आमची पारंगतता

[वाचनकाल : ५ मिनिटे]  
 
एकदम अ-पारंगत सामान्य माणूस, सामान्य पोज मध्ये, simple middle age man
 निदान जळताना तरी लोक म्हणतील हा कवी जन्मभर जळतच (मनात म्हणतील दुसऱ्या कवितांवर!) होता.


हल्लीच्या जमान्यात कशाला माणसाच्या पावर्ससमजतील काही नेम नाही. आपसुकच मग या कु‘पावर्सनसलेला माणूस हास्यास्पद ठरतो! आणि त्याला याचाही न्यूनगंड येतो!‌ अशाच उद्विग्नतेने आणि खिन्नतेने तो (लपून) त्याची अ‘पावर्सता लिहून काढतो याहून जास्त तो काही करूही शकत नाही . ‌. .
 

पारंगत!
अहो, अगदी साध्या गोष्टी मला जमत नाहीत. मग मला दुसऱ्याला शिकवण्याचा, किंबहुना मी तर म्हणेन मला जगण्याचा काय अधिकार आहे सांगा बरं? मला खोटं बोलता येत नाही. खोटं सांगता येत नाही. मला कुणाच्या पुढे-पुढे करता येत नाही. साधा पैसा खाता येत नाही! सर्वात वाईटातली वाईट शिवी उच्चारतादेखील  येत नाही. च्या बाराखडीतल्या शिव्या तर मी ऐकूही शकत नाही. पहिलीतल्या मुलाला येणाऱ्या शिव्या पण मला देता येत नाहीत. मला साधं भाजीवाल्यांशी भांडतासुद्धा येत नाही. भाव कमी करता येत नाहीत. तो खराब भाजी देतो, वजनात मारतो, तरी मी साधा टोमणादेखील मारू शकत नाही. मला कंडक्टरशी हुज्जत घालता येत नाही. तिकीट घेताना जर एखादा रूपया त्याच्याकडे राहिला, तर प्रवासभर मला रुखरुख वाटते. कंडक्टर स्वतःहून तो परत करत नाही आणि मलाही मागता येत नाही. आता मला सांगा आहे का मी पारंगत? आहे का मी दुसऱ्याला शिकवण्यासाठी लायक?
विद्यार्थीदशेत असताना स्पष्ट उच्चारासह भाषण करणारा म्हणून मला अनेक बक्षीसं मिळाली होती; पण परवा आमच्या पंचायत समितीमध्ये भाषण स्पर्धेत मला उत्तेजनार्थ बक्षीससुद्धा मिळाले नाही. मी परीक्षकांना कारण विचारलं, तर तुच्छतेनं हसत ते म्हणाले, ‘आवं तुमास्नी शाहरूख खानसारखं कुटं बोलता येत?’  ते थिटे गुरूजी बघा कसला पेहराव करून आले होते आणि कसली हिंदी शायरी मारून त्यांनी भाषण झाडलं. म्हणजे शाहरूख खानसारखं तोतरं बोलता येणं हा आजकालचा आदर्श भाषण नमुना! मग सांगा मी आहे का मी पारंगत?
अहो, आम्ही मैदानात सलमान खान वा गांगुलीसारखा शर्ट काढणं तर सोडाच, स्वतःच्या घरीदेखील शर्ट काढायची आम्हाला लाज वाटते! तसे आम्ही काटकुळेही नाही; पण आमचे बाहू हल्लीच्या सिनेनटासारखे (जे आमच्या मुलांचे आदर्श आहेत) बलदंडही नाहीत! आम्ही आपले घरी स्वच्छ पायजमा घालतो. तोदेखील नाड्यांचा! तरी सगळ्यांना लाज वाटते; कारण आम्हाला बर्मुडा घालता येत नाही. मग सांगा का नाही मूड जाणार पारंगतच्या गोष्टी करताय? परवा घरी एकटा असताना सहज ऋतिक रोशनसारखं नाचायला गेलो, तर कमरेत जोरदार लचक भरली. दोन दिवस हलता येत नव्हतं. दोन दिवस रजा झालीच; वर रजेचं कारणही सांगता येईना.
सहज टीव्ही लावला, तर अमिताभ बच्चन त्याच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबरच नाच करत होता. टाळ्या वाजवत काहीतरी कजरारे कजरारेम्हणत होता. मलाही वाटलं आपण ही नाचावं कोणासोबत तरी . . . मग विचार आला, कोणी पाहिलं तर . . .? आपण तर शिक्षक आहोत! आणि पारंगत म्हणे!
अहो, नाचूच काय मी गाऊपण शकत नाही. मी चुकून परवा गायला लागलो तर ही म्हणाली, ‘अहो, तुम्ही जर गाण्याच्या कार्यक्रमाच्या स्पर्धेला गेलात ना, तर तुम्हाला खालचा सापण मिळणार नाही! मग सा-रे-ज-न-ग-प्प-ब-साम्हणून सांगतील!हे तर काहीच नाही. बाथरूममध्ये मी गायला सुरूवात केल्याबरोबर नळाचं पाणीच बंद झालं. आणि पारंगत म्हणे? तो निर्जीव नळदेखील नाराज आहे माझ्यावर.
पूर्वी मला निबंधलेखनात बक्षिसं मिळायची. मागील महिन्यात महिला दिनानिमित्त पंचायत समितीमध्ये सर्व शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा होती. म्हटलं, चला आपल्याला चांगलं जमतं तर घेऊ भाग. पण मला त्या निबंधलेखनातदेखील बक्षीस मिळालं नाही. मग परीक्षकांना भेटून विचारलं तर ते म्हणाले, ‘अहो, तुम्ही ज्या स्पर्धेत भाग घेतला त्या स्पर्धेत कितीतरी सुंदर-सुंदर शिक्षिका होत्या.मला कारण समजलं नाही; पण मी आपला समज करून घेतला, की सुंदर स्त्रिया ज्या चार-पाच ओळी लिहितात त्याला कदाचित चांगलं निबंध लेखन म्हणत असतील. एवढं बोलून समीक्षक थांबला नाही. त्याने मला कविता करण्याचा सल्ला दिला व म्हणाला, ‘गुरुजी, तुम्ही आत्महत्या करून कविजगतात अजरामर व्हा! नाही तरी कवी जगतात कसं माहीत आहे ना? निदान जळताना तरी लोक म्हणतील हा कवी जन्मभर जळतच (मनात म्हणतील दुसऱ्या कवितांवर!) होता.
अहो एवढंच काय, फेसबुकवरही माझ्या कमेन्टला कोणी अंगठा करीत नाही (फार तर ठेंगा करतात)! मी माझ्या एका मित्राला एकदा विचारलं की माझी पोस्ट कोणीच का पसंत करत नाही, तर मित्र म्हणाला, ‘आरं तुझं तोंड बघ, आठ दिवस पारोसा असल्यासारखा दिसतोस. इथे एवढे सुंदर सुंदर चेहरे आहेत! लोक त्यांना पसंती दर्शवतील की तुला?’ मी म्हटलं, ‘अरे, पण लेखनाचा आणि चेहऱ्याचा काय संबंध?’
आम्हाला कुठलीही फॅशनसुद्धा जमत नाही. शर्ट-पँट घालायला जावं, तर स्वयंपाकघरातून सल्ला येतो इन करू नका. टुचभर पगार आणि ढीगभर ऐट. ते शेजारचे पाटील बघा, इनोव्हामध्ये फिरतात, पण कसे साधे राहतात! आन् तुम्ही, ती जुनाट डब्बड दहा वेळा पुसून तीच वापरता आणि वरून इन करता!
बरं झब्बा-पायजमा घालावा तर बाहेर लोक लगेच छद्मीपणे हसत म्हणतात, ‘चार शेम्बड्या पोरांना शिकवत नाही आन लागले फिरायला साने गुरुजींसारखे!सांगा आता कशात पारंगत होऊ आणि का पारंगत होऊ? फॅशनेबल राहायचं ठरवलं अन् शाहरूख खान स्टाईल सिगारेट ओढायला गेलो. तर जीव जाईपर्यंत ठसका लागला आणि डोळे पांढरे झाले. रजनीकांत टाईप सिगारेट पेटवायला गेलो तर गालाला चटका बसला. म्हणजेच आपण सध्याच्या काळात पारंगत होण्याच्या लायकीचे नाही.
एवढंच कशाला, आम्हाला तो इंग्रजी सिनेमाही समजत नाही. उगाच इतर हसले, की आपण हसायचं. एका क्षणात मिठी मारून दुसऱ्या क्षणाला ती नटमंडळी एकमेकांच्या तोंडात तोंडं घालतात, ते लिपलॉकका काय म्हणतात ना तेच. तेव्हा काय घडलं काहीच कळत नाही. बरं शेजारच्याला विचारावं तर तो समाधीवस्थेत!
मराठी सिनेमे आणि सीरियल्स तर घरातच पाहायला मिळतात. पण त्या पाहूनही तडक घराबाहेर पडावं वाटतं, विनोदी मालिका पाहून ढसढसा रडू येतं, संताप येतो. कधी-कधी तर हसू का येत नाही म्हणून हसू येतं. तर दुःखी मालिका पाहून चक्क खदाखदा हसावसं वाटतं. म्हणजे आपण जगापेक्षा वेगळेच वाटतो. टीव्ही तरी फोडावासा वाटतो वा मरून जावंसं वाटतं! मग सांगा बरं, कसं सांगू मी टीव्ही पाहण्यात खूप पारंगत आहे, विचारा मला काहीही . . . आणि पारंगत म्हणे!
आता तुम्हाला पटायला लागलं असेल माझं म्हणणं. अहो, नाही मी कशातही पारंगत.
बारीकसारीक गोष्टीही जमत नाहीत हो मला . . . साधं व्यवहारज्ञान नाही मला! बाजारात गेलो आणि विचारलं कांदे कसे दिले हो?’ तर उर्मट आवाज येतो, ‘वीस रुपये’! आता वीस रुपये म्हणजे काय? वीस रुपये डझन, की किलो, की पाव किलो? डोकं चक्रावून जातं. पालेभाज्या तर ओळखूच येत नाहीत. बरं भाजी आणली की घरी ऐकावं लागतं, ‘तुम्हाला कुणीही फसवतं, बघा कांदे सडके, पालेभाज्या शिळ्या!बाजारात जायचं म्हटलं तरी आमच्या पोटात किलोभर गोळा येतो!
घरचे लोक म्हणतात, ‘सध्याच्या जमान्यात रफटफरहायला हवं, नाहीतर तुम्ही!
साधं टीव्हीवर सीरियल्समधले दोन भाऊ एकमेकांना मिठ्या मारताना दिसले तरी आमच्या डोळ्यांत पाणी! एखादी सून पडद्यावर सासूचा छळ करताना दिसली तरी डोळ्यांत पाणी! सिनेमा थिएटरात सिनेमा पाहताना, शेवटच्या मारामारीत हिरो जेव्हा खलनायकाला बदडायला लागतो तेव्हा आम्ही न राहवून किंचाळतो, ‘हाण लेका हाण!आसपासचे प्रेक्षक आमचीच गचांडी धरायला येतात. आता स्फुरण चढतं त्याला काय करायचं? सिनेमातच नाही तर वर्तमानपत्रात जरी अलका कुबलचा फोटो पाहिला तरी ढसाढसा रडू येतं . . . आशा काळे दिसली की ताईऽऽम्हणून ओरडावंसं वाटतं आणि या सगळ्याला लोक वेडेपणाचं लक्षणच नाही तर लास्ट स्टेजच समजतात! आणि पारंगतच्या गोष्टी कशाला?
काही कलावंतांची नावं ऐकून तर ते पुल्लिंगी आहेत की स्त्रीलिंगी तेही आम्हाला समजत नाही. लारा दत्ता नट आहे का नटी असं विचारल्यावर तर माझा मित्र मला हसला. परवा एका काॅन्फरन्सला गेलो होतो. तिथे एकमेकांशी बोलताना चुकून मराठी बोललो, तर सगळेजण माझ्याकडे तुच्छतेनं पाहायला लागले. मला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं; पण मेलो मात्र नाही. तिथंच काही लोक चुकीचं इंग्रजी बोलत होते, पण त्यांना कुणीच हसत नव्हतं हे आणखी विशेष!
हे तर काहीच नाही, माझी मुलं बाबाम्हणून हाक मारतात म्हटल्यावर लोकांना माझी कीवच आली. मुलं आम्हाला डॅडी, पप्पा म्हणत नाहीत म्हणून आम्हाला तर लोक खूपच मागासलेले समजतात. चारचौघांत पार्टीला गेल्यावर आम्ही ड्रिंक्स घेत नाही, सिगारेट ओढत नाही म्हटल्यावर कुचेष्टेने हसतात. कमीत कमी ह्यात तरी पारंगत असावं ना?
 
पण नाही हो नाही जमत आपल्याला!


  लेखन अजित
 मेल

 
संदर्भ :
१) छायाचित्र टाकबोरू
 
वाचत रहा :


3 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. मी हसण्यात पारंगत नाही तरी धो धो हसत सुटलो. सकाळी सकाळी फ्रेश झालो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण हसण्यात आणि हसविण्यात पारंगत आहात हे सगळेच जाणून आहेत.
      आपली समीक्षा खूप महत्त्वाची आहे.खूप खूप धन्यवाद!!

      हटवा
  2. खूप छान लेखन सर

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال