बंडू गुरुजींचे संवादकौशल्य

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
शाळेतले मास्तर, गुरूजी, शिक्षक, teacher in school classroom

शाळा म्हणलं की गुरूजी आणि गुरूजी म्हणलं की शाळा! प्रत्येक गुरूजींची शिकवण्याची खास पद्धत. काहींची इतकी खास की झोप लागणार हमखास! काही पहिल्यांदा माईक मिळाल्यासारखं भाषण ठोकतात तर काही एकमेव समालोचकाचा पेहराव करतात. फक्त शिकवण्यातच नाही तर इतरही बाबींत काही खास सवयींनी शिक्षकांना पछाडलेले असते. ग्रामीण शिक्षकाला कोणीच शाळेच्या चार भिंतीत बांधू शकत नाही. त्याचा सबंध गावाशी संबंध येतो. असा शिक्षक मग जर अष्टपैलू बंडू गुरुजी असेल तर?

संवाद म्हणलं की मला आठवतात ते आमचे बंडू गुरुजी. पहायला गेलं तर बंडू गुरुजी तसा एकदम निरुपद्रवी माणूस. पण त्यांच्या काही लकबी अशा होत्या, ज्या समोरच्याच्या पोटात गोळा आणायच्या. ‘त्याचं कसं आहे,’ हे त्यांचं आवडतं वाक्य पुढे येऊ घातलेल्या मोठ्या भाषणाची नांदी असायची.
     कसलाही प्रश्न विचारा, बंडू गुरुजी असा आव आणणार की कुणी त्यांना उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी कसं वठणीवर आणावं, याविषयी तज्ज्ञ जाणकाराने सल्ला विचारला आहे. मोठ्या आढ्यतेनं ‘त्याचं कसं आहे,’ अशी सुरवात करून विषयाशी असंबंधित गोष्टींवर तासंतास बोलत बसणं, यात गुरुजीचा हातखंडा होता.
     शाळेत त्यांचे द्वाड विद्यार्थी इतक्या खोड्या काढायचे, की बिचाऱ्या गुरुजींना दोन शब्दही बोलू देत नसायचे. त्याचं उट्टं ते अशाप्रकारे बेसावध श्रोत्यांवर काढत असायचे. किंवा मग ‘गणित शिक्षक श्री. वैभव ज्ञानेश्वर बंडगे, बी.एस्सी., बी.एड.’ इतका ऐसपैस परिचय असलेल्या व्यक्तीला ग्रामस्थांनी आपल्या सोयीसाठी ‘बंडू गुर्जी’ बनवून ठेवलं होतं, त्याचा वचपा ते अशा रीतीनं काढत असावेत. कारण काहीही असो सर्व ग्रामस्थांना त्याच्या लांबलचक भाषणांचा मनस्वी तिटकारा.
     तर हे बंडू गुरुजी माझे पहिल्या शाळेवरील जुने सहकारी. गणित विषयासोबत कॉम्प्युटर मध्येही तरबेज. केंद्रातील शिक्षक त्यांना तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखत होते. ‘तंत्रस्नेही शिक्षक’ म्हणून गुरुजींना कोणी संबोधलं की गुरुजींची छाती बुर्ज खलिफा एवढी उंच व्हायची. मग सध्याच्या युगात तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावत आहे ह्या विषयावर गुरुजी ‘त्याचं कसं आहे,’ ह्या वाक्याने जे सुरू व्हायचे ते समोरचा आडवा झाल्याशिवाय थांबत नसायचे.
कसेही असले तरी बंडू गुरुजी गावचे एकमेव समालोचक होते. एका वर्षी “शाळेच्या स्नेहसंमेलनात यंदा कोणी कोणी ‘भाग’ घेतला आहे त्यांची नावे” वाचणारे गुरुजी ‘भाग घेतला’पाशी भटकले आणि तिथेच त्यांनी गणितातील पुर्णांक-अपुर्णांक, वर्ग-वर्गमुळ, घन-घनमुळ या सर्वांचा भागाकार स्पष्ट केला व वर पुन्हा “आता मी थांबतो आणि संमेलनाकडे वळतो नाहीतर तुम्ही दमुन‘भागून’ घरी जाल!” अशी कोटीही केली.
     गावच्या क्रिकेट स्पर्धेत तर त्यांनी अमुक चेंडूंचा ‘लसावी’ घेतला तर इतक्या धावांचा तो ‘मसावी’ निघेल आणि अमुक-अमुक संघ जिंकेल अशा भयाण ‘समालोचकतेचं’ प्रदर्शन केलं वर पुन्हा हा षटकार अठ्ठावीस पुर्णांक वीस मीटर वर उडाला असे आडाखेही जाहीर केले!
     एकंदरीत शाळेतील स्नेहसंमेलनातील ‘स्नेह’ आणि क्रिकेटच्या स्पर्धेवेळी स्पर्धकातील ‘उत्साह’ शोषून घेण्याची कमाल बंडू गुरुजींच्या वक्तव्याने करून दाखवली होती. एकदा तर हे अफाट वक्तृत्व गुरूजींच्या जीवावर बेतले होते‌.
     आमच्या गावातील प्रतिष्ठित असामीच्या मातोश्री निर्वतल्यानंतर त्यांच्या दहाव्यावर चार स्तुतीसुमने बोलण्यासाठी बंडू गुरुजींना बोलावलं होतं. ‘त्याचं कसं आहे,’ ही जी सुरूवात गुरूजींनी केली ते माणूस असताना, नसताना पासून ते रडण्याचे तोटे आणि हसण्याचे फायदे इथेपर्यंत गुरूजी पोहचले. ‘आणि अशा प्रसंगी हसणे आरोग्यासाठी लाभदायक आहे’ हे सांगणाऱ्या गुरूजींचे आरोग्य पुढील आठवडाभर गादीचा लाभ घेण्यात गेले! तरी गुरूजींनी समालोचन सोडले नाही!
     एकदा आमच्या गावातील सरपंचाचे  नातेवाईक गंभीर आजारी होते. ते कधी ‘राम’ म्हणतील ह्याची खात्री नव्हती. अशा कठीण प्रसंगी सरपंचांना लवकरात लवकर बंगलोर गाठणं आवश्यक होतं. पण आता लवकर जायचं म्हणलं की रेल्वेच तात्काळ बुकिंग करणं आवश्यक होतं आणि तेही ऑनलाइन बुकिंग. सरपंचांना अन्य कुठलाच ‘विलाज’ नसल्यानं ते आणि त्यांच्या घरचे दोघे जण लगोलग त्याच दिवशी आमच्या शाळेत बंडू गुरुजीकडे आले. यांच्या संवादाचा मी साक्षीदार तेथेच होतो.
     “त्याचं कसंय मंडळी,” बंडू गुर्जींनी सुरवात करताच सरपंच मटकन खाली बसले. आता तास-दोन तासांची निश्चिती होती हे सरपंचाच्या लक्षात आलं. सरपंचांनी केविलवाण्या नजरेनं माझ्याकड बघितलं. मी मात्र आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नाही आणि हे बंडू गुरुजी आपल्या आवाक्याबाहेरची केस आहे असा आविर्भाव आणून छताकडं बघितलं. सरपंचांनी माझा अंदाज घेतला आणि त्यांनी टुण्णकन बंडू गुर्जीच्या पुढ्यात उडी मारली आणि अजीजीच्या स्वरात ते म्हणाले, “गुर्जी, जरा दया करा आमचा नातेवाईक त्यो तिकडं यमाच्या दारात हाय, जीव अटकलाय त्येचा. आता नका अंत पाहू तेवढं ऑनलाइन बुकिंग करा आणि काय ते पट्टदिशी सांगा.”
     घसा खाकरत, घशात आलेले शब्द गिळून घेत बंडू गुर्जी म्हणाले, “थोडक्यात सांगायचं, तर ऑनलाईन तिकीटासाठी ‘रिझर्व्हेशन’ म्हणा आणि एखादी ऑनलाइन वस्तू मागवायची असेल तर ऑनलाईन ‘ट्रांझॅक्शन’ करायचंय असे म्हणा!”
     एकदा वर्गात एका मुलाने इंग्रजीतल्या ‘पेज’चा अर्थ बंडू गुर्जींना विचारला होता. तेव्हा भाताची ‘पेज’ ते खायचं ‘पान’ आणि भुर्जपत्र, ताम्रपट ते आधुनिक कागदाची निर्मीती इथपर्यंत त्याला सगळा इतिहास, भूगोल उभा-आडवा (गुरुजी उभे होते आणि विद्यार्थी आडवा!) शिकवून टाकला! त्यामुळे त्यांचे समानार्थी शब्द सुरू झाले तसे सरपंच घाबरले.
     त्यांचे समानार्थी शब्द सुरू झाले की त्यांना थांबवायचं असतं, हे सरपंच आता दीर्घ अनुभवाने शिकले होते. ते त्यांना तोडत म्हणाले, “ऑनलाईन रिझर्व्हेशनच करायचंय दुसरं काही नाही गुर्जी”
     “बरं तर ठीक आहे ऑनलाईन रिझर्व्हेशन!” गुरुजींनी मोठा श्वास घेतला.
     अशातही सरपंचानी भीत भीत प्रश्न केलाचं. “म्हंजी किती खर्च येईल ओ गुर्जी?”
     सरपंचांनी इथेच चूक झाली.गणित शिक्षकाला आणि ते ही बंडू गुरुजींसारख्या शिक्षकाला असा प्रश्न विचारणं म्हणजे मरण ओढवून घेण्यासारखं होतं.
     “आता खर्चाचं म्हणजे कसं आहे ना . ‌. .”
     “गुर्जी, थोडक्यात सांगा,” सरपंचांनी पुन्हा आठवण करून दिली.
     “थोडक्यात? मग मांडा त्रैराशिक : एकाला खर्च दिड हजार रुपये, तर तिघांचा किती?”
     सगळ्यांचे चेहरे मख्ख झाले. आमचे सरपंच सातवी पास आणि आमचे बंडू गुरुजी त्यांना अशा कठीण प्रसंगी त्रैराशिकं देत होते. शेवटी त्रेराशिकाची रास मागं लागलेल्या सरपंचांचा उद्वेग लक्षात घेऊन मीच मध्यस्थी केली आणि उत्तर सांगून बंडू गुरुजींचा आत्मा थंड केला.
     बंडू गुरुजींनी ‘पाहिलेल्या’ या दिव्य परीक्षेतून निसटून सरपंच कसेबसे त्या संबंधित नातेवाईकाच्या ‘माती’ला तरी पोहचलेच! नंतर कळाले की ते नातेवाईक ‘सरपंच बाईंच्या’ माहेरकडून होते. त्यामुळे ‘जीवावर आलं ते बोटांवर निभावलं’ हे जाणून सरपंचांनी गावात नवीन उपक्रम आणला – सगळ्या गावाला ई-शिक्षण देण्याचा उपक्रम. अशा तऱ्हेने आमचं गाव जिल्ह्यातील पहिलेवहिले ‘तंत्रस्नेही गाव’ जाहीर झाले. केंद्रातर्फे पुरस्कार द्यायला आलेल्या मंत्र्यांना सरपंचांनी आश्चर्यकारकरीत्या ‘बंडू गुरुजी होते म्हणून हे सगळं होऊ शकलं असे सांगून टाकले’ आणि पुरस्कार गेला बंडू गुरुजींना!
     पण त्या दिवशीच्या मंत्र्यांचे वक्तव्य गुरूजींना दहा पावले मागे पाडेल असे असल्याने गुरूजींना ‘आभाराचे चार शब्द’ बोलता आले नाहीत. म्हणून मला गुरूजी फार नाराज दिसले!
     आता गावातून कोणीही गुरूजींना कसलीही मदत मागायला येत नाही. परिणामी बंडू गुरुजींची सर्व गणिती विद्वत्ता, अफाट क्षमतेचे समालोचन, अमोघ वक्तव्य प्रतिभा व तंत्रस्नेह आता विद्यार्थ्यांना झेलावे लागतात. कसेही असले तरी शेवटी बंडू गुरुजी अजूनही आमच्या गावातील पहिलेवहिले ‘तंत्रतज्ज्ञ’ (ही नवी पदवी गुरूजींनी खास स्वतःसाठी बनवलेली आहे) आहेत!

बस! काहीही झालं तरी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी मी बंडू गुरुजीसारखं होण्याचा खूप प्रयत्न केला. पण आपल्याला कधीच नाही जमलं बुवा!


• संदर्भ :

• वाचत रहा :



आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال