आंबेडकरवादासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान

[वाचनकाल : ५ मिनिटे] 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, dr. babasaheb ambedar
आंबेडकरवाद म्हणजेच संविधानातील मूल्ये समजण्यास फारशी अवघड नाहीत. परंतु, ती जाणून घेण्याचा उत्साह समाजात दिसत नाही.

कोणत्याही विचारधारेला ‘वाद’ प्रत्यय जोडून त्यावर खल करत बसण्यात भारतीय जनमानसास विशेष रस आहे. सद्यस्थितीत मात्र निव्वळ चर्चेच्या पलीकडे जाऊन त्या हरेक समाजोपयोगी विचारधारेचा अवलंब जीवनात करण्याची वेळ आली आहे. भारतीय लोकशाही आणि मूल्यांच्या संरचनेचा पाया ठरलेला आंबेडकरवाद इथेच वेगळा ठरतो, कारण याचा अवलंब आपल्या नकळत आपल्याकडून झालेला आहे . . .

आजच्या भारतीय समाजात – मग तो दलित समाज असो किंवा सवर्ण समाज – आंबेडकरांना एका साच्यात बसविण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच केला आहे. बहुतेक सवर्ण व दलित समाजाच्या मते आंबेडकर म्हणजे अशी व्यक्ती, जिने समाज व्यवस्थेला आव्हान देत व ब्राह्मणांना विरोध करत, नवीन मूल्ये आणू पाहिली. त्यामुळे, ‘आंबेडकरवाद’ या संकल्पनेला बहुतेक वेळा ‘सवर्णांना विरोध’ किंवा ‘हिंदुत्वाला विरोध’ या संकुचित मनोवृत्तीने पाहिले जाते. काही इतिहास अभ्यासक तसेच तज्ज्ञ आंबेडकरवादाला मार्क्सवादाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना, अनेक दलित संमेलनात मार्क्सवादी पुस्तके व विचार प्रभावीपणे दिसून येतात. हा ‘आंबेडकरवाद’ नेमका काय आहे?
मार्क्सने त्याच्या विचारांना अनुसरून, ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे, त्या विचारांना आपण मार्क्सवाद म्हणू शकतो. बुद्धाच्या विचारांना बौद्ध भिख्खूंनी ग्रंथांमध्ये मांडले. त्यामुळे, त्या विचारांना आपण ‘बुद्धिझम’ (बुद्धाचा धम्म) म्हणू शकतो. आंबेडकरांनी दलित समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी विविध ग्रंथ लिहिले व आज त्या ग्रंथांमध्ये असलेल्या काही विशिष्ट गोष्टींना समोर ठेवून आंबेडकरवाद उभा केला जातो. परंतु, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे ग्रंथ तेव्हा लिहिले गेलेत जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता. परिणामी शासनव्यवस्था दलितांना त्यांचे अधिकार देण्यास सक्षम नव्हती. त्यामुळे ते ग्रंथ दलितांच्या हक्कांबाबत व त्यांनी शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याबाबत त्यांना प्रेरित करत राहिले. नंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला व येथील शासनव्यवस्था कशी असावी हे ठरवण्यातील यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आंबेडकरांना होता आले, तेव्हा त्यांनी संपूर्ण देशासाठी आपले जे विचार मांडले तेच – ‘आंबेडकरवाद’. ते विचार तुम्हाला इतर कुठे नाही, तर प्रामुख्याने भारताच्या ‘संविधानामध्ये’ दिसून येतील.
कदाचित त्यामुळे आंबेडकरवाद नेमका काय आहे हे समजण्यात आज संपूर्ण भारत अपयशी ठरत आहे. आंबेडकरवादासमोरील सर्वात पहिले आव्हान हे ठरते की आज विधी विद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी व काही स्पर्धा परीक्षा करणारे युवक सोडून संविधान जाणून घेण्याचा फारसा कोणी प्रयत्न करत नाही. अगदी आंबेडकरांना आपले गुरु मानणारे, आपले बाबा मानणाऱ्या व्यक्ती सुद्धा, संविधान नेमके काय सांगते हे नीट समजून घेण्याचा उत्साह दाखवत नाहीत किंवा त्याबद्दल समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. आंबेडकरवाद जर २१ व्या शतकात समाजापर्यंत पोहोचवायचा आहे, तर संविधानाकडे फक्त एक ग्रंथ किंवा मसुदा म्हणून न पाहता ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१९७० व ८० च्या दशकात दलित साहित्य व दलित पुढारी मोठ्या प्रमाणात नावाजले गेले. नंतर मात्र ही चळवळ मागे पडली. याचे कारण असे की, दलित पुढाऱ्यांनी आंबेडकरवाद हा एका जातीपर्यंतच बांधून ठेवला. त्यामुळेच, आजही ‘शेड्युल्ड् कास्ट’ मध्ये असण्याचा लाभ अनेक जातींमार्फत घेतला जातो. मात्र, आंबेडकरांना स्वीकारले जात नाही. बाबासाहेब त्यांच्या शिक्षणामुळे व ज्ञानामुळे नावाजले गेलेत. त्यावेळच्या व्यवस्थेसाठी एका दलिताने एवढे शिकणे, हा आश्चर्याचा धक्काच होता. त्यामुळे त्यांचे ज्ञान ही दलित समाजासाठी कौतुकाची बाब नक्कीच ठरते. परंतु, बाबासाहेब ज्ञानी होते म्हणून आम्ही सर्व सुद्धा त्यांच्याप्रमाणेच ज्ञानी आहोत, हा दलित नेत्यांचा अहंकार समाजाला व दलित चळवळीला नुकसानकारक ठरला! आंबेडकरवादास पुढे न्यायचे असेल, तर आजच्या दलित पुढाऱ्यांनी हा अहंकार सोडून, समाजाला शिक्षणाप्रती जागृत करत किंबहुना त्यामध्ये स्वयोगदान देत, नवी उच्चशिक्षित पिढी घडवण्याचे कार्य हाती घ्यायला हवे.
बाबासाहेबांनी नेहमीच ब्राह्मण्याला विरोध केला, ब्राह्मणांना कधी विरोध नाही केला. त्यामुळेच, त्यावेळेचा सवर्ण समाज काही प्रमाणात का असेना बाबासाहेबांसोबत होता. अगदी जातीव्यवस्थेबद्दल कट्टर भाव असणाऱ्या व त्यामुळेच वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना विरोध करणाऱ्या लोकमान्य टिळकांचे सुपुत्र असूनही ‘श्रीधरपंत टिळक’ हे आंबेडकरवादी होते. बाबासाहेबांना मनुस्मृती जाळताना, तसेच महाविद्यालय स्थापन करतानासुद्धा अनेक ब्राह्मण सहकाऱ्यांची मदत झाली. ब्राह्मण्यवाद व जातीव्यवस्था हे हिंदू समाजातून तेव्हाच लोप पावेल, जेव्हा सवर्ण समाजातर्फे ‘हे अयोग्य आहे’ या सत्याचा स्वीकार केला जाईल व हे त्यांच्या ध्यानी आणून देण्याचे काम आंबेडकरवाद सतत करत राहील. आजच्या दलित समाजाने ब्राह्मणांबद्दल द्वेषाची भावना न ठेवता त्यांच्यापर्यंत आंबेडकरांचे विचार नीट पोहोचतील याची दक्षता घेतली पाहिजे.
आज मार्क्सवाद आंबेडकरी विचारांमध्ये शिरकाव करू पाहतोय. कारण आज जातीभेद व वर्गभेद यामध्ये फारसे अंतर राहिले नाहीये. आज मोठ्या पदांवरील अधिकारी पाहिले, महत्त्वाचे राजकीय नेते पाहिले किंवा मोठमोठ्या कंपन्यांचे प्रमुख व निर्णय घेणारे अधिकारी पाहिले, तर हा सर्व प्रभाग उच्चवर्गीय समाज सवर्ण जातींनी व्यापलाय हे दिसून येते. याचा अर्थ असा नाही की, सवर्ण समाजातील लोकांमध्ये गरिबी आढळत नाही. मात्र, गरीब समाजात प्रामुख्याने खालच्या जातीतील लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. शासनाचा एक प्रमुख अहवाल, ‘सोशियोइकॉनोमिक अँड कास्ट सेन्सस’ यामध्ये हे दिसून आले आहे. श्रीमंती मिळविणे हे आंबेडकरवादाचे लक्ष्य कधीही असणार नाही. परंतु, परिस्थितीने जर काही प्रमाणात सवर्ण समाजाला आज दलितांसमान एकाच वर्गामध्ये आणून उभे केले आहे तर या संधीचा लाभ घेत त्यांच्या ध्यानी आणून देणे गरजेचे आहे की हजारो वर्षे ही यातना दलित समाजाने कशाप्रकारे उपभोगली व त्यामुळे यातून मुक्त होणे का गरजेचे आहे.
आंबेडकरवाद म्हणजेच संविधानातील मूल्ये समजण्यास फारशी अवघड नाहीत. परंतु, ती जाणून घेण्याचा उत्साह समाजात दिसत नाही. जेव्हा समाजात एखादी गोष्ट रुजवायची असेल, मात्र समाज ती जाणून घेण्यास उत्सुक नसतो. तेव्हा हे कार्य पार पाडण्याचे काम कला करते. दक्षिण भारतात विविध साहित्यिकांनी व मागील काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हे काम मोठ्या खुबीने केले आहे. ‘जय भीम’ सारख्या चित्रपटाने संविधानातील ‘हेबीअस कॉर्पस’ हे तत्व समाजापर्यंत पोहोचवले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ‘सैराट’ सारखा एक प्रयोग झाला. तरीही, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे याची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. आंबेडकरवादास आज चार्वाकवाद किंवा मार्क्सवाद यांच्या चष्म्यातून सुद्धा पाहिले जाते. कलेच्या माध्यमातून आंबेडकरवादाचा नेमकेपणा समाजापुढे ठेवणे आवश्यक आहे.
‘सुंदर जीवन’ हे कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट. त्यासाठीच माणूस झटत असतो. आंबेडकरांची प्रतिमा घरी असून सुद्धा, हिंदू धर्मातील विविध रूढीपरंपरा पाळणे व अंधश्रद्धांना महत्त्व देणे, हे समाजाकडून या सुंदर जीवनाच्या प्राप्तीसाठीच केले जाते. जर लोकांच्या आयुष्यात आव्हाने नसतील, दुःख नसेल, तर ते कोणत्याच देवाला महत्त्व देणार नाहीत. रिती-भाती व रूढी-परंपरा या गोष्टी त्यांच्यासाठी एक आशेचे स्थान असतात. जर आंबेडकरवाद समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवत, लोकांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करत, त्यांचे लोकशाहीतील महत्त्व समजावून देत, लोकशाहीमध्ये ते राजे आहेत व राजासाठी सर्व शक्य आहे या गोष्टीची जाणीव त्यांना जर करून दिली तरच भारत खऱ्या अर्थाने पुढारेल व हे केवळ आंबेडकरवादासोबतच शक्य आहे.
आज भारतात मूलभूत गोष्टींचे स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आले आहे. त्यामुळे, राजकीय स्वातंत्र्याची आपण अपेक्षाच करू शकत नाही. तरीही न्यायालये सक्षम आहेत व आजही व्यवस्था संविधानावरच चालते. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनसुद्धा आपण मागास देशांमध्येच गणले जातो, याचे प्रमुख कारण आपली सामाजिक रचना. जपानला सुद्धा या प्रकारच्या सामाजिक रचनेने मागास ठेवले होते. जेव्हा त्यांना हे समजले, तेव्हा त्यांनी सामाजिक रचना पूर्णपणे उलथून लावत समाजात समानता प्रस्थापित केली. भारताला सुद्धा आंबेडकरवादासोबत हे नक्कीच शक्य आहे. जातीव्यवस्थेमध्ये राहत आपण लोकशाहीचा विचार करू शकत नाही व लोकशाही आंबेडकरवादाशिवाय शक्य नाही. त्यामुळे आज आंबेडकरवादासमोर आव्हाने तर आहेत; परंतु, भारताच्या प्रत्येक आव्हानाला आंबेडकरवाद हेच समाधान आहे, असे मी म्हणेन.


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال