
‘प्रस्तुत साहित्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही, तसा तो आढळलाच तर निव्वळ योगायोग’ असं आपण लिहितो तेव्हा एक गोष्ट नक्की असते: कोणा जिवीत व्यक्तीशी लिखाणाचा पुरेपुर संबंध असतो! फक्त जे लिहिलंय ते एकतर लिहिण्यासारखं नसतं/वाचण्यासारखं नसतं/त्या व्यक्तीला पचण्यासारखं नसतं किंवा नको तितकं खरं असतं. लिहिणाऱ्याने लिहीताना पर्वा केलेली नसते मग ती छापतानाही अशी करू नये कदाचित . . .
मी त्याला
यमक कवी म्हणायचो
निब्बर हसायचो मग
त्याच्या गमक नसलेल्या
कवितांवर
चोखलेले विषय निवडायचा
बळीराजा भ्रष्टाचार भ्रुणहत्या आज्जी
प्रेम जयंत्या संस्कृती मयंत्या
अधिक त्याचे लुळे पडलेले शब्द
दूधच निघायचं नाही
अधूनमधून तो इंटरनेटवरच्या
बड्या कवींचे मुखडे उचलून
निकृष्ट नकला करायचा
तुकाराम-नामदेवाला भीड तू
हे कंटेम्प्ररी बिंटेम्प्ररी सोडून
सांगितलं की
हसण्याकडं करतो तसं
तो सल्ल्याकडंही दुर्लक्ष करायचा
एकही काव्यसंग्रह न वाचलेल्या
कवितेला स्वत: निवडलेल्या
या फडतूस कवीचं रूपांतर पुढं
एका स्टेजवरील
प्रतिथयश कवीत होणाराय
हे स्पष्ट दिसायचं
निब्बर हसायचो मग मी
मध्यंतरी घरी
जडदार गोणी खेचल्याचं
निमित्त झालं एक्स-रेला
तेव्हा कळलं
साल्याच्या उजव्या खांद्यातला
बॉल-सॉकेट जॉइंट
जन्मापासूनच गैरहजरै
रेअरॅटी स्पेशालिस्ट अपॉइन्टमेंट्स रिस्क ऑपरेशन
मग त्याचा निकामी हात
वाळत गेला
हटयोग्याच्या धडासारखा
तो छाटला त्यानंतरही त्याची कविता
फारशी सुधारली असं नाही
धक्का बिक्का पचवून
यमक कवी अजूनही करतो
गमक नसलेल्या कविता
पण मला हसूच येईना झालंय
पूर्वीसारखं खळखळून
मी शोध घेतोय
नक्की ऑपरेशन कोणाचं झालंय याचा
{fullwidth}