झुरमुळ्या


Your Image Alt Text
कसा दिसतो मी हसताना?. . .मंद.


दुरून एकसंध दिसणाऱ्या, वाऱ्यावर लहरणाऱ्या, रंगीबेरंगी झुरमुळ्या मन प्रसन्न करतीलही पण; जवळ जाऊन बघितल्यावर लक्षात येतील झुरमुळ्यातल्या फटी. फाटकेपण उघडं पडू नये म्हणून केलेला रंगाचा मारा, आणि आधाराअभावी त्यांचं फडफडणं. वाट्याला आलेल्या या झुरमुळ्यांची सजावट करण्याची ताकद आहे मध्यवर्गात. मात्र ही ताकद जन्मजात नसते. जी ताकद परिस्थितीतून बाहेर पडण्याचं स्वप्नं जिवंत ठेवते ती ताकद घडण्याची ही कथा . . .


थांब ना रे . . .

अंह.

असा हात नकोस झटकू . . . थांब ना . . . बाळा . . .

काय आहे?

काही नाही.

मग थांबवलं कशाला?

तुला कुठे लागलं नाही ना रे मघाशी?

नाही.

खरं सांग.

नाही लागलं. पण आता कुठे जायचं आपण?

चल थोडावेळ, आबा येईपर्यंत, गणपती बघू.

चल . . .


थोडा हळू चाल ना.

तू जोरात चाल. त्याआधी माझ्या खांद्यावरून हात काढ.

ठेवू दे की रे बाळा.

नाही, नको मला आवडत नाही.

मला आवडतं की रे पण . . .

मग स्वतःच्याच ठेव. खांद्यावरून हात काढ बर का, मी परत एकदा सांगतोय.

काय लगेच दुखतोय का खांदा तुझा? मघाशी खांद्याला उलताणं लागलं होतं ना तुझ्या, खरं सांग.

नाही लागलं; पण खांदा अवघडतो तुझ्या वजनाने.

मी जाड आहे का रे इतकी?

फक्त इतकी? त्याहून जास्त आहेस. सगळ्यांहून जास्त आहेस.

बाळा, आबा काय म्हणतात माहितीये ना?

काय?

मी मोठी आहे आणि तू माझं सगळं ऐकायचं, उलटं बोलायचं नाही.

ताई आता आबा आहेत का इथे?

नाही.

मग हात बाजूला काढ.

काढते की झटकतोस कशाला . . .


अग ताई जरा हळू चाल, मला दम लागतो.

दम लागतो तर जा माघारी घरी. मला हात ठेवू देत नाहीस काय.

बर चाल तुझ्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने चालवतो.

बावळट, असा हात ओढू नकोस रस्त्यातच. तोंडाने बोल काय ते.

थांब जरा इथले गणपती बघून जाऊ.

कशाला इथले गर्दीतले बघायचे, चल पुढे जाऊ, आपल्या शाळेपाशी मोठं दुकान आहे.

थांब ना तेवढाच इथे जरा वेळ जाईल.

बर बघू मग . . .


तो बघितला का त्या कोपऱ्यातला.

कुठला रे?

तो बघ.

अरे हात खाली घे, देवाकडे असं बोट नसतं दाखवायचं.

का ग ताई?

देवाकडे बोट दाखवलं तर पाप लागतं.

खरं का ग?

हो. आमचे क्लासचे सर सांगतात.

मग आता गं, मला पाप लागलं?

हो. पण घाबरू नकोस. हे बघ दोन्ही हात असे तीनदा आलटून पालटून गालावर हळुवार मारून घे आणि देवा माझं चुकलं म्हण.

देवा माझं चुकलं . . . फिटलं?

फिटलं. आता सांग कोणता गणपती ते.

दुसऱ्या रांगेतला शेवटचा, निळ्या रंगाचा.

चले बावळट तो काय निळा रंग आहे का.

मग कोणता आहे?

आकाशी.

निळ्यात आणि त्यात काय फरक असतो? तो निळाच आहे.

नाही आकाशी.

लागली का पैज?

लागली.

चल त्या काकांना विचारू.

नको तू जाऊन विचार. मी थांबते इथेच.

काका . . . तो गणपती . . . नाही किंमत नको . . . त्याचा रंग कुठला . . . कृष्णाचा?

कुठला रंग म्हणाले रे बाळा ते?

ते म्हणाले कृष्णाच्या अवतारात आहे ना तो गणपती म्हणून तो रंग कृष्णाचा. खरंच का ग ताई?

ते सांगताहेत तर खरंच असेल ना मग. पुढे चल बाळा . . .


इथे अजून दुसरा कुठला चांगला आहे का रे?

सगळे देव चांगलेच असतात ताई, देवाला वाईट म्हणणे पाप.

थांब मारून घेते.

तो बघ बैलगाडीतला गणपती, शेतकऱ्याचा अवतार.

तो बघ बाळा शंकराचा अवतार, गळ्यात नाग आहे त्याच्या.

तो बघ मारुतीसारखा उभा, बॉडी तर बघ त्याची.

आणि हा बघ विष्णूचा अवतार लोळताना आणि मागे पाच तोंडाचा नाग.

हो भारी आहे.

त्या पलीकडच्या गणपतीला पाच तोंडं कशी रे बाळा?

तो पंचमुखी हनुमान अवतार असणार, हे बघ माझ्या गळ्यातल्या लॉकेट सारखा.

बघू बरं . . . हो रे. काय नाव असतात या पाच तोंडाची?

तो झोपाळ्यावर बसलेला गणपती बघ दोन पोरींच्या मधे.

त्या पोरी नाहीत रे रिद्धीसिद्धी आहेत.

मग त्या कोण?

त्याच्या बायका.

का मग ते बहिणभाऊ गं ताई, तुझ्या माझ्यासारखे, आपण नाही का तात्यांच्या झोपाळ्यावर बसत.

ते सोड ती मूर्ती बघ किती मोठी वाटते.

हो ग इतकी मोठी मूर्ती बरी नाही. उचलायला किती जण लागतील?

कितीतरी.

ताई खरं तो कोणत्या देवाचा अवतार वाटतो गं?

अवतार नाही तो लालबागचा राजा आहे.

म्हणजे गं?

अरे बाळा पुण्याचा दगडूशेठ तसा मुंबईचा लालबागचा राजा.

तुला कसं माहिती?

मी गेले होते ना एस्सल वर्ल्डला तिथे कळालं.

आणि त्यावर्षी आमची सहल सुद्धा नाही गेली. आता माझी एक बारी तुझ्याहून जास्त राहिली. पुढच्या वेळेस तू नाही जायचं सहलीला मी एकटाच जाणार . . . ताई पळू नकोस . . .


इथले गणपती काही खास वाटत नाहीत.

हो ग सगळे एकसारखेच आहेत.

चल पुढे जाऊ.

चल . . .


ताई त्या गणपतीचे डोळे किती सुंदर आहेत बघ ना.

हो रे.

माझ्याकडेच बघतोय.

नाही माझ्याकडे.

नाही. आधी मी बघितला म्हणून माझ्याकडे.

तुला एक सांगते देवाची मूर्ती तू कुठूनही बघ ती तुझ्याकडेच पाहत असल्यासारखं वाटतं.

खरं का ग?

करून बघ.

थांब जरा पलीकडे सरकून बघतो, अलीकडे, मागे, पुढे, खरच की ग ताई. कसं काय?

देवाची आहे ना मूर्ती म्हणून . . .


इथे थांब जरा.

तो बघ लाल रंगाचा गणपती. आईला आवडेल का ग तो ताई? लाल रंग तिचा आवडता आहे ना.

मला नाही माहिती, तो विषय सुद्धा काढू नकोस.

मग दुसरा बघ तो हिरव्या रंगाचा.

छान आहे.

आपण इथेच थांबू थोड्यावेळ. इथले गणपती चांगले आहेत.

हो रे गर्दी हटल्यावर सगळे बघूनच जाऊ.

ताई यावेळी सांगवीचा राजा कुठे बसणार गं?

कुठे म्हणजे? दरवर्षी बसतो तिथेच.

किती मोठा आहे ना तो गणपती.

त्यापेक्षा मोठे गणपती सुद्धा असतात.

काहीही.

खरंच रे.

असतील; पण मला देखाव्याचे गणपती जास्त आवडतात. सांगवीच्या राजाच्या तिथे का नसतो देखावा? तिकडे गणेश मंदिराकडे किती मोठा असतो दरवर्षी.

मला काय माहिती देखावा का नसतो ते. चल आता इथले बघून झाले. फक्त जाण्याआधी तो कोपऱ्यातला बघ आणि ओळख कोणता आहे?

दगडूशेठ.

बरोबर; पण त्याचा रंग वेगळा आहे . . .


ताई थांब ना, ते बघ काय करतायेत.

आरती करतायेत गणपतीची आणखी काय.

आजच का? गणपती तर उद्या आहे ना.

उद्या वेळ नसेल म्हणून आताच नेत असतील.

थांब जरा आरती करून जाऊ देवाची.

तू चप्पल न काढता टाळ्या वाजवतोयस, बावळट.

थांब चप्पल काढतो, गालात चापटाही मारून घेतो.

जा बाळा पेढा आण.

तू पण चल की?

नाही मला नको.

हा बघ ताई मोदकासारखा पेढा दिला त्या काकांनी मला.

बघू थोडा दे मला.

मी नाही देणार. तुला चल म्हणलं होतं.

थोडा?

नाही देणार.

असं का रे बाळा?

नाही. नाही. नाही. वा, काय भारी पेढा आहे.

बाळा दे की रे.

तोंड तसं करू नकोस. धर एवढाच देणार. अजून एक दाणा सुद्धा नाही.

बर दे.

घे.

अरे बापरे तू तर माझ्या डाव्या हातावर पेढा दिलास आता तुला पाप लागणार. पाप नको असेल तर अजून थोडा दे उजव्या हातावर.

नाही. पाप लागलं तर मी मारून घेईन, पेढा देणार नाही.

बघ बाबा तुला द्यावासा वाटला तर दे नाहीतर राहीलं.

पुन्हा तसं तोंड करू नको. दरवेळी तुझं हेच नाटक आहे. थोडाच देणार.

दे . . .


बाळा इथे बघ काय लिहिलंय.

गणपती बाप्पाची प्रतिष्ठ . . .

येतं का वाचता ढगोळ्या? गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचे नियम.

येतं मला वाचता. एक तू वाच एक मी वाचतो.

घरात बसवण्याच्या गणपतीची सोंड उजव्या बाजूस नसावी. त्याच्या पूजेचे नियम वेगळे असतात.

चतुर् . . .

तू राहू दे रे तुला नाही येत वाचता.

मग तू वाच.

चतुर्भुज गणपती असल्यास एका हातात पडलेला दात असावा.

नेहमी पायाशी मूषक असणाऱ्याच गणपतीची मुर्ती स्थापित करावी.

गणपतीचे तोंड नेहमी दाराकडे ठेवावे.

पण मामांच्या गणपतीचं तर आतल्या बाजूला असतं ना गं ताई?

त्यांच्या घराला दोन दरवाजे आहेत, मूर्ख, पुढे वाच तू.

घरातील गणपतीची मूर्ती जास्त मोठी नसावी.

इतर देवांच्या अवतारातील गणेश मूर्ती नको.

मला तर ती मारुतीची खूप आवडली होती ना ताई.

गणपतीची उभी असणारी मुर्ती घरात बसवू नये.

मारुतीची तर उभी सुद्धा होती, जाऊ दे.

वक्रतुंड गणपतीच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेस नसावे. याचा उलट प्रभाव पडतो.

पण मग ज्यांच दारच दक्षिणेकडे आहे त्यांचं काय गं ताई?

तू गप रे वाचतेय ना मी.

मी पण वाचतोय मग. गणपतीच्या खोलीतील दिवा कायम तेवत ठेवावा.

गणपतीचा एक हात आशीर्वाद देण्याच्या व दुसरा मोदक स्वीकारण्याचा तयारीत असावा.

गणपती आणताना नवीन वस्त्र धारण करावे.

गणपतीची मुर्ती स्वीकारताना विधिवत आरती करावी.

घरी नेताना गणपतीचे मुख रुमालाने झाकून आपल्या छातीकडे करावे. घरी जाताना मागे वळून पाहू नये.

सोबतीला इतर वाद्य असावीत मात्र घंटी आवर्जून पाहिजेच, त्याशिवाय गणपती नेऊ नये.

घरी गणपतीची विधिवत पूजा करून मगच प्रतिष्ठापना करावी.

एकदा गणपती बसवल्यास पुढे तीन, पाच, सात, अकरा अशा वर्षांच्या आवर्तनात बसवावा.

गणपती बाप्पा मोरया.

बाळा शेवटचंच तू जरा नीट वाचलं.

आपण उद्या बघू बरं का ताई.

काय?

मामा हे सगळे नियम पाळतात का नाही ते.

पाळतीलच ना.

तरीपण बघू. ताई मामा आदल्या दिवशी गणपती का नेत नाहीत?

माहिती नाही.

आणि यावेळी जर मामांनी संध्याकाळी गणपती आणला तर आपण घरी असायला पाहिजे ना.

नाही आणत रे. मामींनी सांगितलं असतं मला आणणार असते तर . . .


किती वेळा सांगितलंय रस्त्यात हात खेचत जाऊ नकोस म्हणून.

मग थांब ना जरा. ती मूर्ती बघ, त्याची किंमत बघ बारा हजार रुपये.

कोणती?

ती बघ. हनुमानाने गणपतीला खांद्यावर घेतलेली.

किमतीचं काही खरं नसतं बाळा.

मग काय उगाच लिहीलंय का ते?

उद्या सकाळी बघ एक हजार रुपये लिहितील त्यावर.

आणि लहान गणपती काय फुकट वाटतील? काहीतरी खोटं सांगते.

नाही. लहान गणपती पुढच्या वर्षासाठी ठेवतात.

मला नाही वाटत हजार रूपये करतील.

उद्या मामांचा गणपती आणताना वाच किंमत.

आणि जर मामांनी कुंभारवाड्यातून आणला तर?

तर तू एकटाच येऊन बघ.

ए ताई चल आपण कुंभारवाड्यात गणपती बघायला जाऊ.

तिथलेच गणपती इथे आणतात.

ताई पाऊस आला.

पळ ना मग. असा थांबलास कशाला? चल शाळेसमोरच्या चौपाटीत उभे राहू तिथेच गणपती बघू. तिथे एक खूप मोठं दुकान आहे.

एक नाही, तीन-चार आहेत . . .


ताई तो गणपती बघ ना.

कोणता?

आधी माझ्या खांद्यावरून हात काढ.

ठेवू दे. दम लागलाय मला.

मग मला पण लागलाय की. हात काढ नाहीतर मी चाललो घरी.

बर थांब काढते बाळा. पावसात कुठे जातोस?

बोल ठेवशील का हात, परत हात ठेवशील?

नाही ठेवत बाळा, नाही ठेवत.

नक्की?

खरंच नाही ठेवत. ये शेड खाली ये डोकं भिजतंय बाळा . . .


कोणता गणपती बघ म्हणत होतास तू?

तो बघ. तो जाड छोटा, कसा हसतोय बघ ना.

तो बालगणेश आहे.

भारी आहे, तो माझ्याकडे बघून हसतोय. मला खूप आवडला.

देवची मुर्ती सुद्धा हसताना सुद्धा आपल्याकडे बघूनच हसतीये असं वाटतंय.

आईला पण आवडेल ना गं तो?

माहिती नाही. त्याची किंमत अडीच हजार आहे

. म्हणजे?

दोन हजार पाचशे.

म्हणजे?

आपल्याला नाही परवडणार.

चल ताई पाऊस कमी झाला. फक्त एकदा मी त्याच्यासारखा हसून पाहतो . . . कसा दिसतो मी?

मंद.

बर मग मी जातो घरी.

थांब जरा. परत एकदा हसून दाखव नीट बघते . . . हो एकदम गणपती दिसतोय.

मग चल . . .


ताई हे बघ इथे सगळे छोटे गणपती आहेत. हा बघ किती भारी आहे ना, तो पण. याच्यावर तर बघ फक्त एकोणपन्नास रुपये लिहिलंय.

बघू? खरच की रे.

याचा रंग पण मस्त आहे, पोपटी रंगाचं धोतर आणि दोन हात आणि सोनेरी मुकूट, हातात, गळ्यात सोनेरी दागिने आणि खाली उंदीर पण आहे.

याला तर सगळंच आहे. याची सोंड डाव्या बाजूला आहे.

ताई नीट बघ डोळे सुद्धा मस्त आहेत. हा परवडेल ना ग आपल्याला?

कदाचित.

आपण उद्या न्यायचा का घरी?

आणि ठेवायचा कुठे?

कुठे म्हणजे? ती आपली भिंतीवरची फळी आहे ना त्यातलं सामान बाजूला सारून तिथे मधे बसवू. नाहीतर मग मांडणीतल्या फळ्यांवर. नाहीतर टेबलमधे. टीव्हीच्या शेजारी नाहीतर माळ्यावर रेडिओच्या शेजारी. ताई न्यायचा आपण आईला विचारून?

आता माहितीये ना काय झालंय. गणपती आणायचा का विचारल्यावर आई चिडली, रागाला गेली.

पण आईला गणपती का आवडत नाही?

मला माहित नाही. विचारलं तू होतं पण त्याचा मार मला खावा लागला. तिला वाटलं मीच तुला सांगितलं विचारायला.

तूच तर सांगितलं होतंस की.

मी काय तुझ्या मनात भरवलं होतं का?

नाही. ते सोडं. खरं आपण का नाही बसवत गणपती?

आई म्हणते एकदा बसल्यावर पुढे आयुष्यभर बसवावा लागतो, त्याचे नियम पाळावे लागतात.

मघाशी वाचलेले ना? ते तर सोपे आहेत.

अजून खूप असतात. आता आपण भाड्याने राहतोय ना मग स्वतःचं घर झाल्यावर बसवायचा म्हणते आई.

स्वतःचं म्हणजे मामांसारखं?

मामाची तर बिल्डिंग आहे रे येड्या. आपल्याला घर पाहिजे.

ते कधी होणार?

मला काय माहित?

घर झालं की आपण मोठा गणपती बसवायचा.

तिथे वाचलं नाही का तू? गणपती छोटा पाहिजे.

ताई मला तो हसणारा गणपती चालेल.

तोवर तो राहायचा नाही रे.

आईला विचार ना मग तू हा गणपती बसवायचा का? स्वस्तच आहे.

नको ती पुन्हा चिडेल, मारेल.

या एकोणपन्नासवाल्या गणपतीचे कान तर बघ ताई, मला काही आवडले नाहीत. चल पलीकडच्या रस्त्यावरचे गणपती बघूयात . . .


या दुकानातला सगळ्यात भारी गणपती कोणता सांग.

तो तिकडचा. मान कलवून उभारलेला. घरात उभा राहिलेला गणपती असावा.

उभा राहिलेला नसावा रे बाळा. म्हणून तो त्याच्या मागचा आहे ना हातात त्रिशूळ असलेला तो सगळ्यात भारी.

तिथे लिहिलं होतं की उभा राहिलेला गणपती पाहिजे.

उभा गणपती घरात नसायला पाहिजे. काय वाचलं मग तू.

लागली पैज? चल परत वाचून येऊ.

लागली पैज. कशाची?

कशाचीच नाही फक्त पैज.

तशी पैजच नसते. मी जिंकले तर खांद्यावर हात ठेवू द्यायचा.

आणि हरल्यावर ठेवायचा नाही.

चल . . .


काढ की खांद्यावरून हात बास की बराच वेळ झाला.

तू हरणार आहेस, पहिल्यांदाच सांगत होते.

ताई काढ ना हात. खांदा अवघडला आता.

ते बघ कालिका वाल्याच्यात कसले भारी बल्ब आलेत.

लाइटिंग पण बघ कसली भारी आहे. आणि गणपतीचं मंदिर सुद्धा.

आराक म्हणतात त्याला.

काय?

आराक म्हणतात आ-रा-क.

पण ताई इथे तर आरास लिहीलंय. बघ.

आरासच म्हणते की मग मी. तू काय ऐकलं? ते सोड हा गोल गोल फिरणारा सप्तरंगी बल्ब बघ. तो पाण्याचा धबधबा, त्याच्यामध्येच गणपती बसवायला जागा आहे.

थांब ताई तुला एक गंमत दाखवतो. या दुकानात दोन टाळ्या वाजवल्या की लाईटीवरचा पक्षी ओरडतो . . .


कशाला वाजवल्या टाळ्या तू? निघालो ना आता दुकानाबाहेर. माझी ती लाइटिंग बघायची राहिली.

पण पक्षी तर ओरडला ना?

ओरडला. त्याला कसं कळत असेल रे बाळा टाळी वाजवलेली?

माहिती नाही. हे बघ मागे कुठेच न जोडलेल्या नळातून पाणी येतंय. कसं काय, आहे का नाही जादू?

सजावट आहे रे ती गणपती समोरची.

चल.

कुठे जायचं?

आता त्या गल्लीतलं दुकान राहिलंय.

नको ना बाळा. चल जेवायला घरी जाऊ.

मी नाही येत.

फक्त एवढंच दुकान बघून जाऊ बर का बाळा . . .


इथे तर सगळे तेच गणपती आहेत. फक्त तो बघ स्केटिंगवाला, तो पिक्चर मधला आहे. माय फ्रेंड गणेशा.

तुला कसं माहिती?

मी मित्राच्या घरी बघितला. तुला स्टोरी सांगू?

नको चल आता घरी जेवायला.

आईने काही केलं नसेल गं.

दुपारचं होतं डब्यात, दोन चपात्या होत्या.

एकच आहे. एक मी खाल्ली.

एक तर आहे ना? अजून दुसरं काहीतरी खाऊ.

ताई मला वाटतंय आपण अजून थोडं थांबू. आई चिडलेलीच असेल. ती बनवेल तेव्हा जाऊ.

नको रे बाळा माझे पाय अवघडलेत बघ, आता चल घरी.

तू एकटी जा मग.

मला एकटीला परत मारेल रे ती. कुठे फिरत होतात आणि तू कुठे आहेस म्हणून दोन्ही कारणांसाठी. तू चल सोबत.

बर. आबा आले असतील?

आले असतील आणि नसतील आले तर जेवण करू पटकन.

आणि मग?

आबा येईपर्यंत गावात पुन्हा एक चक्कर मारू गणपती बघायला.

बाळा, फक्त आता जेवताना आईला गणपतीबद्दल काही म्हणू नको, ती मारेल. बघायला गेलो होतो हेही सांगू नकोस.

आबा कधी येणार कामावरून?

माहिती नाही, आता जायचं आपण?

पाय खरंच दुखत असतील तर चल मग . . .


घरी आईला चुकूनही काही सांगू नकोस. ती मारेल आणि आपल्याला उद्या मामांचा गणपती आणायला सुद्धा पाठवणार नाही.

आपल्याला सोडून मामा जाणारच नाहीत.

का? त्यांना तर सगळ्या चाळीतली माणसं आहेत. आपण भाडेकरी. मालकाचं आपल्या शिवाय काय अडणार?

तेही आहेच पण नाही जाणार मामा आपल्याला सोडून.

ते जाऊ दे. सकाळी मामांचा गणपती आणायला मी आधी उठले तर तुला उठवीन तू आधी उठलास तर मला उठव.

मीच तुला उठवेन.

कशावरून?

तू खूप झोपतेस. आळशी.

उद्या नाही झोपणार.

दररोज हेच म्हणतेस.

उद्या गणपती आणायचाय रे. आठ वाजेपर्यंत आपण आवरून तयार पाहिजे.

हो, तयार पाहिजे . . .


ताई, थांब ना.

काय आहे? रस्त्यात हात खेचू नकोस हे सांगण्याची शेवटची वेळ आता तुला.

मघाशी तुला उलताणं तर लागलं नाही ना हाताला?

नाही रे.

दंडाला?

नाही.

नक्की?

नक्की.

पायच थोडे दुखत आहेत. घरी गेल्यावर बसू जरा.

मग ताई खांद्यावर हात ठेव माझ्या. घरी जाईपर्यंत.

नको. तुझेही पाय दुखत असतील.

दुखतात खरे पण एवढे नाही, तुझ्याएवढे नाही.

तरीही चल असाच हाताला धरून.

बर चल मग . . .





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال