर्चाच्या मर्यादा सांगायचे. त्यावर अतिशय शांतपणे हसून, ‘सोबत काय न्यायचे आहे?’ असा प्रश्न त्या ज्योतिबांना विचारत व त्यावर ज्योतिबा
प्रत्युत्तर करत नसत. राग ही गोष्ट सावित्रीबाईंच्या स्वभावातच नव्हती. नेहमी शांत
व सौम्य अशी मुद्रा, हीच
सावित्रीबाईंची ओळख होती. अगदी हसतानासुद्धा मोजकेच हसायचे, यावरून स्वव्यक्तिमत्त्वावरचे त्यांचे नियंत्रण दिसून येते.
पंडिता रमाबाई, डॉक्टर
आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे, या त्यांच्या
स्वभावाने अतिशय प्रभावित झाल्या होत्या.
आज लग्न
म्हणजे एक समारंभ असतो. खानपान, विधी व इतर
मनोरंजक गोष्टींवर, समाजात आपला
मान जपण्यासाठी अगदी कर्ज काढून खर्च केला जातो. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. ‘त्या दोघांच्या भावना काय आहेत’ ही गोष्ट मात्र आजच्या लग्नांमध्ये बहुतेकदा अनुपस्थित
असते. लग्नाच्या आधी मंगळ, गुरू, शनी, इत्यादी आडवे
येतात व त्यांच्या पूजा घातल्या जातात. तरीही संसाराचा खेळखंडोबा व्हायचा तो
होतोच.
या सर्व
गोष्टी नाकारून, वधू व वर
यांच्या भावनांना महत्त्व देत, ‘सत्यशोधक विवाह’ घडवण्यासाठी
सावित्रीबाईंनी स्वतः खर्च करून, त्यांची
मैत्रीण बजूबाई निंबणकर यांची कन्या ‘राधा’ आणि सत्यशोधक
समाजाचे कार्यकर्ते ‘सिताराम
आल्हाट’ यांचा विवाह
लावून दिला.
हे सर्व
समजून घेताना आजचा समाज सावित्रीबाईंच्या विचारांहून खूपच मागास वाटतो.
आज स्त्री हक्कांबद्दल मोकळेपणाने बोलले जाते. आर्थिक
बाबींमध्ये स्त्रियांना समान हक्क मिळतातसुद्धा. परंतु, धार्मिक बाबींमध्ये स्त्रियांना अजूनही मागचे स्थान दिले
जाते. १३० वर्षांपूर्वी आपल्या नवऱ्याच्या अंत्ययात्रेत अग्रभागी चालून, स्वतःच्या हाताने त्यांच्या पार्थिवाला अग्नी देणारी, ही कदाचित पहिलीच महिला असेल.
१८९७ ला
पुण्यात प्लेग पसरलेला असताना, जिथे
डॉक्टरसुद्धा उपचार करण्यास घाबरत होते, अशा वेळी सावित्रीबाई स्वतः या रूग्णांची सेवासुश्रूषा करीत
होत्या. त्यातच त्यांना स्वतःला आजार होऊन, त्यांचे निधन झाले. अगदी मरतानासुद्धा, समाजाची सेवा करण्याचे व्रत त्यांनी सोडले नाही.
सावित्रीबाईंबद्दल अभ्यास करताना किंवा चर्चा करताना, त्यांच्या स्त्री-शिक्षणाच्या योगदानापर्यंत मर्यादित न
राहता, त्यांनी
समाजाला त्यांच्या जगण्यातून शिकवलेल्या या अनेक गोष्टींचा सारासार विचार करणे व
ते आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
✒ लेखन – अमित
✆ मेल
• संदर्भ :
१) राष्ट्रनिर्माते – प्राध्यापक मा. म. देशमुख
२) सत्यशोधकांची भाषणे – दिलीप नलगे
३) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले – प्राध्यापक हरी नरके
४) वर्तमानपत्रांतील व मासिकांतील काही लेख
• वाचत रहा :